मोठ्या मंडळीत यहोवाचे उपकारस्मरण करा
१, २. प्रांतीय अधिवेशनामुळे आपल्याला कोणती संधी मिळते, आणि कोणकोणत्या मार्गांनी आपण हे साध्य करू शकतो?
१ दर वर्षी आपली प्रांतीय अधिवेशने यहोवाची स्तुती करण्यासाठी आपल्याला एक अद्भुत संधी देतात. दावीदाप्रमाणेच आपल्याही भावना आहेत. दावीदाने असे गायिले: “मोठ्या मंडळीत मी तुझे उपकारस्मरण करीन. बलिष्ठ लोकांमध्ये मी तुझे स्तवन करीन.” (स्तो. ३५:१८) “देवाच्या आज्ञेत राहा” या आगामी प्रांतीय अधिवेशनात, आपण सर्व ऐक्याने यहोवाची स्तुती करू याची खात्री कशी करू शकतो?
२ असे करण्याचा एक मार्ग आहे, आपल्या वर्तनाद्वारे. अधिवेशने भरवण्यासाठी असलेल्या संमेलनगृहाच्या एका व्यवस्थापकांनी असे म्हटले: “तुमच्या अधिवेशनांच्या आधारावर आम्ही, सभागृह भाड्याने घेऊ इच्छिणाऱ्या इतर धार्मिक गटांना सांगितले आहे की, यहोवाचे साक्षीदार त्यांची अधिवेशने कशी आयोजित करतात ते एकदा येऊन पाहा. कारण त्यांच्या सर्व योजना अतिशय शिस्तबद्ध असतात.” आपला पेहराव, आपले सहकार्य आणि आपले वर्तन या सर्वांद्वारे आपण, ज्यावर फक्त आपला देव यहोवा याचाच हक्क आहे ती गौरवपूर्ण स्तुती आणण्यात भाग घेऊ शकतो.—१ पेत्र २:१२.
३, ४. आपण नम्र असल्यास, अधिवेशनादरम्यान आणि कार्यक्रम संपल्यावरही, ख्रिस्ती सेवकांना शोभेल असा पेहराव करण्यास आपल्याला मदत कशी मिळेल?
३ आपला पेहराव: यहोवाचे गौरव होईल अशा पद्धतीने साजशृंगार करण्याकरता, भिडस्तपणाची अर्थात नम्रतेची गरज आहे. (१ तीम. २:९) सेवा प्रशाला (इंग्रजी) पुस्तकाच्या पृष्ठ १३२ वर असे म्हटले आहे: “नम्र व्यक्ती, इतरांना विनाकारण ठेच न पोहंचवण्याची व स्वतःकडे फाजील लक्ष आकर्षित न करण्याची काळजी घेते.” पुष्कळ देशांत, असभ्य पेहराव सर्वसामान्य बनला आहे. परंतु, यहोवाचे उचितरीत्या प्रतिनिधीत्व करण्याकरता आपण करत असलेल्या प्रयत्नांची तो कदर करतो. (प्रेषितांची कृत्ये १५:१४) प्रांतीय अधिवेशन, क्रिडांगणावर किंवा मनोरंजनासाठी वापरल्या जाणाऱ्या संकुलात होत असले तरी, तीन दिवसांच्या अधिवेशनादरम्यान ते आपल्याकरता एका ‘मोठ्या मंडळीप्रमाणेच’ असते. यास्तव, आपण यहोवासमोर एकत्र येतो तेव्हा आपण विश्वातला महाराधिराज याला शोभा आणेल असा आदरणीय पेहराव केला पाहिजे.—१ इति. २९:११.
४ प्रत्येक दिवसाचा कार्यक्रम संपल्यावरही आपण आपल्या पेहरावाकडे लक्ष दिले पाहिजे. कार्यक्रमानंतरच्या फावल्या वेळेत किंवा रेस्टॉरंटमध्ये भोजनप्रसंगी आपल्याला सुटसुटीत पेहराव करावासा वाटत असला तरी, आपला पेहराव आणि आपली केशभूषा ‘देवभक्तीस स्वीकारलेल्यांना शोभेल’ अशी असली पाहिजे, हे महत्त्वपूर्ण आहे. (१ तीम. २:१०) स्वीकारयोग्य पेहराव काय आहे हे, जगात जे लोकप्रिय आहे त्यानुसार ठरवले जात नाही. (१ योहा. २:१६, १७) आपल्या ख्रिस्ती प्रकाशनांत, विविध प्रसंगी स्त्री-पुरुषांचे सभ्य, नीटनेटक्या पेहरावांची चित्रे आहेत. अधिवेशन शहरात असताना आपले बॅजकार्ड लावल्यामुळे आपल्याला सतत ही आठवण राहील की आपण सर्ववेळी ख्रिस्ती सेवक आहोत.—२ करिंथ. ६:३, ४.
