नम्रतेने करण्याजोगे काम
१ “नम्र मनाचे व्हा; वाईटाबद्दल वाईट, . . . असे करू नका; तर उलट आशीर्वाद द्या,” असा सल्ला देवाचे वचन आपल्याला देते. (१ पेत्र ३:८, ९) प्रचार कार्यात हा सल्ला निश्चितच लागू होतो. होय, ख्रिस्ती सेवेत आपल्या नम्रतेची परीक्षा होऊ शकते.
२ आपण नम्र असल्यास, असुखकारक परिस्थितीतही आपण सहनशील असू. प्रचार करताना आपण, अनोळखी लोकांच्या घरी, त्यांनी बोलवलेले नसताना जातो, तेव्हा काही लोक आपल्याशी आदरपूर्वक बोलणार नाहीत हे आपल्याला माहीत असते. अशा परिस्थितीतही प्रचार करत राहण्यासाठी नम्रतेची आवश्यकता आहे. दोन पायनियर भगिनी एका विशिष्ट कठीण क्षेत्रात दोन वर्षांपर्यंत घरोघरी जात राहिल्या; कोणीही त्यांचे ऐकून घेत नव्हते. तरीसुद्धा या भगिनींनी चिकाटी दाखवली आणि आज त्याच क्षेत्रात दोन मंडळ्या आहेत.
३ लोक उद्धट असतात तेव्हा: इतर लोक आपल्याशी रागाने किंवा उद्धटपणे बोलले तरी, येशूचे अनुकरण करण्यास नम्रता आपल्याला मदत करेल. (१ पेत्र २:२१-२३) एका घरात एका भगिनीशी, पहिल्यांदा पत्नी आणि नंतर तिचा पती, हे दोघेही उद्धटपणे बोलले आणि तिला त्यांनी त्यांच्या घरातून हाकलून दिले. या भगिनीने त्यांच्याकडे पाहून फक्त स्मितहास्य केले आणि त्यांना म्हणाली, की दुसऱ्या एखाद्या वेळी मला तुमच्याबरोबर बोलण्याची संधी मिळेल अशी आशा करते. यामुळे ते जोडपे इतके प्रभावित झाले, की पुढच्या वेळी जेव्हा साक्षीदार असलेली दुसरी एक भगिनी त्यांच्या घरी गेली तेव्हा त्यांनी तिचे बोलणे ऐकून घेतले आणि राज्य सभागृहातील सभेला येण्याचे आमंत्रण त्यांनी स्वीकारले. सुरवातीला ज्या भगिनीवर हे जोडपे खेकसले होते, ती भगिनीही राज्य सभागृहात होती, ती त्यांना भेटली आणि तिने त्यांना आणखी साक्ष दिली. आपण देखील, ‘सौम्यता व भीडस्तपणा’ दाखवून प्रतिसाद न देणाऱ्या लोकांचा राग कमी करू शकतो.—१ पेत्र ३:१५; नीति. २५:१५.
४ मगरूर होऊ नका: आपल्याला बायबलचे ज्ञान आहे म्हणून आपण लोकांना तुच्छ लेखावे किंवा त्यांच्याविषयी अनादराने बोलावे असा याचा अर्थ होत नाही. (योहा. ७:४९) उलट, देवाचे वचन आपल्याला असा सल्ला देते, की आपण “कोणाची निंदा करू नये.” (तीत ३:२) येशूप्रमाणे आपणही विनम्र असलो तर इतरांना आपल्यामुळे तजेला मिळू शकेल. (मत्त. ११:२८, २९) नम्रतेने बोलल्यास आपला संदेश आणखी आकर्षक होतो.
५ होय, नम्रता आपल्याला कठीण क्षेत्रातही टिकून राहण्यास मदत करते. आपली नम्रता, उद्धटपणे बोलणाऱ्यांना नरम बनवते आणि इतरांना राज्य संदेशाकडे आकर्षित करते. या सर्वांहून अधिक म्हणजे, आपल्या नम्र स्वभावामुळे यहोवा संतुष्ट होतो कारण तो “लीनांवर कृपा करितो.”—१ पेत्र ५:५.