सेवाकार्य प्रशिक्षण प्रशाला—मोठे व कार्य साधण्याजोगे द्वार
१ यिर्मया संदेष्ट्याद्वारे यहोवाने असे भाकीत केले: “मी [माझ्या लोकांवर] मेंढपाळ नेमीन, ते त्यांस चारितील, म्हणजे ते पुढे भिणार नाहीत, घाबरणार नाहीत, कमी होणार नाहीत.” (यिर्म. २३:४) अशाप्रकारचे मेंढपाळ कार्य आज सर्व राष्ट्रांतील लोकांत होत आहे. मंडळीतील हजारो वडील हे कार्य करीत आहेत. शिवाय, पहाटेच्या दहिवरासारखे असलेले असंख्य तरुण स्वेच्छेने यहोवाची सेवा करण्यास पुढे आले आहेत. (स्तो. ११०:३) देवाच्या लोकांच्या मंडळ्यांसाठी हे नम्र बांधव किती मोठा आशीर्वाद आहेत! आध्यात्मिक अर्थाने गोळा करण्याचे काम जसजसे चालू राहते तसतसे, आपल्या बांधवांची सेवा करण्याची तयारी असलेल्या योग्यताप्राप्त पुरूषांची गरज लागेल.
२ सेवाकार्य प्रशिक्षण प्रशाला, अविवाहीत वडील आणि सेवा सेवकांना जादा जबाबदाऱ्यांचे प्रशिक्षण देणारी एक उत्तम व्यवस्था आहे. १९८७ साली या प्रशालेची स्थापना झाल्यापासून ९९९ वर्गांद्वारे सुमारे १४० राष्ट्रांतील २२,००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षण प्राप्त झाले आहे. या बांधवांसाठी ही प्रशाला जणू काय, “मोठे व कार्य साधण्याजोगे द्वार” ठरली आहे.—१ करिंथ. १६:९.
३ प्रशालेचा उद्देश: संघटनेत जेथे कोठे गरज आहे तेथे जबाबदाऱ्या घेण्यासाठी योग्यताप्राप्त पुरूषांना प्रशिक्षण देऊन त्यांना तयार करणे, हा सेवाकार्य प्रशालेचा उद्देश आहे. या प्रशालेत, सुवार्तिक कार्यात पुढाकार घेण्याची, कळपाची काळजी घेण्याच्या कार्यात सहभाग घेण्याची आणि मंडळीत शिकवण्याच्याबाबतीत त्यांच्या अंगी असलेल्या कलेचे आणखी संवर्धन केले जाते. पदवीदानानंतर, काही विद्यार्थ्यांना त्यांच्याच देशात किंवा परदेशात खास पायनियर किंवा प्रवासी पर्यवेक्षक म्हणून नेमले जाते. काहींना त्यांच्याच मंडळीत सेवा करण्याची नेमणूक मिळते तर काहींना शाखेच्या क्षेत्रात अधिक गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करण्यास सांगितले जाते.
४ आठ आठवड्यांच्या अभ्यासक्रमादरम्यान, विद्यार्थी, बायबलचा सखोल अभ्यास करतात. ते अनेक बायबल शिकवणुकींचा, मेंढपाळाच्या जबाबदारींचा आणि ख्रिस्ती जीवन जगताना येणाऱ्या समस्या कशा हाताळायच्या या संबंधाने असलेल्या मार्गदर्शनाचा विचारपूर्वक अभ्यास करतात. ते न्यायिक, व्यवस्थापनात्मक आणि संघटनेच्या बाबींविषयी शास्त्रवचनीय शिकवणुकी देखील शिकतात. जाहीर भाषणे देण्याबाबतचे खास प्रशिक्षण त्यांना दिले जाते आणि त्यांचा आध्यात्मिक विकास व्हावा म्हणून त्यांना व्यक्तिगतरीत्या देखील मदत दिली जाते.
