नातेवाईकांना साक्ष देणे—कसे?
१. नातेवाईकांना साक्ष देताना समजदारीची का गरज आहे?
१ आपल्या प्रिय जनांबरोबर नवीन जगात प्रवेश करून त्यांच्याबरोबर यहोवाची उपासना करण्यापेक्षा अधिक आनंददायक काय असू शकते! आपल्या नातेवाईकांना साक्ष दिल्यानेही आनंददायक आशा, वास्तविकतेत उतरू शकते. पण नातेवाईकांना आवडेल अशा पद्धतीने साक्ष देण्याकरता समजदारीची गरज आहे. एका प्रवासी पर्यवेक्षकांनी असे निरीक्षण केले: “आपल्या नातेवाईकांना अधूनमधून थोड्या प्रमाणात साक्ष देऊन त्यांची जिज्ञासा वाढवणाऱ्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.” आपल्याला हे कसे करता येईल?
२. आपल्या नातेवाईकांबद्दल प्रामाणिक आस्था बाळगल्यामुळे, त्यांची जिज्ञासा जागवण्यास कशामुळे मदत होऊ शकते?
२ त्यांची जिज्ञासा जागवा: आपल्या नातेवाईकांमध्ये कशा प्रकारे आस्था जागवता येईल यावर काळजीपूर्वक विचार करा. (नीति. १५:२८) त्यांना कशाविषयी काळजी आहे? ते कोणत्या समस्यांना तोंड देत आहेत? तुम्ही कदाचित त्यांच्या आवडीच्या विषयावर, जसे की प्रकाशनांमध्ये आलेली माहिती किंवा एखादे उचित शास्त्रवचन त्यांना दाखवू शकता. जर तुमचे नातेवाईक दूर राहत असतील तर तुम्ही हे पत्राद्वारे किंवा फोनद्वारे करु शकता. त्यांच्यावर दडपण न आणता, सत्याचे बी पेरा व वाढीसाठी यहोवावर विसंबून राहा.—१ करिंथ. ३:६.
३. नातेवाईकांना आपल्याबद्दल वाटणाऱ्या आस्थेमुळे, त्यांना साक्ष देण्यासाठी मार्ग कसा खुला होऊ शकतो?
३ एका भूतग्रस्त माणसातून अनेक दुरात्मे काढल्यानंतर येशूने त्याला असे सांगितले: “तू आपल्या घरी स्वकीयांकडे जा: प्रभूने तुझ्यासाठी केवढी मोठी कामे केली व तुझ्यावर कशी दया केली हे त्यांना सांग.” (मार्क ५:१९) या माणसाच्या नातेवाईकांवर याचा किती विलक्षण परिणाम झाला असेल याची कल्पना करा! तुमच्याकडे नातेवाईकांना सांगण्यासाठी असा विलक्षण अनुभव नसेल, तरीही त्यांना तुमच्या किंवा तुमच्या मुलांच्या जीवनातील घडामोडींमध्ये साहजिकच रस असेल. तेव्हा, तुम्ही त्यांना ईश्वरशासित सेवा प्रशालेत झालेल्या आपल्या भाषणाबद्दल, किंवा तुम्ही उपस्थित राहिलेल्या संमेलनाबद्दल, बेथेल गृहाला दिलेल्या भेटीबद्दल किंवा तुमच्या जीवनातील एखाद्या महत्त्वपूर्ण घटनेबद्दल सांगू शकता. याकरवी यहोवा व त्याच्या संघटनेविषयी त्यांना अधिक माहिती देण्यासाठी मार्ग खुला होण्याची शक्यता आहे.
४. नातेवाईकांना साक्ष देताना कोणते धोके टाळण्याची गरज आहे?
४ समजदारी दाखवा: नातेवाईकांना साक्ष देताना, सर्व काही एकाच वेळी सांगण्याचे टाळा. बायबलचा अभ्यास करण्यास नवीनच सुरुवात केली तेव्हाची आठवण करताना, एका बांधवाने कबूल केले: “मी माझ्या आईला बायबलमधून शिकलेल्या जवळ जवळ सर्व गोष्टींवर कित्येक तास स्पष्टीकरण द्यायचो व ह्यामुळे कित्येकदा वादविवाद व्हायचे, खासकरून माझ्या वडिलांबरोबर.” एखाद्या नातेवाईकाने बायबलच्या संदेशाविषयी आस्था दाखवली तरीसुद्धा, अशाप्रकारे उत्तर द्या की ज्यामुळे त्यांच्यामध्ये आणखी जाणून घेण्याची इच्छा निर्माण होईल. (नीति. २५:७) तसेच, सेवा कार्यात अनोळखी व्यक्तीशी बोलताना ज्याप्रमाणे तुम्ही आदर, नम्रता व सहनशीलता दाखवता, त्याचप्रमाणे नातेवाईकांशी बोलतानाही दाखवण्यास विसरू नका.—कलस्सै. ४:६
५. सत्याविषयी सांगत असताना नातेवाईक ऐकत नसतील तर आपण काय केले पाहिजे?
५ एके प्रसंगी येशूचे नातलग त्याला वेड लागले आहे असा विचार करत होते. (मार्क ३:२१) पण नंतर, त्यांच्यापैकी काहींनी विश्वास ठेवला. (प्रे. कृत्ये १:१४) नातेवाईकांना सत्याविषयी सांगण्याचे तुमचे सुरुवातीचे प्रयत्न अयशस्वी ठरले असतील तरीही, प्रयत्न करण्याचे सोडू नका. कारण परिस्थिती व मनोवृत्ती बदलत असते. त्यांची जिज्ञासा जागेल असे मुद्दे त्यांना दाखवण्याची संधी शोधत राहा. असे केल्यामुळे, त्यांना सार्वकालिक जीवनाच्या मार्गावर चालण्यास मदत करण्याचा आनंद तुम्ही अनुभवू शकाल.—मत्त. ७:१३, १४.