प्रशंसा उत्साहवर्धक असते
१ रात्री झोपताना एक लहान मुलगी मुसूमुसू रडून म्हणाली, “मी आज शहाण्या मुलीसारखे वागले की नाही?” हे ऐकून तिच्या आईला आश्चर्य वाटले. आपली लहान मुलगी त्या दिवशी किती शहाण्यासारखी वागण्याचा प्रयत्न करत होती हे पाहून देखील तिने तिची प्रशंसा केली नव्हती. त्या लहान मुलीच्या अश्रूंनी सर्व लहान-थोरांना याची आठवण करून दिली पाहिजे की, आपल्या सर्वांना प्रशंसेची आवश्यकता आहे. इतरजण जेव्हा काही चांगले करतात तेव्हा आपण त्यांचे कौतुक करून त्यांचा उत्साह वाढवतो का?—नीति. २५:११.
२ सह-ख्रिश्चनांची प्रशंसा करण्याची अनेक चांगली कारणे आपल्याजवळ आहेत. वडील, सेवा सेवक आणि पायनियर आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्याकरता फार मेहनत करतात. (१ तीम. ४:१०; ५:१७) देव-भीरू पालक आपल्या मुलांना यहोवाच्या मार्गात वाढवण्यासाठी जीवाचे रान करतात. (इफिस. ६:४) ख्रिस्ती तरुण ‘जगाच्या आत्म्याचा’ प्रतिकार करण्यासाठी संघर्ष करतात. (१ करिंथ. २:१२; इफिस. २:१-३) इतरजण वाढते वयोमान, आरोग्य समस्या किंवा इतर परीक्षा असतानाही यहोवाची विश्वासूपणे सेवा करतात. (२ करिंथ. १२:७) हे सर्वजण प्रशंसेस पात्र आहेत. त्यांच्या कौतुकास्पद प्रयत्नांची दखल आपण घेतो का?
३ व्यक्तिगत आणि विशिष्ट गोष्टीबद्दल प्रशंसा: व्यासपीठावरून प्रशंसा केली जाते तेव्हा सर्वांचे चेहरे उजळतात. परंतु, व्यक्तिगतरित्या प्रशंसा केली जाते तेव्हा ती अधिकच उत्साहवर्धक ठरते. उदाहरणार्थ, रोमकरांना लिहिलेल्या पत्राच्या १६ व्या अध्यायात पौलाने फीबी, प्रिस्क आणि अक्विला, त्रुफैना आणि त्रुफासा, पर्सिस व इतरांचीही विशिष्ट गोष्टींबद्दल प्रशंसा केली होती. (रोम. १६:१-४, १२) या विश्वासू जनांना त्याचे हे शब्द किती उत्साहवर्धक ठरले असतील! अशा प्रशंसेने आपल्या बंधू-बहिणींना खात्री मिळते की त्यांची आपल्याला गरज आहे आणि अशाने आपण एकमेकांच्या जवळ देखील येतो. तुम्ही अलीकडे कोणाची व्यक्तिगतरित्या एखाद्या विशिष्ट गोष्टीबद्दल प्रशंसा केली आहे का?—इफिस. ४:२९.
४ मनापासून: प्रशंसा खरोखर उत्साहवर्धक असण्याकरता ती प्रामाणिक असली पाहिजे. आपण मनापासून बोलत आहोत की केवळ “जिव्हेने खुशामत” करत आहोत हे लोक सहज ओळखू शकतात. (नीति. २८:२३) इतरांमधील चांगले गुण पाहण्याची सवय आपण स्वतःला लावली तर आपण त्यांची प्रशंसा करायला आपोआप प्रवृत्त होऊ. “समयोचित बोल किती उत्तम!” हे जाणून आपण भरभरून इतरांची खरी प्रशंसा करू या.—नीति. १५:२३.