यहोवाच्या साक्षीदारांचे २००५ “देवाच्या आज्ञेत राहा” प्रांतीय अधिवेशन
१ आपला महान शिक्षक या नात्याने यहोवा, त्याच्या मार्गांचे प्रशिक्षण देण्याकरता आपल्याला एकत्र आणण्याची व्यवस्था करतो. (यश. ३०:२०, २१; ५४:१३) असे तो विश्वासू आणि बुद्धिमान दासाकरवी करतो; हा दासवर्ग, वार्षिक प्रांतीय अधिवेशनांची योजना करून अशा सभा भरवतो. (मत्त. २४:४५-४७) स्तोत्रकर्त्याप्रमाणे आपल्याही भावना आहेत ज्याने असे गायिले: “जनसभांत मी परमेश्वराचा धन्यवाद करीन.” (स्तो. २६:१२) यहोवाकडून प्रशिक्षण प्राप्त करण्याचे महत्त्व दावीदाला स्पष्टपणे समजले होते. त्यामुळेच त्याने, यहोवाचे लोक जेव्हा जेव्हा एकत्र जमतील तेव्हा तेव्हा त्यांच्याबरोबर राहण्याचा दृढनिश्चय केला होता.
२ या वर्षी होणाऱ्या “देवाच्या आज्ञेत राहा” प्रांतीय अधिवेशनाला उपस्थित राहणाऱ्या “जनसभांत” तुम्हीही असाल का? असल्यास, पुढील माहिती तुम्हाला, या अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी तयारी करताना उपयोगी पडेल.
३ प्रत्येक दिवशी उपस्थित राहण्याची आताच योजना करा: “उद्योग्याचे विचार समृद्धि करणारे असतात.” (नीति. २१:५) हे शब्द, अधिवेशनाला उपस्थित राहण्याच्या योजना करण्यात विलंब न करण्याच्या महत्त्वावर जोर देत नाहीत का? आध्यात्मिक अर्थाने तजेला देणाऱ्या कार्यक्रमातील एकही भाग चुकू नये म्हणून, तिन्ही दिवशी हजर राहण्यासाठी तुम्हाला कराव्या लागणाऱ्या ज्या काही व्यवस्था आहेत त्या आताच सुरू करणे सुज्ञपणाचे आहे. ठिकठिकाणी, सुट्या आणि शाळेच्या परीक्षा यांत फरक असल्यामुळे, सर्वांना सोयीस्कर ठरणारी एक वेळ ठरवणे कठीण आहे. त्यामुळे, या वर्षापासून अधिवेशने लवकर भरवण्याचा अर्थात पावसाळ्यात भरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे; कारण पावसाळ्यात, ट्रेन-बसेसचे आरक्षण मिळणे, हॉटेल्समध्ये खोल्या मिळणे व सभागृहे मिळणे कठीण नसते. यासाठी आपल्याला अधिक तयारी करावी लागेल, यात काही शंका नाही. रजेसाठी तुम्हाला तुमच्या बॉसशी बोलावे लागणार असेल, तर आताच बोला. सत्यात नसलेल्या तुमच्या विवाह सोबत्याशी तुम्हाला तुमच्या योजनांविषयी चर्चा करावी लागणार असेल तर, शेवटल्या मिनिटापर्यंत थांबून राहू नका. यहोवाच्या मदतीने तुमचे सर्व “बेत सिद्धीस जातील” हा भरवसा बाळगून तुमच्यासमोर येणाऱ्या सर्व छोट्या-मोठ्या अडचणी यहोवाला प्रार्थनेत सांगा. (नीति. १६:३) तसेच, तुम्ही तुमच्या बायबल विद्यार्थ्यांना देखील तयारी करायला मदत करू शकता जेणेकरून ते देखील प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आतापासूनच तयारी करू लागतील.
