कुटुंब प्रमुखांनो—आध्यात्मिक नित्यक्रम टिकवून ठेवा
१ बॅबिलोनमधील मूर्तीपूजक व भ्रष्ट वातावरणात अनेक दशके राहिल्यावरही दानीएल यहोवाची “नित्य सेवा” करणारा म्हणून प्रसिद्ध होता. (दानी. ६:१६, २०) त्याने आपली आध्यात्मिकता कशी टिकवून ठेवली होती? बायबल अहवाल सांगतो, की खऱ्या उपासनेच्या संबंधाने असलेली कार्ये तो नियमाने पार पाडत असे. उदाहरणार्थ, तो आपल्या घराच्या माडीवर जाऊन नित्यक्रमाप्रमाणे दिवसातून तीनदा प्रार्थना करीत असे. (दानी. ६:१०) यात काही शंका नाही की त्याने नियमशास्त्राचे वाचन, यासारख्या इतर आध्यात्मिक कार्यांमध्ये देखील स्वतःचे उत्तम उदाहरण ठेवले असेल. त्यामुळेच, त्याच्यासमोर एक जीवघेणी परीक्षा आली तेव्हा यहोवाच्या उपासनेच्या बाबतीत तो मुळीच डळमळला नाही आणि चमत्कारिकरीत्या त्याची सुटका झाली.—दानी. ६:४-२२.
२ तसेच आज आपणही “सर्व एकाग्रतेने . . . जागे” राहण्यास झटले पाहिजे. (इफिस. ६:१८, पं.र.भा.) आपण राहत असलेले जग “त्या दुष्टाला वश झाले आहे.” (१ योहा. ५:१९) विरोध किंवा परीक्षा अचानक येऊ शकतात आणि आपल्या विश्वासाची परीक्षा होऊ शकते. मोठ्या संकटाच्या दरम्यान देवाचे सेवक मागोगचा गोग याच्या हल्ल्याचे लक्ष्य बनतील; बचाव मिळण्याची कसलीच संधी नाही असे तेव्हा भासेल. यासाठी देवावर संपूर्ण भरवसा ठेवण्याची गरज आहे.—यहे. ३८:१४-१६.
३ “प्रभावी कौटुंबिक बायबल वाचन, अभ्यास आणि चर्चा यांना आपले जीवनक्रम बनवणे ही एक प्रमुख गोष्ट आहे,” असे सन १९९८ च्या प्रांतीय अधिवेशनातील नाटकाच्या प्रस्तावनेत म्हटले होते. त्या नाटकाचे शीर्षक होते, “कुटुंबांनो, दैनिक बायबल वाचन आपले जीवनक्रम बनवा!” त्यातच पुढे असे म्हटले होते, की “कुटुंबे जेव्हा असा कार्यक्रम नियमाने अनुसरतात आणि बायबलला अगदी खरे बनवतात तेव्हा बायबलवर आधारित असलेल्या या नित्यक्रमामुळे कुटुंबावर जबरदस्त प्रभाव पडू शकतो. यामुळे आपल्या ज्ञानात भर पडते. आपला विश्वास पक्का होतो. याद्वारे आपल्याला प्राचीन काळच्या अत्यंत विश्वासू स्त्रीपुरुषांचा आदर्श मिळतो जे आपल्याला प्रेरणा देऊ शकतात, सत्याच्या बाजूने उभे राहण्यास प्रवृत्त करू शकतात.” उत्तम आध्यात्मिक नित्यक्रमाच्या विविध पैलूंवर आपण आता चर्चा करत असताना, कुटुंब प्रमुख, आपल्या कुटुंबाच्या आध्यात्मिक कार्यक्रमात सुधारणा आणण्यासाठी एक किंवा दोन मार्ग शोधू शकतात.