५ अपेक्षा: या प्रशालेच्या अटी उच्च आहेत, हे समजण्याजोगे आहे. अर्जदारांनी, सलग दोन वर्षांसाठी वडील किंवा सेवा सेवक म्हणून सेवा केलेले असावे. त्यांनी अविवाहित आणि २३ ते ५० या वयोगटात असले पाहिजे. अर्जदारांना अस्खलितपणे इंग्रजी भाषा लिहिता, वाचता आणि बोलता आली पाहिजे. त्यांचे आरोग्य उत्तम आणि आहाराच्या बाबतीत पथ्य वगैरे नसावे. सामान्य पायनियर सेवेत असलेल्यांना प्राधान्य दिले जाते.
६ नाव किंवा प्रतिष्ठा मिळवण्यासाठी नव्हे तर आपल्या बांधवांबद्दल प्रेम व त्यांची सेवा करण्याच्या इच्छेने प्रवृत्त होऊनच अर्जदारांनी सेवाकार्य प्रशिक्षण प्रशालेसाठी अर्ज करावा. अशाप्रकारचे उत्तम प्रशिक्षण मिळाल्यानंतर, पदवीधारकांनी, शिकलेल्या गोष्टींचा अवलंब केला पाहिजे जेणेकरून इतरांना त्याचा फायदा होईल, अशी अपेक्षा केली जाते.—लूक १२:४८.
७ फायदे: आठ आठवड्यांच्या गहन प्रशिक्षणानंतर, पदवीधारक ‘विश्वासाच्या वचनांनी व सुशिक्षणाच्या त्याच्या वचनांनी पोषित’ होतात. (१ तीम. ४:६) यामुळे ते त्यांना नेमलेल्या मंडळीतील व विभागातील इतरांना मदत करण्यास व उत्तेजन देण्यास सुसज्ज होतात. सेवाकार्य प्रशिक्षण प्रशालेल्या विद्यार्थ्यांना ज्या ठिकाणी नेमण्यात आले त्या अनेक ठिकाणी क्षेत्र सेवा कार्य वाढले आहे; तरुणांमध्ये खासकरून पायनियर सेवेला प्रोत्साहन मिळाले आहे; आणि देवाच्या लोकांबरोबर संगती करणाऱ्या अनेक नवीन लोकांकडे जातीने लक्ष पुरवण्यात आले आहे.
८ तुम्ही २३ ते ५० या वयोगटातील अविवाहित वडील किंवा सेवा सेवक आहात का? असल्यास, सेवाकार्य प्रशालेत आपले नाव दाखल करण्यास काय हरकत आहे? तुम्ही तरुण व तुमची यहोवाच्या सेवेत दीर्घकाळची ध्येये आहेत का? असल्यास ‘मोठ्या व कार्य साधण्याजोग्या द्वारातून’ आत प्रवेश करता यावा म्हणून आपले जीवन साधे व विकर्षणांपासून मुक्त ठेवा. यामुळे तुम्हाला खूप आनंद व समाधान मिळू शकेल. होय, सेवाकार्य प्रशिक्षण प्रशाला, या प्रशालेच्या पदवीधारकांसाठीच नव्हे तर संपूर्ण जगभरातील देवाच्या लोकांच्या मंडळ्यांसाठी एक आशीर्वाद ठरली आहे.
[६ पानांवरील चौकट]
प्रशिक्षणाचा त्यांना फायदा कसा झाला
“या प्रशिक्षणामुळे माझे सेवाकार्य सुधरले आहे आणि शास्त्रवचनांचा उपयोग करून सूज्ञतेने कळपाची काळजी घेण्याची माझी क्षमता देखील वाढली आहे.”
“प्रशालेमुळे मला, मंडळीतल्या माझ्या अनेक जबाबदाऱ्या पार पाडण्याचा माझा आत्मविश्वास वाढला आहे.”
“प्रशालेमुळे माझे संपूर्ण जीवनच जणू काय बदलले आहे; देवाच्या व्यवस्थेविषयी त्याच्या संघटनेविषयी माझा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला.”
“मिळालेल्या प्रशिक्षणामुळे मला एक गोष्ट समजली; ती ही की, जेथे जास्त गरज आहे तेथे जाऊन सेवा करण्यास मी तयार असले पाहिजे.”