यहोवाच्या चांगुलपणाचे अनुकरण करा
१ डोळ्यांचे पारणे फेडणारा सूर्यास्त पाहिल्यावर किंवा स्वादिष्ट भोजन केल्यावर आपण सर्व चांगुलपणाचा उगम असलेल्या यहोवा देवाचे आभार मानावयास प्रवृत्त होत नाही का? त्याचा चांगुलपणा आपल्याला त्याचे अनुकरण करण्याची प्रेरणा देतो. (स्तो. ११९:६६, ६८; इफिस. ५:१) चांगुलपणा आपण कसा दाखवू शकतो?
२ सत्यात नसलेल्यांप्रती: यहोवाच्या चांगुलपणाचे अनुकरण करण्याचा एक मार्ग म्हणजे, सत्यात नसलेल्यांबद्दल खरी काळजी व्यक्त करणे. (गलती. ६:१०) व्यावहारिक मार्गांद्वारे त्यांना चांगुलपणा दाखवल्याने, यहोवाच्या साक्षीदारांबद्दल व त्यांच्या संदेशाबद्दल त्यांचा दृष्टिकोन बदलू शकतो.
३ उदाहरणार्थ, दवाखान्यात आपला नंबर येण्याची वाट पाहत बसलेल्या एका तरुण पायनियर बांधवाने पाहिले, की त्याच्या शेजारी बसलेली वृद्ध महिला इतर रुग्णांपेक्षा जास्त आजारी वाटत होती. डॉक्टरांकडे जाण्याचा त्याचा नंबर आला तेव्हा त्याने त्या महिलेला आपल्या आधी जाऊ दिले. तो पुन्हा दुसऱ्या वेळेला याच स्त्रीला एकदा बाजारात भेटला तेव्हा ती महिला त्याला पाहून खूप खूष झाली. पूर्वी ती सुवार्ता ऐकत नव्हती पण आता ती म्हणाली, की आता मला कळते की यहोवाचे साक्षीदार खरोखरच आपल्या शेजाऱ्यांवर प्रेम करतात. तिच्याबरोबर नियमित बायबल अभ्यास सुरू करण्यात आला.
४ आपल्या बांधवांप्रती: सहविश्वासू बंधूभगिनींना मदत करण्यासाठी आपण पुढे येतो तेव्हाही आपण यहोवाच्या चांगुलपणाचे अनुकरण करतो. विपत्तीच्या काळात आपल्या बांधवांना मदत करण्यास धावणारे आपण पहिले असतो. हाच आत्मा आपण सभांना येण्याकरता मदतीची गरज असलेल्यांना मदत देऊन, आजारी बंधूभगिनींना भेट देऊन, मंडळीत आपण ज्यांना ओळखत नाही अशांच्या अधिक जवळ जाऊन दाखवतो.—२ करिंथ. ६:११-१३; इब्री १३:१६.
५ आणखी एक मार्ग आहे ज्याद्वारे यहोवा चांगुलपणा दाखवतो व तो म्हणजे ‘क्षमा करण्याची तयारी’ दाखवणे. (स्तो. ८६:५) त्याचे अनुकरण करून आपणही, इतरांना क्षमा करण्याची तयारी दाखवून चांगुलपणाबद्दल आपल्यालाही प्रेम आहे हे दाखवू शकतो. (इफिस. ४:३२) यामुळे सहविश्वासू बंधूभगिनींबरोबरचा आपला सहवास ‘चांगला व मनोरम’ होतो.—स्तो. १३३:१-३.
६ यहोवाचा विपुल चांगुलपणा त्याच्या स्तुतीचा गजर करण्यास आणि आनंदाने प्रफुल्लित होण्यास आपल्याला प्रवृत्त करो. आणि, आपण जे काही करतो त्यात त्याच्या चांगुलपणाचे अनुकरण करण्याची प्रेरणा देवो.—स्तो. १४५:७; यिर्म. ३१:१२.