साजेल असा वेष देवाबद्दल आदर व्यक्त करतो
१. येणाऱ्या प्रांतीय अधिवेशनाबद्दल आपण गुणग्राहकता कशी व्यक्त करू शकतो?
१ लवकरच आपल्याला, २००३ “देवाचे गौरव करा” या प्रांतीय अधिवेशनात यहोवाचे अतिथी होण्याचा बहुमान मिळणार आहे. अशा समृद्ध आध्यात्मिक मेजवानीसाठी आपल्याला आमंत्रण दिल्याबद्दल आपण यहोवाचे किती आभारी आहोत! आपल्या वेशभूषेवरून आणि केशभूषेवरून आपण, त्याच्याबद्दल आणि त्याने केलेल्या आध्यात्मिक तरतूदींबद्दल आपल्या मनात असलेला आदर आणि गुणग्राहकता व्यक्त करू शकतो!—स्तो. ११६:१२, १७.
२. आपण शुद्ध आणि नीटनेटके का असले पाहिजे?
२ शुद्ध आणि व्यवस्थित: आपल्या स्वरूपावरून, शुद्ध आणि व्यवस्थित असलेल्या देवाचे दर्जे प्रतिबिंबित झाले पाहिजेत. (१ करिंथ. १४:३३; २ करिंथ. ७:१) आपले शरीर, आपले केस, आपली नखे स्वच्छ असली पाहिजेत. आपले स्वरूप नीटनेटके असले पाहिजे. आजकाल गबाळे राहणे सर्वसामान्य झाले आहे. एखादा सिनेनट किंवा खेळांतला हिरो गबाळा राहतो म्हणून ख्रिश्चनांनी त्यांच्यासारखा पेहराव करू नये. आपण येणाऱ्या प्रत्येक फॅशनप्रमाणे जगणारे झालो तर लोकांना, खऱ्या देवाची सेवा करणाऱ्यांमध्ये आणि न करणाऱ्यांमध्ये काहीच फरक दिसणार नाही.—मला. ३:१८.
३. आपले स्वरूप, १ तीमथ्य २:९, १० मधील सल्ल्याच्या अनुषंगाने आहे किंवा नाही याची आपण खात्री कशी करू शकतो?
३ ख्रिस्ती सेवकांना शोभणारा पेहराव: प्रेषित पौलाने ख्रिस्ती पर्यवेक्षक तीमथ्य याला लिहिले तेव्हा त्याने स्त्रियांना, “स्वतःस साजेल अशा वेषाने आपणास भिडस्तपणाने व मर्यादेने शोभवावे; . . . देवभक्ति स्वीकारलेल्या स्त्रियांस शोभते तसे सत्कृत्यांनी आपणास शोभवावे,” असे उत्तेजन दिले. (१ तीम. २:९, १०) आपला पेहराव साजेल असा ठेवायचा आहे, तर आधी आपण याविषयी विचार केला पाहिजे. आपले कपडे नीट, स्वच्छ आणि शालीन असले पाहिजेत—भडक, उत्तेजक असू नयेत.—१ पेत्र ३:३.
४, ५. ख्रिस्ती पुरूषांनी व स्त्रियांनी कोणत्या इशाऱ्याकडे लक्ष दिले पाहिजे?
४ “केस गुंफणे आणि सोने, मोत्ये व मोलवान वस्त्रे” यांबाबतीत अतिरेक करण्याविषयीही पौलाने ताकीद दिली. (१ तीम. २:९) सोने-नाणे, मेक-अप आणि इतर साजशृंगार यांबाबतीत संतुलन राखणे हा ख्रिस्ती स्त्रियांसाठी सुज्ञ मार्ग आहे.—नीति. ११:२.
५ पौलाने ख्रिस्ती स्त्रियांना दिलेला सल्ला ख्रिस्ती पुरुषांना देखील लागू होतो. बांधवांनी, जगिक विचारसरणी प्रतिबिंबित करणाऱ्या स्टाईल्स टाळल्या पाहिजेत. (१ योहा. २:१६) उदाहरणार्थ, काही देशांत बॅगी, म्हणजे अगदीच ढगळ कपडे घालणे सर्वसामान्य आहे. पण ही स्टाईल, देवाच्या सेवकांना शोभत नाही.
६. अधिवेशनाला जाता-येता, अधिवेशनात असताना आणि अधिवेशनानंतरच्या फावल्या वेळेत आपण आपला पेहराव आणि केशभूषा यांबाबतीत उच्च दर्जा टिकवून का ठेवला पाहिजे?
६ फावल्या वेळेदरम्यान: कार्यक्रमाला उपस्थित राहताना बहुतेक बंधू आणि भगिनी पेहराव आणि केशभूषा यांबाबतीत उत्तम उदाहरण मांडतात. परंतु, मिळालेल्या रिपोर्टवरून असे सूचित होते, की काही जण, अधिवेशनाला येताना जाताना किंवा कार्यक्रमानंतर संध्याकाळच्या फावल्या वेळेत बेपर्वा झाले आहेत. होय, आपले व्यक्तिगत स्वरूप—मग ते कार्यक्रमादरम्यान असो किंवा इतर वेळी असो—देवाच्या लोकांबद्दल इतरांचा कसा दृष्टिकोन आहे यावर प्रभाव करते. अधिवेशनाला जाताना आपण बॅज कार्ड लावत असल्यामुळे आपला पेहराव नेहमी ख्रिस्ती सेवकांना शोभेल असा असला पाहिजे. यामुळे लोक आपली प्रशंसा करण्यास प्रवृत्त होतात आणि आपल्याला साक्ष देण्याची संधी मिळते.—१ करिंथ. १०:३१-३३.
७. आपल्या साजेशा पेहरावाचा आणि केशभूषेचा इतरांवर कसा परिणाम होऊ शकतो?
७ स्मितहास्यामुळे आपला चेहरा जसा प्रफुल्लित दिसतो त्याचप्रमाणे साजेशा वेषामुळे, आपण धारण करत असलेल्या संदेशाची आणि आपण प्रतिनिधीत्व करत असलेल्या संघटनेची प्रतिष्ठा वाढते. या वर्षी, “देवाचे गौरव करा” प्रांतीय अधिवेशनादरम्यान आपल्याला पाहणाऱ्यांपैकी काही जण कदाचित, आपण वेगळे का आहोत असे विचारतील आणि म्हणतील: “आम्ही तुम्हाबरोबर येतो, कारण देव तुम्हाबरोबर आहे असे आम्ही ऐकले [व पाहिले] आहे.” (जख. ८:२३) तेव्हा आपल्या पेहरावावरून आणि आपल्या केशभूषेवरून आपल्यातील प्रत्येक जण हे दाखवू या, की आपल्याला यहोवा देवाबद्दल आदर आहे.
[५ पानांवरील चौकट]
प्रतिष्ठित स्वरूप ठेवा
▪ प्रवास करताना
▪ अधिवेशनादरम्यान
▪ फावल्या वेळेत