स्थानिक प्रथा आणि खरी उपासना
१ भारतातील लोकांचा मैत्रीपूर्ण स्वभाव आहे म्हणूनच, त्यांच्या रीतीरिवाजांमध्ये व प्रथांमध्ये भाग घेण्यासाठी ते आपल्याला आमंत्रण देतात. जसे की, बाळाचे बारसे, विवाहसोहळे आणि मृत्यूसारख्या दुःखद प्रसंगाच्या संबंधाने असलेले विधी. सत्यात नसलेले मित्र किंवा नातेवाईक अशा प्रथांमध्ये भाग घ्यायला आमंत्रण देतात तेव्हा एखाद्या ख्रिश्चनाने कोणती भूमिका घ्यावी?
२ एखाद्या विशिष्ट रीतीरिवाजात आपण भाग घ्यावा की नाही हे ठरवण्याआधी आपण सर्व गोष्टींवर विचार करणे शहाणपणाचे आहे. आपण पुढील गोष्टींचा विचार केला पाहिजे: त्या प्रथेचा उगम कसा झाला किंवा सध्या त्या प्रथेचा काय अर्थ होतो? ही प्रथा देवाच्या वचनातील शिकवणुकीच्या विरोधात आहे का? आपण या विधीला फक्त बघे म्हणून उपस्थित राहण्याचा निर्णय घेतलाच तर आपल्या विश्वासांशी हातमिळवणी करण्याचा काही धोका आहे का? या प्रथेत भाग घेतल्याने किंवा न घेतल्याने कोणाचे मन दुखावेल किंवा विनाकारण एखाद्याला अडखळण होईल का?
३ बारसे: कुटुंबात एखाद्या बाळाचे आगमन होते तेव्हा सर्वांनाच आनंद होतो. परंतु मग, अपत्याच्या जन्मानंतर मित्रजन व नातेवाईक, बाळाच्या नामकरणाचे किंवा बारशाचे आमंत्रण मिळण्याची वाट पाहत असतात. हा विधी धार्मिक आहे; यात, पुजारी अथवा भटजी पुढाकार घेतो व हिंदू शास्त्रांत सांगितलेले विधी पार पाडले जातात तसेच पंचांगाच्या आधारावर बाळाची जन्म-कुंडली तयारी केली जाते.
४ सहसा मूल जेव्हा सात महिन्यांचे होते तेव्हा, दुसऱ्या एका सोहळ्यासाठी सर्वांना आमंत्रित केले जाते; त्याला “पहिला घास” किंवा अन्नप्राशन असे म्हटले जाते. नेमका विधी आणि अपेक्षा या प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या असल्या तरी, तो सामाजिक नव्हे तर सर्रासपणे धार्मिक विधी म्हणून पाळला जातो आणि हा विधी पार पाडण्यासाठी व मंत्र जपण्यासाठी कधीकधी पुजारी बोलवला जातो. ख्रिस्ती धर्मजगताच्या काही धर्मांमध्ये स्थानीय पाळक अशाप्रकारचे विधीसंस्कार करतात.
५ बायबल काळात, बाळाचे नाव ठेवण्याला महत्त्व दिले जात होते व बाळाचे दूध सुटण्याचा प्रसंग कधीकधी साजरा करून आनंद मानला जात असे. (लूक १:५९; २:२१; उत्प. २१:८) परंतु वर सांगितल्याप्रमाणे, नामकरण व अन्नप्राशन हे धार्मिक विधी आहेत किंवा पूजा आहेत ज्यात, उपस्थित असलेले लोक त्याचे पालन करतात किंवा त्यात भाग घेतात. यांत, शास्त्रवचनाला धरून नसलेल्या कल्पना व रीतीरिवाज असतात आणि या विधींसाठी उपस्थित असलेल्यांना प्रसाद दिला जाऊ शकतो किंवा दुसऱ्या धर्मातील एखादा भटजी अथवा पुजारी सर्वांच्या वतीने प्रार्थना करतो तेव्हा ते त्यात सामील होऊ शकतात. प्रकटीकरण १८:४ मधील आज्ञेच्या अनुषंगाने ख्रिस्ती व्यक्ती अशा विधींमध्ये भाग घेऊ शकत नाही.
