नवीन खास संमेलन दिवस कार्यक्रम
धोक्याची सूचना दिसत असूनही किंवा ऐकू येत असूनही आपण तिच्याकडे दुर्लक्ष केले तर आपल्याला कदाचित अत्यंत गंभीर परिणाम भोगावे लागतील. यहोवा देत असलेल्या आध्यात्मिक मार्गदर्शनानुसार कार्य करणे तर याहूनही अधिक महत्त्वाचे आहे. याच गोष्टीवर, २००५ सेवा वर्षादरम्यान होणाऱ्या खास संमेलन दिवस कार्यक्रमात जोर दिला जाईल. त्याचा विषय आहे, “तुम्ही कसे ऐकता ह्याविषयी जपून राहा.”—लूक ८:१८.
आपल्या पहिल्या भाषणात पाहुणे वक्ता, इब्रीकरांना पौलाने ईश्वरप्रेरणेने लिहिलेल्या पत्रांच्या सुरवातीच्या अध्यायातील सल्ला आपल्याला कसा लागू होतो, यावर चर्चा करतील. “देवाकडून येणाऱ्या शिक्षणाकडे सतत लक्ष द्या,” असे शीर्षक असलेल्या शेवटल्या भाषणात ते आपल्या सर्वांना, आपण खरोखरच यहोवाचे, त्याच्या पुत्राचे आणि ‘विश्वासू व बुद्धिमान दासाचे’ ऐकत आहोत की नाही याचे परीक्षण करून पाहण्यास मदत करतील.—मत्त. २४:४५.
कार्यक्रमातील बहुतेक भाषणे, कुटुंबांच्या फायद्यासाठी आहेत. “विचलित न होता देवाच्या वचनाकडे लक्ष देणारी कुटुंबे,” असे शीर्षक असलेले भाषण आपल्याला, आपल्या आध्यात्मिक वाढीला खुंटविणाऱ्या जगाच्या गोष्टींपासून दूर राहण्यास मदत करेल. या भाषणात, आध्यात्मिक गोष्टींना प्रथम स्थान देण्याकरता ज्यांनी आपल्या जीवनशैलीत बदल केला आहे, अशा बंधूभगिनींच्या मुलाखती असतील. “देवाचे वचन लक्षपूर्वक ऐकल्याने आपले तरुण मजबूत होतात,” या भाषणात, शाळेत, साथीदारांसोबत असताना किंवा सेवेत असताना सत्याची बाजू घेतलेल्या तरुणांच्या मुलाखती देखील असतील. “देवाचे ऐकणारे व शिकणारे चिमुकले” हे भाषण आपल्याला, लहान मुलांच्या शिकण्याच्या क्षमतेला क्षुल्लक न लेखण्यास मदत करेल. लहान मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या मुलाखतींवरून आपल्याला, बाळपणापासून यहोवाच्या मार्गात प्रशिक्षण दिल्याने मिळणारे फायदे पाहायला मिळतील.
सैतान ‘सर्व जगाला ठकवित’ आहे. पण यहोवा आपल्या विश्वासू सेवकांना, मार्ग दाखवत आहे ज्यामुळे त्यांचे भले होते. (प्रकटी. १२:९; यश. ३०:२१) त्यामुळे यहोवाचा सल्ला लक्षपूर्वक ऐकल्याने व आज्ञाधारकपणे तो आपल्या जीवनात लागू केल्याने आपण सुज्ञ आणि आनंदी होतो आणि सार्वकालिक जीवनाच्या पात्र ठरतो.—नीति. ८:३२-३५.