प्रिय राज्य प्रचारकांनो:
“देव वाढवीत गेला.” (१ करिंथ. ३:६) भारतातील ईश्वरशासित वाढ पाहून किती आनंद होत आहे! २००३ सालच्या सेवा वर्षादरम्यान आपण, १७,००० पेक्षा अधिक बायबल अभ्यास संचालित करून नवीन उच्चांक गाठला आहे. हे खरोखरच प्रशंसनीय आहे. स्मारक उपस्थितीतही आपण नवीन उच्चांक गाठला; स्मारकविधीला ५६,८५६ जण उपस्थित होते. गेल्या वर्षाच्या उपस्थितापेक्षा ही २,२२६ ने अधिक होती. आणि भारतातील एकूण प्रचारकांच्या संख्येपेक्षा जवळजवळ तेहतीस हजार जण अधिक उपस्थित होते. यावरून, भवितव्यात भरपूर वाढ होण्याची शक्यता दिसते.
आपलीच अशी एक शाखा आहे जी भारतीय भाषांमध्ये नियतकालिकांची छपाई करून २५ पेक्षा अधिक राष्ट्रांमध्ये त्यांचे वितरण करते. यामुळे नियतकालिकांच्या निर्माणकार्यात ६५% वाढ झाली आहे. हे जादा कार्य, छापखान्यातील कमी सेवक वर्गाद्वारे साध्य केले जात आहे. ही प्रचंड मागणी पूर्ण करण्यासाठी आणखी एक फोर-कलर प्रेस बसवण्यात आली. या प्रेसेसवर दर मिनिटाला ६० नियतकालिके छापली जातात. संपूर्ण जगभरातील क्षेत्रात वितरित केल्या जाणाऱ्या नियतकालिकांचा आणि इतर साहित्यांचा दर्जा सुधारण्याकरता उत्तम प्रतीचा कागद वापरला जातो.
आपण २००४ सेवा वर्षाची सुरूवात करत असताना डिसेंबर ७, २००३ रोजी बंगळूर येथील नव्या शाखा दफ्तराच्या समर्पण कार्यक्रमाची वाट पाहत आहोत. हा आध्यात्मिक कार्यक्रम उपस्थित असलेल्या सर्वांच्या विशेष लक्षात राहील आणि यहोवाच्या स्तुतीचा गजर होईल अशी आपण प्रार्थना करतो. होय, यहोवा नवीन शाखा संकुलाचा उपयोग करीत राहील आणि ते तो ‘वाढवीत’ राहील अशी आपल्याला खात्री आहे.
आपले बांधव,
भारत शाखा कार्यालय