४ देवाच्या वचनावर दररोज विचार करा: “देवाचे राज्य बिनविरोध राज्य करेल तेव्हा; जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही त्याच्याच इच्छेप्रमाणे सर्वकाही होईल. त्यावेळी कोणी कोणाला त्रास देणार नाही, ‘प्राणी देखील कोणाला उपद्रव देणार नाहीत व नासधूस करणार नाहीत.’ (यश. ११:९; मत्त. ६:९, १०)” हे शब्द, शास्त्रवचनांचे दररोज परीक्षण करणे—२००१, सप्टेंबर ११ च्या दैनिक वचनाखालील मजकूरातले आहेत. ही आठवण किती सांत्वनदायक ठरली! कुटुंब प्रमुख या नात्याने कुटुंब मिळून बायबलचे वचन आणि त्याखालील माहितीची चर्चा करण्याचा तुमचा रिवाज आहे का? हे अतिशय लाभदायक आहे. सकाळच्या वेळी संपूर्ण कुटुंबाला एकत्र यायला जमत नसेल तर दिवसांतील कोणत्याही इतर वेळी तुम्ही एकत्र मिळून चर्चा करू शकता. एका पित्याने म्हटले: “रात्रीच्या जेवणाची वेळ आम्हा सर्वांसाठी दैनिक बायबल वचनाची चर्चा करण्यासाठी अगदी उत्तम वेळ आहे.”
५ कुटुंब या नात्याने दैनिक वचनाची चर्चा करण्याचा तुमचा आधीपासूनच नित्यक्रम असेल तर मग तुम्ही प्रशंसेस योग्य आहात. याच वेळी कदाचित तुम्ही बायबलचा एक भाग वाचून आणखी लाभ मिळवू शकता. दिवसाचे वचन ज्या अध्यायातून घेतले आहे तो संपूर्ण अध्याय वाचून काढण्याची काहींची सवय आहे. इतर काही, बायबलच्या एखाद्या निवडक पुस्तकाचा एक एक अध्याय वाचतात. बायबलचे दररोज वाचन केल्याने तुमच्या कुटुंबाला यहोवाला नाराज करण्याचे हितकारक भय विकसित करण्यास मदत मिळेल आणि त्याची इच्छा पूर्ण करण्याची त्यांची इच्छा आणखी वाढेल.—अनु. १७:१८-२०.
६ दिलेल्या माहितीच्या व्यावहारिक मूल्याची चर्चा करण्यासाठी आणखी जरा वेळ दिल्यास बायबलचे वाचन करण्याचा आणि दैनिक वचनाची चर्चा करण्याचा तुमच्या कुटुंबाचा कार्यक्रम आणखी लाभदायक होऊ शकतो. सेवा प्रशाला (इंग्रजी) पाठ्यपुस्तकाच्या पृष्ठ ६० वर असे सुचवण्यात आले आहे: “तुम्ही कदाचित . . . आठवड्याच्या बायबल वाचनातून काही वचने निवडू शकता, त्यांचा काय अर्थ होतो त्याची चर्चा करू शकता आणि मग, ‘यातून आपल्याला कोणते मार्गदर्शन मिळते? आपण या वचनांचा सेवेत कशाप्रकारे उपयोग करू शकतो? ही वचने आपल्याला यहोवाविषयी आणि तो ज्या पद्धतीने सर्व काही करतो त्या मार्गांविषयी काय सांगतात आणि यामुळे त्याच्याबद्दलचा आपला आदर कसा वाढतो?’ असे प्रश्न विचारू शकता.” अशाप्रकारची आध्यात्मिक चर्चा तुमच्या घराण्याला “प्रभूची इच्छा काय आहे हे समजून” घेण्यास मदत करेल.—इफिस. ५:१७.
७ कौटुंबिक अभ्यास: दर आठवडी कौटुंबिक अभ्यास घेऊन कुटुंब प्रमुख आपल्या मुलांना दाखवू शकतात की आध्यात्मिक गोष्टी या नेहमी पहिल्या येतात. एक तरुण आठवून सांगतो: “कधीकधी बाबा कामावरून घरी इतके थकून यायचे की त्यांचे डोळे आपोआप मिटायचे; पण तरीसुद्धा आमचा कौटुंबिक अभ्यास न चुकता व्हायचा. यामुळे आम्हाला अभ्यासाचं गांभीर्य समजलं.” मुलेही या व्यवस्थेला यशस्वी बनवू शकतात. नऊ मुले असलेले एक कुटुंब कौटुंबिक अभ्यास करण्यासाठी सकाळी पाच वाजता उठायचे कारण इतर कोणत्याही वेळी त्यांना हे शक्य नव्हते.