४ तुमच्या राहण्याची सोय: अधिवेशन होणाऱ्या प्रत्येक शहरात, तुमच्या सोयीसाठी राहण्याच्या व्यवस्था केल्या जात आहेत. उपलब्ध असलेल्या हॉटेल्सची यादी, मिळाल्याबरोबर माहितीफलकावर लावली जाईल. बहुतेकदा रूमींग डिपार्टमेंटमधील बांधव, अधिवेशनाला येणाऱ्यांसाठी खोल्यांचा दर कमी करतात. त्यामुळे यादीतील हॉटेलला किंवा लॉजला तुम्ही फोन कराल तेव्हा त्यांना सांगा की तुम्ही अधिवेशनाला उपस्थित राहणार आहात आणि बांधवांनी ठरवलेला दरच देण्यास कबूल व्हा. ठरलेल्या दरानुसार खोली देण्यास हॉटेलचा मालक तयार होत नसेल तर तुमच्या मंडळीच्या सचिवांद्वारे रूमींग डिपार्टमेंटला कळवा. तुम्ही सहकार्य दिल्यास, शाखा दफ्तराला कमी दरात उत्तम हॉटेलमध्ये खोल्यांचे आरक्षण करणे शक्य होईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे; ती अशी की चांगल्या दर्जाचे हॉटेल्स नेहमीच, अधिवेशन स्थळापासून जवळ नसतील. तुमच्या खोल्यांचे बुकींग करण्यासाठी तुम्ही फोन कराल त्याआधी, “रुमींग व्यवस्थेला तुम्ही सहकार्य कसे देऊ शकता,” या चौकोनातील मुद्दे वाचून काढा. फोन करताना, “हॉटेलची खोली आरक्षित करण्याचा सर्वात उत्तम मार्ग कोणता?” या चौकोनातील सूचना पाळा.
५ खास गरजा: प्रेषित पौलाने विशिष्ट बांधवांचा उल्लेख, “फार मोठा आधार” असा केला. (कलस्सै. ४:७-११, ईजी टू रीड) त्यांनी पौलाला दिलेल्या साहाय्यांपैकी एक म्हणजे, त्यांनी पौलाला व्यक्तिगत मदत दिली. अधिवेशनात तुम्ही इतरांना “आधार” कसे देऊ शकाल? वृद्ध प्रचारकांना, आजारी बंधूभगिनींना, पूर्ण वेळेत असलेल्या बंधूभगिनींना आणि इतरांना व्यावहारिक मदतीची आवश्यकता असेल; जसे की अधिवेशनाला जाण्या-येण्यासाठी त्यांना मदत हवी असेल किंवा त्यांना राहण्याची सोय हवी असेल. अशा लोकांची काळजी घेण्याची प्रथम जबाबदारी नातेवाईकांची आहे. (१ तीम. ५:४) ते करू शकत नसतील तर स्थानीय मंडळीतील सहउपासक असे करू शकतात. (याको. १:२७) पुस्तक अभ्यास पर्यवेक्षकांनी, आपल्या गटात ज्यांना खास आवश्यकता आहे अशांनी अधिवेशनाच्या बऱ्याच आधी व्यवस्था केली आहे की नाही याची खात्री करावी.
६ खास गरजा रूम विनंती अर्ज, केवळ अशा प्रचारकांना मिळतील ज्यांच्या राहण्याची व्यवस्था त्यांचे कौटुंबिक सदस्य किंवा मंडळीतील कोणी करू शकणार नाहीत. मंडळीतील सेवा समितीने, फॉर्मवरील सूचनांनुसार व सर्व वडिलांना डिसेंबर १४, २००४ तारखेच्या पत्रानुसार प्रचारकाच्या पात्रतेविषयी विचारविनिमय करावा. ही तरतूद केवळ अशा प्रचारकांसाठी आहे ज्यांचे आचरण उत्तम आहे आणि ज्यांच्या मुलांचेही वर्तन उत्तम आहे.