६ विवाहसोहळे: विवाह सोहळ्यांचे व त्यानंतरच्या पार्टीचे आमंत्रण आपल्या सर्वांना सहसा मिळत असते. मित्रजनांनी व नातेवाईकांनी रिसेप्शनला येऊन वधूवराला शुभेच्छा द्याव्यात व मिष्टान्न खावे अशी तेव्हा अपेक्षा केली जाते. सहसा, विवाहस्थळी पुजारी येऊन वेगवेगळ्या प्रकारचे विधी पार पाडतो आणि हे विधी मुहूर्त शोधून पार पाडले जातात; त्यामुळे, सर्वांसाठी ठेवलेल्या रिसेप्शनच्या समयाशी याचा समय नेहमीच जुळत नाही आणि म्हणून पाहुणे याकरता आले नाहीत तरी चालते. परंतु, जवळच्या नातेवाईकांना सहसा विवाहाच्या इतर ‘कार्यांत’ जसे की, धार्मिक विधींमध्ये भाग घ्यावा लागतो किंवा नाममात्र विधी पाळावे लागतात; या नाममात्र प्रथांचा मूळ अर्थ निघून गेलेला असतो व त्या फक्त सामाजिक परंपरा म्हणून राहिलेल्या असतात. तरीपण हे लक्षात ठेवावे की, यहोवा देवाव्यतिरिक्त इतर कोणत्याही दैवताच्या भक्तीशी स्पष्टपणे संबंधित असलेल्या विधींपासून, खोट्या धार्मिक विश्वासांपासून, दुष्टात्म्यांच्या भयापासून किंवा त्यांना प्रसन्न करण्यापासून आपण दूर राहिले पाहिजे.
७ मृत्यूशी संबंधित असलेले प्रसंग: या वेळी, दुःखी किंवा सांत्वन हवे असलेल्या आपल्या प्रिय जनांना व नातेवाईकांना सहानुभूती व प्रेम दाखवण्याची आवश्यकता असते. परंतु सत्यात नसलेले आपले कौटुंबिक सदस्य, आपण अंत्यसंस्काराच्या वेगवेगळ्या विधींमध्ये किंवा अंत्येष्टीत भाग घ्यावा अशी अपेक्षा करतील. ज्या दिवशी घरातील कोणाचा मृत्यू होतो त्या दिवशी घरातील पुरुष मंडळीने अग्नी देण्यासाठी प्रेत वाहून न्यावे आणि त्यानंतर अस्थिसंचय अर्थात अस्थी गोळा करून गंगेत किंवा दुसऱ्या कोणत्याही नदीत विलीन कराव्यात अशी अपेक्षा त्यांच्याकडून केली जाते. मग, ज्या घरात मृत्यू झाला आहे त्या घरातील जवळच्या नातेवाईकांना, खास प्रकारचे कपडे घालून, भोजन व इतर विधी पाळून शोकाचे दिवस पाळावे लागतात. आणि मग सहसा अंत्यसंस्काराचे सर्व विधी १३ व्या दिवशी श्राद्ध घालून पूर्ण केले जातात. यानंतर मग, कुटुंबातील सदस्य, नातेवाईक नेहमीप्रमाणे भोजन करू शकतात, आणि मृत व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून श्रद्धांजली वाहण्यासाठी नातेवाईकांना व शुभचिंतकांना आमंत्रित केले जाते. श्राद्ध किंवा पुजेनंतरच्या भोजनाचे आमंत्रण सर्वसामान्यपणे दिले जाते.
