जपून ठेवा
क्षेत्र सेवेकरता सुचवलेल्या काही सादरता
वेगवेगळ्या महिन्यांतील साहित्य सादरता घरमालकाला देताना पुढील सुचनांच्या आधारावर तुम्ही निरनिराळ्या प्रस्तावना तयार करू शकता.
यहोवाच्या जवळ या
“अनेक लोकांचा देवावर विश्वास आहे व देवासोबत एक घनिष्ठ नाते अनुभवण्याची त्यांची इच्छा आहे. देव स्वतःच आपल्याला त्याच्याजवळ येण्याचे निमंत्रण देतो याविषयी तुम्हाला माहीत होते का? [याकोब ४:८ वाचा.] आपल्याजवळ असलेल्या बायबलचा वापर करून देवाच्या जवळ येण्यास लोकांना मदत करण्याकरता या प्रकाशनाची रचना करण्यात आली आहे.” पृष्ठ १६ वरील १ ला परिच्छेद वाचा.
“आज सर्वत्र अन्याय घडताना दिसतो. अगदी या वचनात वर्णन केल्याप्रमाणेच घडत आहे. [उपदेशक ८:९ब.] बऱ्याच लोकांना यामुळे प्रश्न पडतो, की देवाला खरच आपली काळजी आहे का? [पृष्ठ ११९ वरील ४ थ्या परिच्छेदातील पहिली दोन वाक्ये वाचा.] देवाने काही काळापर्यंत अन्याय का चालू दिला आहे याविषयी या अध्यायात स्पष्टीकरण केले आहे.”
तुमच्याविषयी काळजी करणारा निर्माणकर्ता अस्तित्वात आहे का?
“मनुष्याला गोंधळून टाकणाऱ्या समस्या सोडवण्याकरता सर्वात उत्तम सल्ला आपल्याला कोठे मिळू शकतो? [उत्तर ऐकून घ्या. मग मत्तय ७:२८, २९ वाचा.] येशूने दिलेले डोंगरावरील प्रवचन ऐकल्यानंतर लोकांची काय प्रतिक्रिया होती याविषयी हे वर्णन आहे. इतरांनी या प्रवचनाविषयी काय म्हटले आहे पाहा. [पृष्ठ १५२ वरील विधानांकडे लक्ष वेधा.] या अध्यायात येशूचे जीवन व त्याच्या शिकवणुकींविषयी चर्चा केली आहे.”
“‘देव जर अस्तित्वात असेल, तर तो कधी जगातील दुःख व अन्याय काढून टाकेल का?’ [उत्तर ऐकून घ्या. मग प्रकटीकरण २१:३, ४ वाचा.] दुःखाचाच नव्हे तर त्याच्या उगमाचाही विनाश करण्याकरता देव नेमके काय करेल हे या पुस्तकात सांगण्यात आले आहे.” अध्याय १० दाखवा.
जागृत राहा!
“आज सर्वत्र आढळणाऱ्या गंभीर समस्यांविषयी व धक्कादायक घटनांविषयी बरेचजण काळजी व्यक्त करतात. [तुमच्या भागात घडलेले एखादे उदाहरण द्या.] या सर्व घटना, देवाचे सरकार लवकरच या पृथ्वीवरील सर्व कारभार हाती घेईल हे दाखवणाऱ्या जागतिक चिन्हात समाविष्ट आहेत हे तुम्हाला माहीत होते का? [उत्तर ऐकून घ्या. मग मत्तय २४:३, ७, ८; लूक २१:७, १०, ११ किंवा २ तीमथ्य ३:१-५ यांपैकी कोणतेही एक योग्य शास्त्रवचन वाचा.] आजच्या काळात या घटनांचा काय अर्थ आहे याविषयी जागरूक राहणे अत्यंत महत्त्वाचे का आहे याविषयी या माहितीपत्रकात सांगण्यात आले आहे.”
