तुमच्या नातेवाईकांबद्दल काय?
१ आपल्यातील बहुतेकांना सत्यात नसलेले अनेक नातेवाईक आहेत. या प्रिय जनांनी जीवनाच्या मार्गावर यावे असे आपल्या सर्वांना किती वाटते! आणि ते आपल्याच घरातील सदस्य असल्यावर त्यांच्या सार्वकालिक भवितव्याची आपल्याला जास्तच चिंता लागते. सत्यामध्ये त्यांची गोडी वाढवण्याचा आपण अनेक वर्षांपासून प्रयत्न केला असला तरी, परिस्थिती हाताबाहेर गेली आहे असा आपण मुळीच निष्कर्ष काढू नये.
२ येशू प्रचार करीत होता तेव्हा “त्याचे भाऊहि त्याच्यावर विश्वास ठेवीत नव्हते.” (योहा. ७:५) एकदा तर त्याच्या नातेवाईकांना वाटले, की त्याला वेड लागले आहे. (मार्क ३:२१) तरीसुद्धा, येशूने त्यांना सोडून दिले नाही. कालांतराने, त्याच्या भावांनी सत्याचा स्वीकार केला. (प्रे. कृत्ये १:१४) त्याचा सावत्र भाऊ याकोब ख्रिस्ती मंडळीमध्ये आधारस्तंभ बनला. (गलती. १:१८, १९; २:९) तुमच्या नातेवाईकांनी सत्याचा स्वीकार केल्याचा आनंद तुम्हाला अनुभवायचा आहे तर राज्याची सुवार्ता त्यांच्यापर्यंत पोहंचवण्याचा प्रयत्न करण्याचे केव्हाही थांबवू नका.
३ जेरीस आणणारे नव्हे तर उत्तेजक असा: येशूने इतरांना प्रचार केला तेव्हा त्याच्या श्रोत्यांना दबल्याप्रमाणे नव्हे तर ताजेतवाने वाटले. (मत्त. ११:२८, २९) त्यांच्या आकलनापलीकडील शिक्षण देऊन त्याने त्यांच्यावर दडपण आणले नाही. तुमच्या नातेवाईकांना ताजेतवाने करण्यासाठी एकावेळी एक कपभर सत्याचे पाणी द्या, त्यांच्यावर संपूर्ण बादलीच ओतू नका! एका प्रवासी पर्यवेक्षकांनी असे निरीक्षण केले: “आपल्या नातेवाईकांना थोड्या थोड्या प्रमाणात साक्ष देऊन त्यांची जिज्ञासा वाढवणाऱ्यांनी उत्तम परिमाण साध्य केले आहेत.” अशा प्रकारे, विरोध करणारेही प्रश्न विचारू लागतील आणि कालांतराने सत्याची त्यांची तहान वाढेल.—१ पेत्र २:२, ३; पडताळा १ करिंथकर ३:१, २.
४ अनेक विवाहित ख्रिश्चनांनी, सत्यात नसलेल्या आपल्या सोबत्याला आवडतील असे प्रकाशनातील विषय उघडून ठेवण्याद्वारे प्रभावीपणे साक्ष दिली आहे. असे करणाऱ्या एका भगिनीने तर आपल्या पतीला ऐकू येईल अशा मोठ्या आवाजात त्याचा फायदा होऊ शकेल अशी स्पष्टीकरणे देत आपल्या मुलांबरोबर अभ्यास केला. कधी कधी ती त्याला विचारत असे: “मी माझ्या आजच्या अभ्यासात अमुक अमुक शिकले. तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटते?” तिच्या पतीने सरतेशेवटी सत्य स्वीकारले.
५ आदराने वागा, उतावळे होऊ नका: एक प्रचारक भगिनी म्हणते, की “नातेवाईकांनाही आपले दृष्टिकोन व मत मांडण्याचा अधिकार आहे.” यास्तव, जेव्हा ते आपले विचार मांडत असतात किंवा आपण त्यांच्याशी सत्याविषयी काही बोलू नये असे स्पष्टपणे आपल्याला सांगतात तेव्हा आपण त्यांचा आदर करावा. (उप. ३:७; १ पेत्र ३:१५) सहनशील, प्रेमळ आणि चांगले ऐकणारे होण्याद्वारे मार्मिक साक्ष देण्याकरता आपण उचित संधींची वाट पाहू शकतो. अशा प्रकारची सहनशीलता प्रतिफलदायी ठरू शकते. सत्यात नसलेल्या आपल्या पत्नीची २० वर्षे गैरवागणूक सहन करणाऱ्या ख्रिस्ती पतीच्या बाबतीत हे आपल्याला दिसून येते. तिच्यात बदल होऊ लागले तेव्हा तो म्हणाला: “यहोवाने मला सहनशीलता विकसित करण्यासाठी मदत केल्याबद्दल मी त्याचे किती आभार मानतो, कारण आता मला त्याचा परिणाम दिसतो: माझ्या पत्नीने जीवनाच्या मार्गावर चालण्यास सुरवात केली आहे!”
६ तुमच्या नातेवाईकांबद्दल काय? कदाचित, तुमच्या उत्तम ख्रिस्ती वर्तणुकीद्वारे व त्यांच्यासाठी तुमच्या प्रार्थनांद्वारे तुम्ही “त्यांना यहोवासाठी मिळवू शकाल.”—१ पेत्र ३:१, २, NW तळटीप.