७ दुसऱ्या अधिवेशनाला जाणे: या वर्षी, अनेक अधिवेशने इंग्रजीत होणार आहेत. तेथेच स्थानीय भाषेत होणाऱ्या अधिवेशनातील उपस्थितीत घट करण्याच्या उद्देशाने आम्ही असे उत्तेजन देत आहोत, की ज्यांना इंग्रजी भाषा चांगल्याप्रकारे समजते व बोलता येते त्यांनी इंग्रजी अधिवेशनाला उपस्थित राहावे; या बंधूभगिनींच्या मंडळीला स्थानीय भाषेत होणाऱ्या अधिवेशनाला उपस्थित राहण्यास नेमण्यात आलेले असले तरी त्यांनी इंग्रजी अधिवेशनाला उपस्थित राहावे. पुरेशी आसने, साहित्य, राहण्याकरता खोल्या वगैरे, आहे की नाही याची खात्री करण्यासाठी प्रचारकांना असे उत्तेजन दिले जात आहे. तुम्ही इंग्रजी अधिवेशनाला उपस्थित राहणार असाल तर कृपया भारतासाठी आयोजित केलेल्या अधिवेशन ठिकाणांच्या पत्त्यांसाठी आमची राज्य सेवा याचा एप्रिल २००५ अंक पाहा. सुचवलेल्या लॉजेसची यादी हवी असेल किंवा कोणतीही अधिक माहिती हवी असेल तर सोबत, एक रिकामे पाकीट पाठवा ज्यावर पोस्टाचे तिकिट लावलेले आणि तुमचा पत्ता लिहिलेला असावा. शहरात एकापेक्षा अधिक अधिवेशने होणार असतील तर तुम्ही कोणत्या अधिवेशनाला उपस्थित राहणार आहात त्याची तारीख स्पष्ट लिहा.
८ स्वयंसेवकांची गरज आहे: इतरांच्या गरजांकडे नम्रपणे लक्ष देण्याबाबतीत येशू ख्रिस्ताने परिपूर्ण उदाहरण मांडले. (लूक ९:१२-१७; योहान १३:५, १४-१६) अधिवेशनांत काम करण्याची स्वेच्छा दाखवणारे येशूप्रमाणेच मनोवृत्ती दाखवतात. अधिवेशन विभागांतील कामे करण्यासाठी, स्थानीय अधिवेशन समित्या, आपल्याबरोबर इतरांना कार्य करण्यास बोलवतील. स्वेच्छेने कार्य करण्यास व नेमणुका स्वीकारण्यास वडिलांची खास गरज आहे. त्यांनी दाखवलेला स्वेच्छेचा आत्मा, मंडळीतील सर्वांसाठी एक उत्तम उदाहरण ठरतो.—१ पेत्र ५:२, ३.
९ इतरजण काय पाहतात: एका हॉटेल सेल्स मॅनेजरने म्हटले: “तुम्ही लोक, आमचे आवडते लोक आहात. इतर लोकांच्या तुलनेत तुम्ही खूप सभ्य लोक आहात. हॉटेलमध्ये काम करणारे सर्व कर्मचारी सांगतात, की तुम्ही त्यांच्याशी दयाळुपणे वागता आणि त्यांना बक्षीसही देता. खरं तर, तुम्ही लोक हॉटेलमध्ये असता त्या शनिवार रविवारी, सर्वांनाच काम करावसं वाटतं.” दुसऱ्या एका हॉटेलच्या प्रतिनिधीने म्हटले: “यहोवाचे साक्षीदार म्हणजे, कसलीही कटकट नसलेले लोक.” तुमच्या अनुकरणीय वर्तनामुळे लोकांनी असे उद्गार काढले असावेत. आपण जेव्हा अशाप्रकारे वागून यहोवाच्या नावाला गौरव आणतो तेव्हा यहोवाला किती आनंद होत असेल, याची कल्पना करा!—१ पेत्र २:१२.