“आज बरेच लोक वरचेवर घडणाऱ्या धक्कादायक घटनांमुळे किंवा जीवनातील संकटांमुळे दुःखी झाले आहेत. काहीजण विचार करतात की देव अशा घटना का घडू देतो? बायबल आपल्याला दिलासा देते, की लवकरच देव मानवजातीच्या दुःखांचा अंत करेल. [प्रकटीकरण १४:६, ७ वाचा.] देव न्यायदंड बजावेल तेव्हा मानवजातीवर याचा कसा परिणाम होईल याविषयी हे वर्णन पाहा. [२ पेत्र ३:१०, १३.] या महत्त्वपूर्ण विषयावर हे माहितीपत्रक अधिक प्रकाश टाकते.”
सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान
“अशा सुरेख वातावरणात येऊन राहण्याचे तुम्हाला निमंत्रण देण्यात आले तर तुम्ही हे निमंत्रण स्वीकाराल का? [पृष्ठे ४-५ वरील चित्र दाखवून, घरमालकाचे उत्तर ऐकून घ्या.] अशा प्रकारच्या जीवनाचा सर्वकाळ उपभोग घेण्याकरता कशाची आवश्यकता आहे याविषयी देवाचे वचन काय म्हणते ते पाहा. [योहान १७:३ वाचा.] हे पुस्तक सार्वकालिक जीवनाकडे नेणारे ज्ञान मिळवण्यास तुमची मदत करेल.” पुढच्या भेटीत पहिल्या अध्यायातील पहिल्या पाच परिच्छेदांवर चर्चा करू असे घरमालकाला सांगा.
पृष्ठे १८८-९ वरील चित्र उघडून मथळ्यात विचारलेला प्रश्न घरमालकाला विचारा: “देवाच्या ज्ञानाने ही पृथ्वी परिपूर्ण होईल तेव्हा, अशा रम्य पृथ्वीवर राहण्याची आशा तुम्ही बाळगता का? [उत्तर ऐकून घ्या. मग यशया ११:९ वाचा.] त्या येणाऱ्या नव्या जगाबद्दल आणि तेथे राहण्याची संधी आपल्याला कशाप्रकारे मिळू शकेल याबद्दल बायबल काय म्हणते हे समजून घेण्याकरता हे पुस्तक तुम्हाला साहाय्य करेल.” पुढच्या भेटीत १ ल्या अध्यायातील परिच्छेद ११-१६ यांवर चर्चा करू असे घरमालकाला सांगा.
थोर शिक्षकापासून शिका
“या सुभाषिताप्रमाणे लोक आचरण करू लागले तर हे जग अधिक सुखकर ठिकाण होईल असे तुम्हाला वाटते का? [मत्तय ७:१२अ वाचा. मग उत्तर ऐकून घ्या.] या पुस्तकात इतिहासातल्या सर्वथोर शिक्षकाने शिकवलेले अनेक धडे दिलेले आहेत.” अध्याय १७ यातील चित्रे व त्याखालील मथळ्यांकडे लक्ष वेधा.
“आज अनेक आईवडील आपल्या मुलांवर उत्तम संस्कार करण्याचा प्रयत्न करतात. हे महत्त्वाचे आहे असे तुम्हाला वाटते का? [उत्तर ऐकून घ्या. मग नीतिसूत्रे २२:६ वाचा.] मुलांना अगदी लहान वयापासूनच वळण लावण्यास सुरुवात करण्याचे येथे आईवडिलांना प्रोत्साहन दिले आहे. आणि आपल्या मुलांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आईवडिलांना मदत करण्यासाठीच हे पुस्तक तयार केले आहे.” अध्याय १५ किंवा १८ यांतील चित्रे व त्यांच्या मथळ्यांकडे लक्ष वेधा.