८. शुद्ध विवेक बाळगणे: वर सांगितलेल्या सर्व प्रसंगांमध्ये, वेदांमधले मंत्र वाचले जातात आणि पुजारी, ब्राम्हण किंवा घरातील कोणी पुरुष, आत्मा अमर आहे या विश्वासावर आधारित काही विधी पार पाडतो. चर्चला जाणाऱ्या कुटुंबांतही अशाप्रकारचे विधी होतात; ख्रिस्ती धर्मजगतातील पाळक, नाव ठेवण्याचा विधी, विवाहसोहळे आणि अंत्यसंस्काराचे विधी पार पाडतात.
९ कुटुंबात इतर दैवतांची उपासना केली जाते, दुष्टात्म्यांना शांत करण्यासाठी किंवा आत्म्याच्या अमरत्वाच्या विश्वासावर आधारित असलेले विधी पार पाडले जातात, अशा विशिष्ट प्रसंगी एखाद्या खऱ्या ख्रिश्चन व्यक्तीवर उपस्थित राहण्यास दबाव आणला जातो तेव्हा काय? सत्यात असलेल्या एखाद्या पत्नीवर, सुनेवर किंवा मोठ्या मुलावर अशा प्रसंगांना उपस्थित राहण्याची बळजबरी केली जाऊ शकते.
१० अशा वेळी एक ख्रिश्चन व्यक्ती, नामानाच्या उदाहरणाचा विचार करू शकते. कोडापासून बरा झाल्यावर त्याने यहोवाव्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही दैवताची उपासना न करण्याचा निश्चय केला. परंतु, राजाची मदत करणे हे त्याचे काम होते व त्यामुळे त्याला राजाबरोबर रिम्मोन दैवताच्या मंदिरात जावे लागले. त्याला कदाचित राजाला दंडवत करायलाही मदत करावी लागली असेल. त्यामुळे त्याने यहोवा देवाला क्षमा मागितली आणि आपल्याला शिक्षा करू नये अशी विनंती केली. नामान आता यहोवा देवाचा खरा उपासक होता व तो या खोट्या दैवताची उपासना करत नव्हता; तो फक्त राजाच्या हुकूमामुळे तेथे हजर होता.—२ राजे ५:१-१९.
११ आपल्यालाही कदाचित वाटेल की, खोट्या धर्माच्या कोणत्याही कार्यांत भाग न घेता आपण अशा प्रसंगांना फक्त उपस्थित राहू. अशा प्रसंगांना जायचे की नाही हा पूर्णपणे त्या व्यक्तीचा स्वतःचा निर्णय असला पाहिजे. पतीच्या किंवा पालकांच्या मर्जीला आदर दाखवणे आणि यहोवाच्या आज्ञेत राहणे व देवाच्या वचनातून प्रशिक्षण मिळालेल्या आपल्या विवेकानुसार कार्य करणे यांमध्ये निर्माण होणारा वाद त्यांना सोडवावा लागेल.—१ पेत्र ३:१६; इफिस. ६:१.
१२ एक गोष्ट मात्र लक्षात असू द्या, की इतर लोक तुम्हाला पाहतील, आणि तुम्ही काय भूमिका घेतली आहे हे त्यांना माहीत नसल्यामुळे ते असा निष्कर्ष काढतील की तुम्ही सर्व विधींमध्ये भाग घेतला किंवा विधीला तुमची संमती होती. त्यामुळे प्रेषित पौलाच्या सल्ल्याप्रमाणे वागण्यात सुज्ञता आहे; त्याने म्हटले: “जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे; तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मळ असावे व इतरांस अडखळण होऊ नये.”—फिलिपै. १:१०, NW.
