नवीन माहितीपत्रकाचे वितरण करण्याकरता खास मोहीम
१ जगाची परिस्थिती पाहून आज अनेक लोक अस्वस्थ आहेत. पण जगाची अशी अवस्था का झाली आहे, भवितव्यात काय होणार आहे आणि येणाऱ्या न्यायदंडातून वाचण्यासाठी आपण काय केले पाहिजे, हे फार कमी लोकांना माहीत आहे. (यहे. ९:४) आपल्या काळाचे महत्त्व ओळखण्यास त्यांना मदत करण्याकरता, एप्रिल १८ सोमवार ते मे १५ रविवार या काळादरम्यान जागृत राहा! या नवीन माहितीपत्रकाचे वितरण करण्याकरता एक खास मोहीम हाती घेतली जाईल.
२ घरोघरची सेवा करताना, पुनर्भेट देताना, अनौपचारिक किंवा सार्वजनिक ठिकाणी जसे की रस्त्यावर अथवा बाजारात साक्ष देताना हे माहितीपत्रक सादर करता येईल. परंतु, जागृत राहा! माहितीपत्रकाचे वितरण वाटेल तसे केले जाऊ नये. तर हे माहितीपत्रक फक्त अशाच लोकांना द्यावे ज्यांनी जागतिक घटनांविषयी बायबल काय म्हणते हे जाणण्याची खरी आस्था दाखवली आहे. संदेशाकडे जुजबी लक्ष देणाऱ्यांना माहितीपत्रकाऐवजी पत्रिका दिली तरी चालेल.
३ एखाद्या व्यक्तीचे लक्ष आकर्षित करण्यासाठी तुम्ही असे म्हणू शकता:
▪ “आज सर्वसामान्य असलेल्या गंभीर समस्या व धक्कादायक घटनांविषयी पुष्कळ लोकांना चिंता वाटते. [स्थानीय क्षेत्रात माहीत असलेले एखादे उदाहरण द्या.] बायबलमध्ये याविषयी भाकीत करण्यात आले आहे हे तुम्हाला माहीत होते का? [उत्तरासाठी थांबा. मग, उदाहरणाला लागू होईल असे एक उचित शास्त्रवचन जसे की मत्तय २४:३, ७, ८; लूक २१:७, १०, ११ किंवा २ तीमथ्य ३:१-५ वाचून दाखवा.] आपल्या काळांचा अर्थ आणि मानवजातीसाठी भविष्यात काय वाढून ठेवले आहे त्याच्याबद्दल बायबलमध्ये सांगितले आहे. तुम्हाला आणखी माहिती हवी आहे का? [उत्तर ऐका. खरोखर आस्था दाखवली तरच माहितीपत्रक द्या.] हे माहितीपत्रक विनामूल्य आहे. आमच्या जगभरातल्या कार्याला तुम्ही लहानशी देणगी देऊ इच्छित असाल तर आम्ही ती आनंदाने स्वीकारू.”
४ किंवा तुम्हाला ही सादरता प्रभावी वाटेल:
▪ “आज पुष्कळ लोक, जगात होणाऱ्या धक्कादायक घटनांमुळे किंवा त्यांच्या जीवनात झालेल्या दुःखदायक घटनांमुळे दुःखी आहेत. या गोष्टी होऊ नयेत म्हणून देव काही का करत नाही, असा प्रश्न पुष्कळांच्या मनात येतो. बायबल आपल्याला खात्री देते, की देव लवकरच मानवजातीची दुःखापासून सुटका करण्यासाठी कार्य करणार आहे. देव मानवजातीसाठी काय करणार आहे ते पाहा. [स्तोत्र ३७:१०, ११ वाचा.] तुम्हाला याविषयी आणखी माहिती घ्यायला आवडेल का?” वर सांगितल्याप्रमाणे संभाषण समाप्त करा.
५ माहितीपत्रक स्वीकारणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे नाव आणि पत्ता घेण्याचा प्रयत्न करा आणि त्या व्यक्तीची आस्था वाढवण्यासाठी पुनर्भेटीची योजना करा. हे तुम्ही कसे करू शकता यांबद्दलच्या सूचनांची चर्चा, नंतरच्या सेवा सभेतील भागात केली जाईल. पहिल्याच भेटीत त्या व्यक्तीने खूप आस्था दाखवल्यास तुम्ही लगेच, जागृत राहा! किंवा दुसऱ्या एखाद्या प्रकाशनातून जसे की अपेक्षा माहितीपत्रकातून बायबल अभ्यास सुरू करू शकता.
६ या लेखाची चर्चा ज्या सेवा सभेत होईल त्या सभेनंतर या नवीन माहितीपत्रकाच्या प्रती उपलब्ध केल्या जातील. मोहीमेच्या पहिल्या काही दिवसांत लागतील तितक्याच प्रती प्रचारकांनी व पायनियरांनी सुरुवातीला घ्याव्यात असे सुचवले जाते. यहोवाची स्तुती करण्याकरता व जगभरातील प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना मदत करण्याकरता केल्या जाणाऱ्या या खास कार्यावर यहोवाचा आशीर्वाद असो.—स्तो. ९०:१७.