“बरेचदा मुलांनी विचारलेले प्रश्न ऐकून आईवडील अवाक राहतात. या प्रश्नांपैकी काहींचे उत्तर देणे अतिशय अवघड जाते, नाही का? [उत्तर ऐकून घ्या. मग इफिसकर ६:४ वाचा.] हे पुस्तक आईवडिलांना आपल्या मुलांच्या प्रश्नांचे उत्तर देण्यास मदत करू शकते.” अध्याय ११ व १२ किंवा ३४-३६ यांपैकी कोणत्याही अध्यायांतील काही चित्रे व त्यांचे मथळे दाखवा.
जीवन—ते कसे आले? उत्क्रांतीने की निर्मितीने?
“आपल्या आसपास घडणाऱ्या गुन्हेगारीबद्दल व हिंसाचाराबद्दल सर्वांनाच काळजी वाटते नाही का? या समस्येवर कोणीही परिणामकारक उपाय काढू शकेल असे तुम्हाला वाटते का? [उत्तर ऐकून घ्या.] पण देवाजवळ या समस्येवर उपाय आहे.” पृष्ठ १९६ काढा; परिच्छेद १९ यात दिलेली नीतिसूत्रे २:२१, २२ ही वचने वाचा व त्यांवर खुलासा करा. अध्याय १६ चे शीर्षक दाखवा आणि पुस्तक सादर करा.
पृष्ठ ६ उघडा व असे म्हणा: “आपला हा सुंदर पृथ्वी ग्रह आणि त्यावरील जीवन अपघाताने अस्तित्वात आले असे बऱ्याच लोकांचे मत आहे. हे सर्व कसे अस्तित्वात आले असावे यासंबंधात कोणते स्पष्टीकरण मनाला पटण्याजोगे आहे असे तुम्हाला वाटते? [उत्तर ऐकून घ्या.] बायबलमध्ये एका सृष्टिकर्त्याविषयी जे सांगितले आहे त्यास पुष्टी देणारा भरमसाट पुरावा अस्तित्वात आहे. हा सृष्टिकर्ता सामर्थ्यशाली आहे आणि त्याचे आपल्यावर खूप प्रेम देखील आहे. तो खरा देव आहे आणि त्याचे नाव यहोवा आहे.” स्तोत्र ८३:१८ वाचा आणि सबंध पृथ्वीचे रूपांतर एका रम्य परादिसात करण्याच्या त्याच्या उद्देशाविषयी थोडक्यात स्पष्टीकरण द्या.
देवाचा मानवजातीने केलेला शोध
“आज असंख्य धर्म अस्तित्वात आहेत; यांपैकी कोणत्या धर्माला देवाची संमती आहे हे आपल्याला कसे ठरवता येईल याविषयी कधी तुम्ही विचार केला आहे का?” उत्तर ऐकून घेतल्यानंतर पृष्ठ ३७७ उघडा. ७ व्या मुद्द्याकडे लक्ष वेधून, खऱ्या धर्माने मानवजातीच्या सर्व वंशांना जवळ आणले पाहिजे या गोष्टीशी आपण सहमत आहात का असे घरमालकाला विचारा. उल्लेखित शास्त्रवचनांपैकी एक वाचा आणि वेळ असल्यास या यादीतील इतर मुद्द्यांवरही चर्चा करा. जर त्या व्यक्तीला खरोखर आस्था असेल, तर तिला पुस्तक द्या. निघताना, तुम्ही त्यांच्यापुढे एक प्रश्न मांडू शकता, “खऱ्या धर्माचा एका व्यक्तीच्या आचरणावर कसा परिणाम होण्यास हवा?” या प्रश्नाचे उत्तर देण्याकरता पुनर्भेटीची वेळ ठरवून घ्या.