१३ नातेवाईकांना आपली शास्त्रवचनांवर आधारित भूमिका समजावून सांगणे जास्त उचित ठरणार नाही का? एखाद्या विशिष्ट प्रसंगाचे आमंत्रण मिळण्याआधीच आपल्याला अशी संधी मिळू शकेल. सर्व जण चांगल्या मनःस्थितीत असतात तेव्हा याविषयी समजावून सांगणे उत्तम ठरेल; याबाबतीत एस्तेर राणीचे उत्तम उदाहरण आपल्यापुढे आहे. अशा प्रसंगांना आपण शुद्ध विवेक बाळगून उपस्थित का राहू शकत नाही हे त्यांचे मन न दुखावता सांगून आपल्या विश्वासांची आपण साक्ष देऊ शकतो. आपण त्यांना हेही सांगू शकतो, की आपण उपस्थित राहिलो आणि कोणत्याही विधीत भाग घेतला नाही तर कुटुंबातील इतर लोकांना वाईट वाटेल.—एस्तेर ५:१-८.
१४ एक ख्रिश्चन व्यक्ती, बायबल शिकवणुकींच्या विरोधात असलेल्या कोणत्याही प्रार्थनांमध्ये किंवा धार्मिक कार्यांमध्ये जाणीवपूर्वक भाग घेणार नाही. किंवा देवाच्या आज्ञा स्पष्टपणे न मोडता आपण कोठवर धर्मत्यागी कृत्ये करू शकतो हे पाहायची देखील त्याची इच्छा नसते. ख्रिश्चन व्यक्तीवर शास्त्रवचनांतील पुढील आज्ञेचे पालन करण्याची जबाबदारी आहे: “तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका; कारण नीति व स्वैराचार ह्यांची भागी कशी होणार? . . . विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार? . . . म्हणून ‘त्यांच्यामधून निघा व वेगळे व्हा,’ असे प्रभु म्हणतो, ‘आणि जे अशुद्ध त्याला शिवू नका.’”—२ करिंथ. ६:१४-१७.
१५ अशा धार्मिक कार्यांना उपस्थित न राहण्याद्वारे आपण असे भासवू इच्छित नाही, की आपण नातेवाईकांना टाळत आहोत. कुटुंबाबद्दल आपल्याला काळजी व प्रेम आहे हे आपण इतर कार्यांद्वारे दाखवण्यास दक्ष असले पाहिजे. जे नव्याने आईवडील बनले आहेत त्यांना भेटवस्तू देऊन आपण कुटुंबातल्या नवीन सदस्याबद्दल प्रेम व्यक्त करू शकतो; शिवाय, अशी भेटवस्तू देण्याकरता आपण एखाद्या विशिष्ट प्रसंगासाठी थांबून राहू नये. रिसेप्शनच्या तयारीसाठी मदत व सहकार्य दिल्याने किंवा लग्नासाठी येणाऱ्या पाहुण्यांचे, नातेवाईकांचे स्वागत करण्यात स्वतःला व्यस्त ठेवल्याने आपण आपोआपच सर्व प्रकारच्या धार्मिक विधींपासून दूर राहू आणि आपल्याला विवाहाबद्दल इतकी आस्था नाही असा कोणाचा गैरसमजही होणार नाही. घरातल्या कोणाचा मृत्यू होतो तेव्हा घरातील इतरजण धार्मिक कार्यांत व्यस्त असतात त्या वेळी आपण काही व्यावहारिक मदत देऊ शकतो. पाहुणे-रावळे येतात तेव्हा त्यांची आपण काळजी घेऊ शकतो, त्यांच्या राहण्याची सोय करू शकतो, खास प्रकारचे भोजन न घेणाऱ्या व शाळेत जाणाऱ्या मुलांसाठी किंवा नातवंडांसाठी स्वयंपाक करू शकतो. कायदेविषयक व नोंदणीविषयक कामांत आपण व्यावहारिक मदत करू शकतो. यावरून, आपल्याला घरच्यांबद्दल प्रेम नसल्यामुळे आपण अन्नप्राशन, श्राद्ध किंवा इतर धार्मिक कार्यांत भाग घेतला नाही, असा कुटुंबातल्या लोकांचा ग्रह होणार नाही.