राज्य प्रचार—बहुमूल्य सुसंधी
१ पृथ्वीच्या कोट्यवधी रहिवाश्यांना दररोज जीवनासाठी आवश्यक असलेल्या, यहोवाच्या उदार तरतुदींचा फायदा होतो. (मत्त. ५:४५) परंतु फार कमी लोकांना, देवाच्या राज्याचा प्रचार करण्याद्वारे आपल्या सृष्टीकर्त्याचे आभार मानण्याची अद्वितीय संधी लाभली आहे. (मत्त. २४:१४) या बहुमूल्य सुसंधीला तुम्ही किती महत्त्व देता?
२ राज्याच्या प्रचाराद्वारे देवाचा सन्मान होतो आणि आजच्या खळबळजनक काळामुळे त्रस्त झालेल्या लोकांना आशा आणि शांती मिळते. (इब्री १३:१५) जे हा संदेश ऐकून तो स्वीकारतात त्यांना सार्वकालिक जीवनाची आशा मिळते. (योहा. १७:३) कोणते करिअर किंवा कोणता व्यवसाय असा लाभ देऊ शकतो? प्रेषित पौलाने, ज्याप्रकारे ख्रिस्ती सेवा केली त्यावरून दिसून आले की त्याला ख्रिस्ती सेवेबद्दल कदर होती. त्याच्या मते, ख्रिस्ती सेवा ही एक खजिना होती.—प्रे. कृत्ये २०:२०, २१, २४; २ करिंथ. ४:१, ७.
३ आपल्या बहुमूल्य सुसंधीबद्दल कृतज्ञता दाखवणे: आपल्याला मिळालेल्या सुसंधीबद्दल कृतज्ञता दाखवण्याचा एक मार्ग म्हणजे, आपल्या सेवेच्या दर्जाकडे लक्ष देणे. लोकांच्या अंतःकरणाला स्पर्श करतील अशा सादरता तयार करण्यासाठी आपण वेळ काढतो का? शास्त्रवचनांचा वापर करण्याच्या व लोकांबरोबर तर्क करण्याच्या आपल्या कौशल्यात सुधारणा करण्यासाठी आपण काही करू शकतो का? आपल्याला नेमलेल्या क्षेत्रातील प्रत्येक घरात साक्ष देण्याचा आपण प्रयत्न करतो का? बायबल अभ्यास सुरू करून तो कसा चालवायचा हे आपल्याला माहीत आहे का? गत व सद्य काळातील विश्वासू ख्रिश्चनांप्रमाणे, या कार्याबद्दलचा उचित दृष्टिकोन आपल्याला प्रेरणा देतो आणि या सुसंधीबद्दल आपण कृतज्ञता दाखवतो.—मत्त. २५:१४-२३.
४ वाढते वय, आजारपण किंवा इतर समस्या असूनही आपण सेवेत आवेशाने भाग घेतो तेव्हा आपल्या प्रयत्नांना बहुमूल्य समजले जाते, ही किती सांत्वनदायक गोष्ट आहे. देवाचे वचन आपल्याला आश्वासन देते, की यहोवाची सेवा करण्यासाठी आपण करत असलेले प्रयत्न इतरांच्या नजरेत प्रभावशील नसले तरी यहोवाच्या नजरेत मात्र बहुमूल्य असतात.—लूक २१:१-४.
५ राज्य प्रचाराने मोठे समाधानही मिळते. एका ९२ वर्षीय भगिनीने म्हटले: “८० वर्षांपासून देवाची समर्पित सेवा करण्याचा मला जो सुहक्क मिळाला त्याचे जेव्हा मी अवलोकन करते तेव्हा मला अगदी कृतकृत्य वाटते; मी घेतलेल्या निर्णयाचा मला जराही पस्तावा होत नाही. मला जीवन जगण्याची पुन्हा एकदा संधी दिल्यास मी अशाचप्रकारे जगेन कारण, ‘देवाचे वात्सल्य खरोखरच, जीवनाहून उत्तम आहे.’” (स्तो. ६३:३) राज्याचा प्रचार करण्याच्या देवाकडून मिळालेल्या या बहुमूल्य सुसंधीबद्दल आपणही कृतज्ञता दाखवू या.