आपण अमुक अमुक धर्माचे सदस्य आहोत असे घरमालकाने सांगितल्यास तुम्ही असे म्हणू शकता: “निरनिराळ्या धर्माच्या लोकांना भेटणे हा एक रोचक अनुभव आहे. देवाच्या शोधात मानवाने अनेक मार्ग पत्करले आहेत. [योग्य वाटल्यास, प्रेषितांची कृत्ये १७:२६, २७ वाचा.] सहसा लोक आपल्या आईवडिलांचाच धर्म अनुसरतात. [पृष्ठ ८ वरील १२ वा परिच्छेद वाचा.] इतर धर्मांबद्दल शिकून घेतल्याने आपल्या ज्ञानात भर पडते. या पुस्तकात जगातील मुख्य धर्मांचा उगम, त्यांतील चालीरिती व शिकवणुकी यांबद्दल माहिती दिली आहे.” त्या व्यक्तीच्या धर्मासंबंधी पुस्तकात कोणती माहिती आहे हे उदाहरणादाखल दाखवा: शीख धर्म (१००-१); हिंदू धर्म (११६-१७); बौद्ध धर्म (१४१); ताओवाद (१६४-६); कन्फुशियनवाद (१७७); शिन्टो धर्म (१९०-५); यहुदी धर्म (२२०-१); व मुस्लिम धर्म (२८९).
प्रकटीकरण—याचा भव्य कळस जवळ आहे!
“[अलीकडील एखाद्या बातमीचा उल्लेख करा] याविषयी तुम्ही ऐकले असेल. लोकांचा असा नाहक बळी जातो तेव्हा बरेच जण त्यांच्या कुटुंबियांचा विचार करतात. या कुटुंबांना कशाप्रकारे सांत्वन दिले जाऊ शकते? तुम्हाला काय वाटते?” उत्तर ऐकून घ्या. मग पृष्ठ २९९ उघडून तेथे दाखवलेले पुनरुत्थानाचे चित्र दाखवा. पुढे तुम्ही असे म्हणू शकता: “पृथ्वीवर येणार असलेल्या परादिसात चांगले व वाईट अशा दोन्ही प्रकारच्या लोकांना पुन्हा जिवंत केले जाईल याविषयी बरेच जण आश्चर्य व्यक्त करतात. [पृष्ठ २९७ वरील ९ व्या परिच्छेदात दिलेले प्रेषितांची कृत्ये २४:१५ हे वचन वाचा आणि मग परिच्छेद १० मध्ये सांगितल्याप्रमाणे स्पष्टीकरण द्या.] या पुस्तकात भविष्याबद्दल असलेल्या देवाच्या उद्देशाविषयी बरीच रोमांचक माहिती दिली आहे.”
बायबल—देवाचे वचन की मानवाचे?
“आजच्या या काळात सर्वांनाच गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागते. बरेचजण मार्गदर्शनाकरता वेगवेगळ्या सल्लागारांकडे वळतात. काहीजण मांत्रिकांची मदत घेतात. आपल्याला उपयोगी पडू शकेल असा उत्तम सल्ला आपल्याला कोठे सापडू शकतो असे तुम्हाला वाटते? [उत्तर ऐकून घ्या.] बायबलमध्ये एक महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे व तिची आपण सर्वांनीच दखल घेतली पाहिजे. [२ तीमथ्य ३:१६ वाचा. मग पृष्ठ १८७ उघडून ९ वा परिच्छेद वाचा.] बायबलमध्ये सांगितलेल्या सल्ल्याचे पालन केल्याने नेहमीच उत्तम परिणाम घडून येतात ही गोष्ट समजून घेण्यास हे पुस्तक तुम्हाला साहाय्य करेल.”
सर्वकाळातील सर्वश्रेष्ठ मनुष्य
“विशेषतः या सणासुदीच्या काळात बहुतेक लोक येशूबद्दल विचार करतात. पण जगात घडणाऱ्या भयानक घटनांमुळे काहीजण विचार करतात, की येशूला खरंच आपल्याविषयी काळजी वाटत असेल का? तुमचे याविषयी काय मत आहे?” उत्तर ऐकून घ्या. २४ वा अध्याय उघडा आणि येशू या पृथ्वीवर का आला होता याविषयी थोडक्यात चर्चा करा. मग योहान १५:१३ वाचा आणि येशूला इतरांविषयी वाटणाऱ्या मनःपूर्वक प्रीतीवर जोर द्या.
