युवकांनो—भवितव्यासाठी भक्कम पाया घाला
१. ख्रिस्ती युवकांनी भक्कम विश्वास विकसित करण्याची का गरज आहे?
१ तुम्हाला कोणती गोष्ट सर्वात महत्त्वाची वाटते? तुम्ही कशाचा विचार करता? तुम्हाला सध्याच्या गोष्टींची अधिक काळजी वाटते की भवितव्यातील गोष्टींची अर्थात देवाने अभिवचन दिलेल्या गोष्टींची? (मत्त. ६:२४, ३१-३३; लूक ८:१४) देवाच्या अभिवचनांनुसार कार्य करण्यासाठी भक्कम विश्वासाची गरज आहे; अब्राहाम व मोशेच्या उदाहरणावरून हे दिसून येते. (इब्री ११:८-१०, २४-२६) अशाप्रकारचा विश्वास तुम्ही कशाप्रकारे विकसित करू शकता आणि ‘पुढील काळासाठी चांगला आधार’ कसा होऊ देऊ शकता?—१ तीम. ६:१९.
२. राजा योशियाच्या उदाहरणावरून आपण काय शिकतो?
२ यहोवाचा शोध घ्या: तुमचे कुटुंब नियमाने आध्यात्मिक कार्यात भाग घेत असेल तर हे प्रशंसनीय आहे. परंतु यामुळे आपोआप भक्कम विश्वास निर्माण होईल, असा ग्रह करून घेऊ नका. “देवाविषयीचे ज्ञान” प्राप्त करण्यासाठी तुम्हाला व्यक्तिगतरीत्या यहोवाचा शोध घ्यावा लागेल. (नीति. २:३-५; १ इति. २८:९) राजा योशियाने हेच केले. आध्यात्मिक वाढीकरता पोषक नसलेल्या वातावरणात तो लहानाचा मोठा झाला तरीसुद्धा तो १५ वर्षांचा होता तेव्हा “आपला बाप दावीद याच्या देवाला शोधू लागला.”—२ इति. ३४:३, पं.र.भा.
३. तरुण ख्रिस्ती आज यहोवाचा शोध कसा घेऊ शकतात?
३ तुम्ही यहोवाचा शोध कसा घेऊ शकता? तुम्ही जो विश्वास करता त्याचे बारकाईने परीक्षण करून हेच सत्य आहे याची ‘स्वतःला खात्री करून देण्याद्वारे.’ (रोम. १२:२) जसे की, रक्ताविषयी बायबल काय म्हणते याचे स्पष्टीकरण तुम्हाला देता येईल का; किंवा देवाच्या राज्याचे शासन १९१४ साली स्वर्गामध्ये सुरू झाले हे तुम्ही सिद्ध करून दाखवू शकता का? ‘सत्याचे परिपूर्ण ज्ञान’ प्राप्त करणे हे, भवितव्यासाठी उत्तम पाया रचण्याकरता अत्यंत महत्त्वाचे आहे.—१ तीम. २:३, ४.
४. बाप्तिस्मा न घेतलेले प्रचारक आपली प्रगती कशी प्रकट करू शकतील?
४ योशियाने देवाचा शोध केल्यामुळे त्याला उत्तम प्रतिफळ मिळाले. तो अद्याप २० वर्षांचाही झाला नव्हता, तर त्याने देशातील खोट्या उपासनेचे उच्चाटन करण्यासाठी धैर्याने कार्य केले. (२ इति. ३४:३-७) तसेच, तुमची आध्यात्मिक प्रगती तुमच्या कार्यांद्वारे लोकांस दिसून येईल. (१ तीम. ४:१५) तुम्ही अद्याप बाप्तिस्मा न घेतलेले प्रचारक असाल तर तुमच्या सेवेचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न करा. केवळ साहित्य देण्यातच समाधान मानू नका. बायबलचा वापर करण्याचे, लोकांबरोबर तर्क करण्याचे आणि लोक आस्था दाखवतात तेव्हा ती वाढवण्याचे ध्येय ठेवा. (रोम. १२:७) यामुळे तुम्हाला आध्यात्मिकरीत्या वाढायला मदत मिळेल.
५. बाप्तिस्मा घेतलेल्या ख्रिश्चनांसमोर आपली सेवा वाढवण्याकरता कोणत्या संधी आहेत?
५ यहोवाला आपले जे उत्तम आहे ते द्या: बाप्तिस्मा घेण्याद्वारे तुम्ही यहोवाला तुमचे जीवन समर्पित केले तेव्हा तुम्ही देवाचा एक नियुक्त सेवक बनला. (२ करिंथ. ३:५, ६) यामुळे तुम्हाला यहोवाची पूर्ण-वेळ सेवा करण्याची संधी मिळते. यांमध्ये, पायनियरींग, बेथेल सेवा, प्रवासी कार्य यांचा समावेश होतो. तुमची सेवा वाढवण्याचे आणखी मार्ग म्हणजे, इतर भाषा शिकणे किंवा अधिक गरज असलेल्या ठिकाणी जाणे.
६. आपण सर्वच भवितव्यासाठी उत्तम पाया कसा घालू शकतो?
६ अर्थात, सर्वांनाच सेवेच्या या विशेषाधिकारांमध्ये भाग घेता येत नाही; तरीपण आपण प्रत्येक जण यहोवाला आपले जे उत्तम आहे ते देऊ शकतो. (मत्त. २२:३७) तुमची परिस्थिती काहीही असो, यहोवाच्या सेवेला आपल्या जीवनात प्राधान्य द्या. (स्तो. १६:५) असे केल्याने, तुम्ही भवितव्यासाठी उत्तम पाया घालू शकाल.