८ कौटुंबिक अभ्यास परिणामकारक होण्यासाठी कुटुंब प्रमुखांनी “आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष” दिले पाहिजे. (१ तीम. ४:१६) सेवा प्रशाला (इंग्रजी) पाठ्यपुस्तकाच्या पृष्ठ ३२ वर असे म्हटले आहे: “परिणामकारक कौटुंबिक अभ्यासाची सुरवात ही, कुटुंबाच्या गरजांच्या चर्चेनेच होते असे म्हटले जाते. तुमच्या कुटुंबातील सदस्य आध्यात्मिकरीत्या कशी प्रगती करीत आहेत? . . . तुम्ही तुमच्या मुलांबरोबर क्षेत्र सेवेत असताना, त्यांच्या मित्रांसमोर, यहोवाचे साक्षीदार म्हणून ते स्वतःची ओळख द्यायला कुचराई करतात का? कौटुंबिक बायबल वाचनाचा आणि अभ्यासाचा तुम्ही बनवलेला कार्यक्रम त्यांना आवडतो का? यहोवाच्या मार्गांना ते खरोखरच आपल्या जीवनाचा मार्ग बनवत आहेत का? काळजीपूर्वक परीक्षण केल्यावर तुम्हाला समजेल, की कुटुंबाचा मस्तक या नात्याने तुम्हाला, कुटुंबातील प्रत्येक सदस्याला स्वतःमध्ये आध्यात्मिक गुण विकसित करून ते वाढवण्यासाठी काय केले पाहिजे.”
९ मंडळीच्या सभा: मंडळीच्या सभांची तयारी करून त्यांना उपस्थित राहणे हा तुमच्या आठवड्याच्या नित्यक्रमाचा महत्त्वपूर्ण भाग असला पाहिजे. (इब्री १०:२४, २५) कधीकधी तुम्हाला कुटुंब मिळून काही सभांची तयारी करता येईल. शेवटच्या मिनिटापर्यंत थांबून राहण्याऐवजी तुम्ही आधीच चांगली तयारी करण्याची योजना करू शकता का? याबाबतीत एक सुव्यवस्थित नित्यक्रम, तुमच्या तयारीचा आणि सभांमधून तुम्हाला मिळणारे लाभ या दोन्हींचा दर्जा वाढवेल.—नीति. २१:५.
१० गुणवत्ता आणि सातत्यता ही परिणामकारक आध्यात्मिक नित्यक्रमाची वैशिष्ट्ये आहेत. सर्व सभांची तयारी करायला तुमची परिस्थिती तुम्हाला अनुमती देत नसेल तर? सेवा प्रशाला (इंग्रजी) पाठ्यपुस्तकाच्या पृष्ठ ३१ वर असे सुचवण्यात आले आहे: “केवळ अभ्यास केला पाहिजे म्हणून साहित्य घाईघाईत वाचून काढण्याचा किंवा त्याहूनही वाईट म्हणजे, वेळ नाही म्हणून कशाचाच अभ्यास न करण्याचा धोका टाळा. त्याऐवजी, तुम्ही किती अभ्यास करू शकता ते ठरवा आणि मग त्या साहित्याचा चांगल्याप्रकारे अभ्यास करा. दर आठवडी असे करा. कालांतराने, इतर सभांची देखील तयारी करायला सुरवात करा.”
११ कुटुंबे सभांसाठी लवकर येतात तेव्हा, यहोवाची स्तुती करण्यासाठी आणि तो देत असलेल्या प्रशिक्षणाचा फायदा करून घेण्यासाठी ते योग्य मानसिक स्थितीत असतात. तुमच्या कुटुंबाला सभांना लवकर येण्याची सवय आहे का? यासाठी चांगल्याप्रकारचे समायोजन आणि कुटुंबातील सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. सभांच्या दिवशी तुमच्या कुटुंबाची खूप घाईगडबड किंवा तारांबळ होत असल्याचे तुमच्या लक्षात आल्यास तुम्ही यात काही फेरबदल करू शकता का? आधीच करून ठेवण्यासारखी काही कामे आहेत का? कुटुंबातील एखाद्या सदस्याकडे खूप काम असेल तर इतर सदस्य त्याला/तिला मदत करू शकतील का? घरातील सर्वजण सभांसाठी नेहमीपेक्षा फक्त काही मिनिटे लवकर निघाल्यास ताण कमी होऊ शकेल का? उचित प्रकारची योजना कुटुंबात आणि मंडळीत शांतीचा आत्मा टिकवून ठेवण्यास हातभार लावते.—१ करिंथ. १४:३३, ४०.
