प्रगतीशील बायबल अभ्यास संचालित करणे
भाग १२: विद्यार्थ्यांना बायबल अभ्यास सुरू करून तो संचालित करण्यास साहाय्य करणे
१ आपले बायबल विद्यार्थी जेव्हा क्षेत्र सेवेत भाग घेण्यास सुरुवात करतात तेव्हा, आपल्याला सुद्धा आता बायबल अभ्यास सुरू करून ते संचालित करावे लागतील या नुसत्या विचाराने देखील ते घाबरून जातील. अशावेळी, आपल्या सेवेतील या महत्त्वपूर्ण पैलूबद्दलचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपण त्यांची मदत कशी करू शकतो?—मत्त. २४:१४; २८:१९, २०.
२ एक बायबल विद्यार्थी बाप्तिस्मा न घेतलेला प्रचारक बनायच्या आधीच ईश्वरशासित सेवा प्रशालेत भाग घेऊ लागलेला असतो. या प्रशालेत विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या नेमणूका तयार करून त्या सादर करण्यासाठी मिळणारे प्रशिक्षण त्याला, ‘लाज वाटण्यास कसलेहि कारण नसलेला कामकरी,’ बनण्यासाठी आवश्यक असलेल्या कला विकसित करण्यास मदत करेल.—२ तीम. २:१५.
३ आपल्या उदाहरणाने शिकवा: येशूने आपल्या शिष्यांना स्पष्ट सूचना आणि स्वतःचे उत्तम उदाहरण यांद्वारे प्रशिक्षण दिले. तो म्हणाला: “पूर्ण झालेला प्रत्येक शिष्य आपल्या गुरूसारखा होईल.” (लूक ६:४०) तुमच्या सेवेत, स्वतःचे उत्तम उदाहरण मांडण्याद्वारे तुम्ही येशूचे अनुकरण करणे अगत्याचे आहे. सेवेमध्ये तुम्ही घेतलेल्या पुढाकारावरून तुमच्या विद्यार्थ्याला हे समजेल, की पुनर्भेटी करण्यामागचा हेतू बायबल अभ्यास सुरू करणे हा आहे.
४ बायबल अभ्यासाविषयी घरमालकाला सांगताना, अभ्यास कसा केला जातो याबद्दल सविस्तर सांगण्याची गरज नाही, हे विद्यार्थ्याला समजावून सांगा. ज्यातून अभ्यास केला जातो अशा प्रकाशनातून एक किंवा दोन परिच्छेदांचा अभ्यास करून दाखवणे सहसा पुरेसे असते. या संदर्भात, आमची राज्य सेवा याच्या या अंकाच्या पृष्ठ ८ आणि जानेवारी २००२ अंकातील पृष्ठ ६ वर काही उपयुक्त सूचना देण्यात आल्या आहेत.
५ उचित समयी, तुम्ही तुमच्या विद्यार्थ्याला तुमच्याबरोबर किंवा एखाद्या अनुभवी प्रचारकाबरोबर इतर बायबल अभ्यासांसाठी येण्याचे आमंत्रण देऊ शकता. अभ्यासाच्या वेळी तो, एखाद्या परिच्छेदावर किंवा एखाद्या मुख्य शास्त्रवचनावर टिपणी करू शकतो. अशाप्रकारच्या निरीक्षणाद्वारे विद्यार्थी प्रगतीशील बायबल अभ्यास संचालित करण्यास पुष्कळ काही शिकू शकतो. (नीति. २७:१७; २ तीम. २:२) त्याची प्रशंसा करा आणि तो सुधारणा कशी करू शकतो याबद्दल त्याच्याशी बोला.
६ नवीन प्रचारकांना देवाच्या वचनाचे शिक्षक होण्याचे प्रशिक्षण दिल्यामुळे ते स्वतःचे बायबल अभ्यास सुरू करण्याच्या “चांगल्या कामासाठी” सज्ज होतील. (२ तीम. ३:१७) आपल्या बायबल विद्यार्थ्यांबरोबर आपणही, “ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट घेवो” हे प्रेमळ आमंत्रण देण्याच्या कार्यात भाग घेतो तेव्हा आपल्याला किती समाधान मिळते!—प्रकटी. २२:१७.