५, ६. यहोवाच्या आध्यात्मिक मेजाबद्दल आपण आदर कसा दाखवू शकतो?
५ यहोवाच्या आध्यात्मिक मेजाबद्दल आदर: विश्वाच्या सार्वभौम प्रभूने आपल्यासाठी मेजवानी तयार केली आहे. (यश. २५:६; १ करिंथ. १०:२१) यहोवाच्या आध्यात्मिक मेजावर उपस्थित राहण्याला आपण जर एक सुहक्क समजलो तर आपण अधिवेशनाच्या तिन्ही दिवशी उपस्थित राहण्याचे ध्येय ठेवू. तुम्ही राहण्याची, प्रवासाची व रजेची व्यवस्था केली आहे का? अधिवेशनाला तयार होऊन जाण्याकरता व प्रवास करण्याकरता पुरेसा वेळ काढा जेणेकरून तुम्ही, अधिवेशन स्थळी लवकर पोहंचाल व तुम्हाला जागा शोधता येईल, बंधूभगिनींबरोबर संगती करता येईल आणि सुरुवातीचे गीत व प्रार्थनेच्या वेळी हजर राहता येईल.—स्तो. १४७:१.
६ यहोवाच्या मेजाबद्दल आपल्याला आदर असेल तर आपण, अधिवेशन कार्यक्रम लक्ष देऊन ऐकू आणि त्या दरम्यान आपण इतरांबरोबर विनाकारण बोलणार नाही, काही खाणार नाही किंवा इकडेतिकडे हिंडणार नाही. विश्वासू व बुद्धिमान दासाकरवी यहोवा आपल्याला आता आवश्यक असलेले आध्यात्मिक अन्न देत आहे. (मत्त. २४:४५) आपल्यातील कोणीही हा कार्यक्रम चुकवू नये. पालकांनी आपल्या मुलांबरोबर बसावे व कार्यक्रमातून पुरेपूर लाभ घेण्यास त्यांना मदत करावी.—अनु. ३१:१२.
७. दुपारच्या भोजनाच्या बाबतीत आपण काय केले पाहिजे अशी विनंती करण्यात आली आहे, व का?
७ दुपारच्या सुटीत भोजन करण्यासाठी बाहेर कुठेतरी जाण्याऐवजी आपण सोबत डबा आणावा, अशी विनंती केली जाते. मागच्या वर्षाच्या अधिवेशनात बहुतेक बंधूभगिनींनी ही सूचना पाळली हे प्रशंसनीय आहे. तसेच या वर्षी देखील सर्वांनी या सूचनेचे पालन केले तर ते अधिक प्रशंसनीय होईल! (इब्री १३:१७) या व्यवस्थेमुळे आपल्याला आपल्या बंधूभगिनींच्या उभारणीकारक सहवासाचा लाभ घेण्याची उत्तम संधी मिळते ज्यामुळे आपल्यामध्ये एकतेचे व शांतीचे वातावरण निर्माण होऊन यहोवाचा आदर होतो.—स्तो. १३३:१.
८, ९. अधिवेशनामुळे यहोवाची स्तुती करण्याकरता आणखी कोणती संधी आपल्याला मिळते?
८ अनौपचारिक साक्ष देणे: अधिवेशनाला येता-जाता, आपल्याला आपल्या ओठांनी यहोवाची स्तुती करण्याच्या अनेक संधी मिळतील. (इब्री १३:१५) आपण रेस्टॉरंटमध्ये भोजन करीत असताना किंवा हॉटेल कर्मचाऱ्यांबरोबर बोलत असताना साक्ष देण्यासाठी मार्ग शोधले पाहिजे. अधिवेशनातून मिळालेल्या समृद्ध आध्यात्मिक गोष्टींनी आपले मन व अंतःकरण भरलेले असेल. तेव्हा, या चांगल्या गोष्टी आपण अनौपचारिकपणे भेटणाऱ्या लोकांना देऊ या.—१ पेत्र ३:१५.
९ ‘जनसभेत’ यहोवाचा धन्यवाद करण्याची ही संधी मिळण्याची आपण आतुरतेने वाट पाहतो. (स्तो. २६:१२) “देवाच्या आज्ञेत राहा” या प्रांतीय अधिवेशनात आपण एकजुटीने यहोवाची स्तुती करू या.
[५ पानांवरील चौकट]
प्रांतीय अधिवेशनाबाबत सूचना
▪ कार्यक्रमाच्या वेळा: तिन्ही दिवशी कार्यक्रम सकाळी ९:३० वाजता सुरू होईल. अधिवेशन होणाऱ्या स्थळी सकाळी ८:०० वाजता प्रवेश दिला जाईल. कार्यक्रम सुरू होण्याच्या काही मिनिटांआधी अध्यक्ष स्टेजवर येऊन बसतील तेव्हा सुरुवातीचे राज्य संगीत लावले जाईल. या वेळेला सर्वांनी आपापल्या जागेवर बसावे जेणेकरून कार्यक्रमाची सुरूवात आदरणीय पद्धतीने होऊ शकेल. शुक्रवारी व शनिवारी कार्यक्रम संध्याकाळी ५:०५ वाजता आणि रविवारी ४:१० वाजता समाप्त होईल.