१२ क्षेत्र सेवा: सेवेमध्ये भाग घेण्यासाठी वेळ ठरवणे, हा उत्तम आध्यात्मिक नित्यक्रमाचा आणखी एक भाग आहे. जेसन नावाचा एक तरुण आठवून सांगतो: “आमच्या कुटुंबात, शनिवार सकाळची वेळ क्षेत्र सेवेसाठी ठरलेली होती. यामुळे माझा फायदा झाला कारण, मी जितका सेवेत जाऊ लागलो तितकेच अधिक मला दिसले की मी चांगल्या गोष्टी साध्य करू शकतो आणि तितकाच मला आनंदही मिळत असे.” साक्षीदार असलेल्या घरात लहानाचे मोठे झालेल्या अनेकांच्या प्रत्ययास हे आले आहे, की दर आठवडी क्षेत्र सेवेसाठी एक निश्चित वेळ ठरवल्यामुळे ख्रिस्ती सेवक या नात्याने त्यांना प्रगती करायला मदत मिळाली.
१३ सुव्यवस्थित नित्यक्रमामुळे, क्षेत्र सेवेत तुमचे कुटुंब घालवत असलेला वेळ अधिक आनंददायक आणि प्रतिफलदायी बनवण्यास मदत मिळू शकते. हे कसे साध्य करता येईल? जुलै १, १९९९, टेहळणी बुरूज पृष्ठ २१ वर असे म्हटले होते: “साप्ताहिक सेवेची तयारी करण्याकरता तुमच्या घरातील सदस्यांना मदत करण्यास तुम्ही अधूनमधून कौटुंबिक अभ्यासातील काही वेळेचा उपयोग करता का? असे करणे फार लाभदायक आहे. (२ तीमथ्य २:१५) असे केल्यामुळे घरातील सर्वांचे सेवाकार्य अर्थपूर्ण आणि फलदायक ठरेल. काही प्रसंगी, तुम्ही संपूर्ण कौटुंबिक अभ्यासात अशा प्रकारची तयारी करू शकता. बहुतेक वेळा, तुम्ही तुमच्या कौटुंबिक अभ्यासाच्या अखेरीस किंवा आठवड्या दरम्यान केव्हाही थोडा वेळ क्षेत्र सेवेच्या संदर्भात चर्चा करू शकता.” तुमच्या कुटुंबाने असे करून पाहिले आहे का?
१४ प्रगती करीत राहा: कोणकोणत्या बाबतीत तुमचे कुटुंब चांगले करत आहे, हे आतापर्यंतच्या चर्चेत तुम्ही पाहिले का? त्यांची प्रशंसा करा आणि अशीच प्रगती करीत राहण्याचा प्रयत्न करण्याचे प्रोत्साहन द्या. तुमच्या कुटुंबाला पुष्कळ बाबतीत सुधारणा करण्याची गरज आहे असे तुमच्या लक्षात येते तेव्हा एक किंवा दोन बाबतीत सुधारणा करायला सुरवात करा. या गोष्टी तुमच्या आध्यात्मिक नित्यक्रमाचा भाग बनल्यावर पुढच्या एक किंवा दोन बाबतीत सुधारणा करा. सकारात्मक आणि वाजवी राहा. (फिलिप्पै. ४:४, ५) तुमच्या कुटुंबाला उत्तम आध्यात्मिक नित्यक्रम बनवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतील हे खरे आहे, परंतु ते प्रयत्न व्यर्थ ठरणार नाहीत कारण यहोवा हे आश्वासन देतो, की “जो सरळ मार्गाने चालतो त्याला मी देवाने सिद्ध केलेले तारण प्राप्त करून देईन.”—स्तो. ५०:२३.