वेळेचा सदुपयोग करा
१ यहोवाला संतुष्ट करण्याची आपली इच्छा असल्यामुळे आपण जीवनात इतर गोष्टींपेक्षा आध्यात्मिक कार्यांना प्राधान्य देतो. देवाचे वचन आपल्याला ‘पहिल्याने त्याचे राज्य मिळविण्यास झटा’ व ‘जे श्रेष्ठ ते पसंत करा’ असा सल्ला देते. (मत्त. ६:३३; फिलिप्पै. १:१०) कमी महत्त्वाच्या गोष्टींना त्यांच्या योग्य स्थानी ठेवून आपण राज्याच्या कार्यांना प्राधान्य कसे देऊ शकतो?—इफिस. ५:१५-१७.
२ राज्याच्या कार्यांना प्राधान्य द्या: आपल्या वेळेची अशाप्रकारे विभागणी करा की ज्यामुळे अनावश्यक कामांत तुमचा वेळ वाया जाणार नाही. काहीजण महिन्याच्या सुरवातीलाच कॅलेंडरवर क्षेत्र सेवाकार्याकरता विशिष्ट वेळांवर खूण करून ठेवतात. मग या ठरवलेल्या वेळेत इतर कामे अडथळा आणणार नाहीत याची ते काळजी घेतात. हेच सभा, वैयक्तिक अभ्यास व अधिवेशनांकरताही केले जाऊ शकते. बरेच जण आपल्या दैनंदिन वेळापत्रकावर एकतर दिवसाच्या सुरुवातीला किंवा शेवटी बायबल वाचनाकरता वेळ राखून ठेवतात. प्रत्येक महत्त्वाच्या कार्याकरता विशिष्ट वेळ आखून घ्या आणि मग या ठरवलेल्या वेळेत इतर कोणत्याही अनावश्यक कामांना लुडबूड करू देऊ नका.—उप. ३:१; १ करिंथ. १४:४०.
३ जगाचा माफक प्रमाणातच उपयोग करा: काही देशांत खेळक्रीडा, मनोरंजन, करमणूक, छंद व इतर उद्योग अगदी सुलभ आहेत. बरेचजण टीव्ही पाहण्यात किंवा कंप्युटरचा वापर करण्यात खूप वेळ घालवतात. पण या जगातील करमणुकीत किंवा नवनवीन साधनांत वेळ घालवणे व्यर्थ आहे. (१ योहा. २:१५-१७) म्हणूनच शास्त्रवचनांत आपल्याला, जगाचा पूर्णपणे वापर करू नका असे निक्षून सांगितले आहे. (१ करिंथ. ७:३१) या सुज्ञ सल्ल्याचे पालन करून तुम्ही यहोवाला हे दाखवू शकता की त्याची उपासना तुमच्या जीवनात सर्वात महत्त्वाची आहे.—मत्त. ६:१९-२१.
४ सध्याच्या या जगाचा फारच थोडा वेळ उरला आहे. जे राज्याच्या कार्यांना प्राधान्य देतात ते आनंदी होतील व त्यांना देवाची संमती प्राप्त होईल. (नीति. ८:३२-३५; याको. १:२५) तेव्हा आपल्याजवळ असलेल्या या मोलवान साधनाचा अर्थात आपल्या वेळेचा आपण सुज्ञतेने उपयोग करू या.