▪ पार्किंग: अधिवेशन होणाऱ्या सर्व ठिकाणी, पार्कींगची जिथे सोय केली जाईल तिथे गाडी लावण्यासाठी विनामूल्य जागा दिली जाईल. जे लवकर येतील त्यांना आधी जागा मिळू शकेल. अधिवेशनाचे बॅजकार्ड, हे पार्कींग करण्यासाठी ओळखपत्र असेल. पार्कींगची जागा मर्यादित असल्यामुळे, एका कारमध्ये फक्त एकच किंवा दोघेच जण येण्याऐवजी, शक्य असेल तर कोणा एकानेच आपली कार घ्यावी व इतरांनाही त्यात लिफ्ट द्यावी.
▪ जागा धरणे: जागा फक्त तुमच्या घरात तुमच्याबरोबर राहणाऱ्यांसाठी किंवा तुमच्या बायबल विद्यार्थ्यांसाठीच धरली जाऊ शकते.
▪ दान: प्रांतीय अधिवेशन भरवण्यामध्ये बराच खर्च असतो. आपल्या राज्य सभागृहात किंवा अधिवेशन होणाऱ्या ठिकाणी ठेवल्या जाणाऱ्या ऐच्छिक दानपेटींमध्ये दान टाकून आपण आपली कृतज्ञता व्यक्त करू शकतो. अधिवेशनाच्या ठिकाणी दान म्हणून टाकले जाणारे चेक “वॉच टावरला” देय केले पाहिजे.
▪ दुपारचे जेवण: दुपारच्या सुटीत भोजनासाठी अधिवेशन स्थळ सोडून इतरत्र जाण्यापेक्षा कृपया सोबतच भोजन आणा. तुमच्या सीटखाली आरामात ठेवता येईल अशा लहानशा डब्यातच जेवण आणा. रस्त्यात येता-जाता अडथळा ठरू शकणारे मोठे सामान क्लोकरूममध्ये ठेवावे.
▪ रेकॉर्डींग: कोणत्याही प्रकारची रेकॉर्डिंग यंत्रे अधिवेशनाच्या विद्युत किंवा साऊण्ड सिस्टमला जोडण्याची परवानगी नाही; तुम्हाला रेकॉर्डींग करायचेच असेल तर ते इतरांचे लक्ष विचलित न करता करावे.
▪ फोटो घेणे: तुम्हाला फोटो घ्यायचे असतील, तर कार्यक्रम चालू असताना फ्लॅश वापरू नये.
▪ पेजर आणि मोबाईल: इतरांचे लक्ष विचलित होणार नाही, अशा पद्धतीने हे सेट करावेत.
▪ अपघात आणि तातडीची परिस्थिती: अधिवेशनाच्या ठिकाणी, वैद्यकीय तातडीची परिस्थिती उद्भवल्यास, कृपया सर्वात जवळच्या अटेंडंटला सांगावे; आणि अटेंडेंट लगेच प्रथमोपचार देणाऱ्या विभागाला कळवेल. आणि अधिवेशनाच्या वेळी या विभागातील वैद्यकीय मदत देऊ शकणारा प्रशिक्षित कर्मचारी, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यानुसार साहाय्य करेल.
▪ रेस्टॉरंट: अनेक ठिकाणी, रेस्टॉरंटमधील सेवेच्या आधारावर बक्षीस देण्याची पद्धत आहे.
▪ हॉटेल: (१) तुमच्या आवश्यकतेपेक्षा अधिक खोल्यांचे आरक्षण करू नका; आणि, जितक्यांना राहायची परवानगी आहे त्यापेक्षा अधिक लोकांना तुमच्या खोलीत ठेवू नका. (२) तुम्हाला तुमचे आरक्षण रद्द करायचे असेल तर हॉटेल व्यवस्थापकांना होता होईल तितक्या लवकर कळवा. (३) स्वयंपाक करण्याची परवानगी नसलेल्या खोल्यांमध्ये स्वयंपाक करू नका. (४) प्रत्येक दिवशी, हॉऊस्कीपरसाठी बक्षीस ठेवा. (५) हॉटेलमध्ये राहणाऱ्या पाहुण्यांच्या मानार्थ ठेवलेला जाणारा नाश्ता, कॉफी किंवा बर्फ यांचा दुरुपयोग करू नका. (६) हॉटेलच्या कर्मचाऱ्यांबरोबर वागताना, खासकरून हॉटेलमध्ये येण्याच्या व सोडण्याच्या सर्वात घाईच्या प्रसंगी आत्म्याची फळे दाखवा.