प्रगतीशील बायबल अभ्यास संचालित करणे
भाग १: बायबल अभ्यास म्हणजे काय?
१ संपूर्ण जगभरात देवाचे लोक दर महिन्याला सुमारे साठ लाख बायबल अभ्यास संचालित करत आहेत. शिकवण्याच्या उत्तम पद्धतींचा उपयोग करून आपण या बायबल विद्यार्थ्यांना समर्पण व बाप्तिस्मा घेण्यास आणि “इतरांना शिकविण्यास योग्य” असे होण्यास मदत करू शकतो. (२ तीम. २:२) तुमच्या विद्यार्थ्याला अशी प्रगती करण्यास मदत करायला तुम्हाला आवडेल का? आमची राज्य सेवा याच्या या अंकापासून, प्रगतीशील बायबल अभ्यास संचालित करण्याचे मूलभूत मुद्दे यांचे स्पष्टीकरण देणारी लेखमालिका प्रकाशित केली जाईल.
२ रिपोर्टमध्ये बायबल अभ्यासाची नोंद केव्हा करावी: तुम्ही नियमितरीत्या आणि पद्धतशीररीत्या, बायबलचा आणि सुचवलेल्या एखाद्या प्रकाशनाचा उपयोग करून थोड्या वेळासाठी का होईना, बायबल चर्चा करत असाल तर त्याचा अर्थ तुम्ही बायबल अभ्यास संचालित करत आहात. तुम्ही दारात उभे राहून किंवा टेलिफोनवरून अशी चर्चा करत असाल तरीसुद्धा तो बायबल अभ्यासच आहे. आपण अभ्यास कसा चालवतो याचे घरमालकाला प्रात्यक्षिक दाखवल्यानंतर दोनदा अभ्यास झाला असेल आणि हा अभ्यास पुढे चालू राहील अशी खात्री वाटत असेल तर रिपोर्टमध्ये त्याची नोंद करण्यास हरकत नाही.
३ अपेक्षा माहितीपत्रक आणि ज्ञान पुस्तक या दोन प्रकाशनांचा उपयोग अनेक बायबल अभ्यास संचालित करण्यासाठी केला जातो. या दोन्ही प्रकाशनांचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर, विद्यार्थी हळूहळू का होईना प्रगती करत असेल व तो जे काही शिकत आहे त्याबद्दल गुणग्राहकता विकसित करत असेल तर मग देवाची उपासना (हिंदी) पुस्तकातून अभ्यास घेऊन तो चालू ठेवता येऊ शकतो.
४ बायबल अभ्यासाचे कार्य, लाखोंना येशू ख्रिस्ताचे खरे शिष्य बनण्यास मदत करण्याकरता प्रभावशाली ठरले आहे. (मत्त. २८:१९, २०) या मालिकेच्या येणाऱ्या लेखांमधील सूचनांचे पालन केल्यास तुम्हीही प्रगतीशील बायबल अभ्यास संचालित करू शकाल.