प्रगतीशील बायबल अभ्यास संचालित करणे
भाग ११: विद्यार्थ्यांना पुनर्भेटी करण्यास साहाय्य करणे
१ एखादा बायबल विद्यार्थी जेव्हा प्रचार कार्यात भाग घेऊ लागतो तेव्हा साहजिकच त्याला सुवार्तेबद्दल आवड दाखवणारे लोक भेटतात. आपण या नव्या प्रचारकाला परिणामकारक पुनर्भेटी करण्यास व लोकांच्या मनातली आवड वाढवण्यास कशी मदत करू शकतो?
२ पुनर्भेटीची तयारी ही पहिल्या भेटीपासूनच सुरू होते. विद्यार्थ्याला, तो ज्यांच्याशी बोलतो त्यांच्याबद्दल प्रामाणिक आस्था बाळगण्याचे प्रोत्साहन द्या. (फिलिप्पै. २:४) लोकांना आपल्या भावना व्यक्त करण्याचे प्रोत्साहन कसे द्यायचे, त्यांचे अभिप्राय कशाप्रकारे ऐकून घ्यायचे व त्यांना महत्त्वाच्या वाटणाऱ्या गोष्टी कशा टिपून घ्यायच्या हे नव्या प्रचारकाला क्रमाक्रमाने शिकवा. एखादी व्यक्ती आवड दाखवते तेव्हा, नव्या प्रचारकाला या भेटीसंबंधी आवश्यक माहिती लिहून घेण्यास सांगा. मग या माहितीचा पुढील चर्चांची तयारी करण्यास त्याला मदत करताना उपयोग करा.
३ पुन्हा भेट घेण्याआधी तयारी करणे: पहिल्या भेटीत काय काय घडले त्याचा पुनर्विचार करा आणि घरमालकाला आवडेल असा राज्य संदेशाचा एखादा खास पैलू कसा निवडायचा हे विद्यार्थ्याला दाखवा. (१ करिंथ. ९:१९-२३) त्याच्यासोबत मिळून एक साधीशी सादरता तयार करा, ज्यात बायबलचे एक वचन तसेच एखाद्या अभ्यासाच्या प्रकाशनातला एक संबंधित परिच्छेद असावा. या शिवाय, चर्चेच्या शेवटी घरमालकासमोर ठेवता येईल असा एक प्रश्न तयार करा. यामुळे पुढच्या भेटीकरता घरमालकाची उत्सुकता वाढेल. प्रत्येक भेटीत देवाच्या वचनाबद्दल त्या व्यक्तीला असलेल्या ज्ञानात कशी भर घालायची हे नव्या प्रचारकाला दाखवा.
४ विद्यार्थ्याला साधीशी प्रस्तावना तयार करून देणेही उपयुक्त ठरेल. घरमालकाला नमस्कार केल्यावर तो असे म्हणू शकतो: “मागच्यावेळी आपली छान चर्चा झाली होती. आज मी [अमुक अमुक विषयावर] तुम्हाला बायबलमधून आणखी काही माहिती देण्याकरता आलोय.” अपेक्षित व्यक्तीऐवजी दुसऱ्याच व्यक्तीने दार उघडल्यास काय करायचे हेही नव्या प्रचारकाला दाखवण्याची गरज असू शकते.
५ तत्परतेने पुनर्भेट देणे: आस्था व्यक्त केलेल्या प्रत्येक व्यक्तीला लवकरात लवकर पुन्हा भेटण्याच्या बाबतीत एक चांगले उदाहरण बनण्याचे विद्यार्थ्याला प्रोत्साहन द्या. कधीकधी लोकांना भेटण्याकरता, त्यांच्या घरी नेटाने वारंवार जात राहावे लागेल. पुन्हा भेटण्याची वेळ कशी ठरवायची हे विद्यार्थ्याला शिकवा आणि सांगितलेल्या दिवशी व वेळी परत जाणे किती महत्त्वाचे आहे हे समजून घेण्यास त्याला मदत करा. (मत्त. ५:३७) नव्या प्रचारकाला मेंढरांसमान लोकांना शोधून त्यांची आवड वाढवताना प्रेमळ, विचारशील व आदरशील असण्यास शिकवा.—तीत ३:२.