“येशू ख्रिस्ताचा उल्लेख केल्यास, बऱ्याच जणांच्या डोळ्यांपुढे बाळ येशूचे किंवा मरणासन्न असलेल्या असहाय्य येशूचे चित्र येते. येशूबद्दल विचार करताना ते केवळ त्याचा जन्म व मृत्यू या दोनच घटना लक्षात घेतात. पण या पृथ्वीवर असताना त्याने ज्या अद्भूत गोष्टी सांगितल्या व जी अद्भूत कार्ये केली त्यांकडे सहसा दुर्लक्ष केले जाते. खरे पाहता, त्याने जे साध्य केले आहे त्यामुळे आजवर पृथ्वीवर जिवंत राहिलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर प्रभाव पडतो. म्हणूनच त्याने आपल्याकरता केलेल्या अद्भूत गोष्टींविषयी शक्य तितके जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे.” योहान १७:३ वाचा. मग प्रस्तावनेचे पहिले पान उघडून चवथा परिच्छेद वाचा.
देव आपल्याकडून काय अपेक्षितो?
“सर्वत्र समस्या असलेल्या अशा जगात आपण राहावे अशी देवाची इच्छा असावी का? [उत्तर ऐकून घ्या. मग मत्तय ६:१० वाचा.] देवाचे राज्य म्हणजे नेमके काय याचा कधी तुम्ही विचार केला आहे का?” ६ व्या पाठाकडे वळा आणि पाठाच्या सुरुवातीला विचारलेले प्रश्न वाचा. पाठावर चर्चा करण्यास सुरुवात करा किंवा पुढच्या भेटीत ही चर्चा करण्याविषयी घरमालकाला सांगा.
“आधुनिक मानव समाजाने बरीच प्रगती केली आहे, पण तरीसुद्धा आजारपण व मृत्यू यांमुळे मानवजातीला बरेच दुःख सोसावे लागत आहे. जे आजारी, वृद्ध, इतकेच काय तर जे मेलेले आहेत अशा लोकांकरताही येशू काय करेल हे तुम्हाला माहीत आहे का?” उत्तर ऐकून घ्या. जर त्या व्यक्तीला या प्रश्नाचे उत्तर जाणून घ्यायचे असेल, तर ५ वा पाठ उघडून परिच्छेद ५-६ यांवरील प्रश्न वाचा. या परिच्छेदांची चर्चा करा किंवा पुढच्या भेटीत ही चर्चा करू असे सांगा.
एकमात्र खऱ्या देवाची उपासना करा
“तुम्हाला काय वाटतं, जीवनाच्या दबावांना तोंड देताना आपण कोणाकडून मदतीची अपेक्षा करू शकतो? [उत्तर ऐकून घ्या. मग रोमकर १५:४ वाचा.] देवप्रेरित शास्त्रवचनांत, कठीण प्रसंगांना तोंड देण्यास आपले साहाय्य करू शकेल असे मार्गदर्शन, सांत्वन व आशा सापडते. बायबल वाचनातून आपल्याला पुरेपूर फायदा कसा मिळवता येईल याविषयी या पुस्तकात काही मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत.” पृष्ठ ३० वरील चार मुद्द्यांकडे लक्ष वेधा.
“येशू या पृथ्वीवर होता, त्या काळापासूनच अनेक लोक देवाचे राज्य यावे अशी प्रार्थना करत आहेत. ते राज्य आल्यामुळे मानवांच्या जीवनावर काय परिणाम होईल असे तुम्हाला वाटते? [उत्तर ऐकून घ्या. मग दानीएल २:४४ वाचा.] देवाचे राज्य म्हणजे काय, हे राज्य कोणकोणत्या गोष्टी साध्य करेल, तसेच देवाच्या राज्याच्या नीतिमान शासनाद्वारे आपल्याला कोणता फायदा होऊ शकतो याविषयी या पुस्तकात खुलासा केला आहे.” ९२-३ पृष्ठांवरील चित्र दाखवा.