१० या वर्षी, आपल्या लोकांना आध्यात्मिक प्रशिक्षणासाठी एकत्र करण्याकरता, यहोवा देवाने ‘विश्वासू कारभाऱ्याद्वारे’ योजना केली आहे. (लूक १२:४२) तिन्ही दिवशी हजर राहण्यासाठी व्यवस्था करण्याकरता तुम्हाला परिश्रम जरुर करावे लागतील परंतु तुमच्या परिश्रमांचे चीज होईल. या वर्षीचे “देवाच्या आज्ञेत राहा” प्रांतीय अधिवेशन, यहोवा देवाची आता आणि चिरकाल सेवा करत राहण्याचा आपला दृढनिश्चय निश्चित्तच आणखी पक्का करेल. तेव्हा, स्तोत्रकर्त्याच्या आर्जवानुसार आपण ‘देवाचा जनसभात धन्यवाद’ करण्याचा पक्का निश्चय करू या.—स्तो. ६८:२६.
[३ पानांवरील चौकट]
कार्यक्रमांच्या वेळा
शुक्रवार आणि शनिवार
सका. ९:३० पासून - संध्या. ५:०५ पर्यंत.
रविवारी
सका. ९:३० पासून - संध्या. ४:१० पर्यंत.
[४ पानांवरील चौकट]
रुमींग व्यवस्थेला तुम्ही सहकार्य कसे देऊ शकता
▪ यादीतील हॉटेल्सशी संपर्क साधण्याची व्यवस्था स्वतः करा. तुम्ही एकतर त्यांना फोन करू शकता किंवा व्यावहारिक असेल तर व्यक्तिशः भेट देऊ शकता.
▪ हॉटेल व्यवस्थापनाला तुमच्या गरजा स्पष्ट शब्दांत सांगा. एकाच खोलीत तुम्ही ज्यादा लोक (मुले आणि प्रौढ) राहू इच्छित आहात, हे त्यांना सांगा.
▪ यादीत सुचवलेल्या हॉटेल्सना फोन केल्यावर तुम्हाला समजले, की खोल्या उपलब्ध नाहीत किंवा हॉटेलशी तुम्हाला काही समस्या असतील तर तुमच्या मंडळीच्या सचिवांना कळवा. ते, यादीच्या वरच्या बाजूला असलेल्या माहितीच्या आधारावर तुमच्या अधिवेशनाच्या रुमींग विभागाशी संपर्क साधतील. आणि तुम्हाला आणखी हॉटेल्सची नावे दिली जातील.
▪ तुम्हाला जितक्या खोल्या लागतील तितक्याच खोल्यांचे आरक्षण करा.
▪ तुमच्या आरक्षणाची खात्री मिळण्यासाठी तुम्ही प्रत्येक खोलीसाठी डिपॉझिट द्यावे. नाहीतर हॉटेल, तुमची खोली कोणा दुसऱ्याला देऊ शकते.
▪ तुम्ही पहिल्यांदा जेथे आरक्षण करता, तेथेच राहा. तुम्हाला दुसरे आणखी चांगले हॉटेल मिळाले, असे कारण सांगून हॉटेल बदलू नका.
[४ पानांवरील चौकट]
हॉटेलची खोली आरक्षित करण्याचा सर्वात उत्तम मार्ग कोणता?
१. उपलब्ध असलेल्या हॉटेल्सच्या यादीवर दिलेल्या टेलिफोन नंबरवर, हॉटेलच्या कामाच्या वेळेदरम्यान फोन करा.
२. तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांच्या अधिवेशनासाठी येत आहात, हे त्यांना सांगा.
३. तुम्ही हॉटेलमध्ये केव्हा येणार आणि हॉटेल केव्हा सोडणार, याची निश्चित वेळ त्यांना सांगा.
४. एका हॉटेलमध्ये खोल्या उपलब्ध नसतील तर यादीतील दुसऱ्या हॉटेलमध्ये प्रयत्न करा.
५. यादीवर दाखवण्यात आलेल्या भाड्यापेक्षा अधिक भाडे सांगितल्यास खोली आरक्षित करू नका.
६. खोल्यांचे आरक्षण करा आणि दहा दिवसांच्या आत डिमांड ड्राफ्ट किंवा मनी ऑर्डर पाठवा. रोख रक्कम कधीच पाठवू नका.
७. आरक्षण केल्याची पावती आणि लेखी पुरावा मागा.