एकत्र बांधलेले असा
१ मानवाच्या शरीराची अद्भुत घडण पाहून तुम्ही कितीवेळा अचंबित झाला आहात? (स्तो. १३९:१४) शरीरातील प्रत्येक अवयव एकमेकांबरोबर सामंजस्यात कार्य करतात. देवाचे वचन, ख्रिस्ती मंडळीची तुलना एका सुसंघटीत शरीराशी करते. मंडळीतील सर्व सदस्य, मस्तकाच्या अर्थात ख्रिस्ताच्या मार्गदर्शनाखाली ‘प्रत्येक अस्थिबंधनाने जोडलेले आणि एकत्र बांधलेले’ आहेत. (इफिस. ४:१६अ, ईझी-टू-रीड भाषांतर) म्हणूनच यहोवा, ऐक्याने कार्य करणाऱ्या आपल्या लोकांचा अद्भुत कार्ये साध्य करण्यासाठी उपयोग करू शकतो.
२ पहिल्या शतकातील मंडळीतील सदस्यांनी एकमेकांच्या आध्यात्मिक व भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी “एकचित्ताने” कार्य केले. (प्रे. कृत्ये २:४४-४७) यहोवा त्यांच्या पाठीशी असल्यामुळे ते एक होऊन कठोर विरोधाला तोंड देऊन त्यावर मात करू शकले. (प्रे. कृत्ये ४:२४-३१) ते जेथे जेथे गेले तेथे तेथे त्यांनी राज्याच्या संदेशाचा प्रचार केला; त्या काळच्या संपूर्ण जगात त्यांनी सुवार्तेची घोषणा केली. (कल. १:२३) आधुनिक दिवसांतही, ख्रिस्ती मंडळीने या गोष्टी ऐक्याने मोठ्या प्रमाणावर साध्य केल्या आहेत. परंतु ही एकता कशामुळे येते?
३ देवाकडून मिळणाऱ्या शिक्षणामुळे एकमेकांजवळ येणे: संपूर्ण जगभरात आपण आपल्या उपासनेमुळे एक झालो आहोत. हे कसे शक्य आहे? ‘यथाकाळी’ आध्यात्मिक अन्न देणाऱ्या यहोवाच्या दृश्य माध्यमाचा आपण स्वीकार करतो. (मत्त. २४:४५) मंडळीत शिक्षक म्हणून त्याने दिलेल्या ‘मानवरूपी देणग्यांचा’ आपण गाढ आदर करतो. आध्यात्मिकरीत्या आपली भरवणूक करणाऱ्या यहोवाच्या तरतूदींचा आपण नम्रपणे स्वीकार करतो तेव्हा देवाच्या वचनाची आपली समज वाढते आणि येशूचे शिष्य या नात्याने त्याचे अनुकरण करण्याची सर्वांमध्ये एकसारखी इच्छा जागृत होते. आपण देवाच्या वचनाचा अभ्यास चालू ठेवून “ज्ञानाच्या एकत्वाप्रत” पोहंचण्याचा कसोशीने प्रयत्न केला पाहिजे. (इफिस. ४:८, ११-१३) बायबलचे दररोज वाचन करून तुम्हीही आपल्या आध्यात्मिक ऐक्याला हातभार लावत आहात का?
४ ख्रिस्ती बंधूवर्गामुळे ऐक्य: प्रेम आपल्याला ख्रिस्ती सभांमध्ये एकमेकांच्या समीप येण्यास प्रवृत्त करते. या सभांमध्ये आपण “एकमेकांकडे लक्ष” देत असतो. (इब्री १०:२४, २५) यामध्ये, आपल्या बांधवांना फक्त वरवरून नव्हे तर चांगल्याप्रकारे ओळखणे, यहोवा त्यांना जसे मौल्यवान समजतो तसे समजणे समाविष्ट आहे. (हाग्ग. २:७, NW तळटीप.) सभांमध्ये आपण, विश्वास प्रदर्शित करणारी त्यांची उत्तरे ऐकतो तेव्हा त्यांच्याबद्दलचे आपले प्रेम वाढते आणि आपले ऐक्य आणखी मजबूत होते. लोक तुम्हाला मंडळीच्या सभांसाठी नियमितपणे एकत्र येणाऱ्यांमध्ये गणतात का?
५ क्षेत्र सेवेत तुमचे सहकर्मी: सहउपासकांबरोबर सुवार्तेचा प्रचार केल्याने देखील आपण ऐक्याने देवाची इच्छा पूर्ण करू शकतो. “देवाच्या राज्याकरिता माझे सहकारी” असे म्हणून प्रेषित पौलाने बांधवांचा प्रेमाने उल्लेख केला. (कलस्सै. ४:११) सेवेमध्ये कार्य करत असताना, एकमेकांना आपले अनुभव सांगितल्याने व साहाय्य केल्याने आपली ख्रिस्ती कामगिरी पूर्ण करण्यास व एकतेचे बंधन मजबूत करण्यास मदत मिळते.—कलस्सै. ३:१४.
६ पवित्र आत्म्याचा प्रभाव ऐक्याला पोषक: यहोवाची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण मनापासून प्रयत्न करतो तेव्हा यहोवा आपल्याला त्याचा पवित्र आत्मा देतो. यामुळे आपल्यातील मतभेद सुरळीतपणे हाताळण्यास व ऐक्याने राहण्यास आपल्याला मदत मिळते. (स्तोत्र १३३:१) पवित्र आत्मा आपल्याला “आत्म्याच्याद्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखावयास” प्रेरित करतो. (इफिस. ४:३) एकमेकांबरोबर व्यवहार करताना आत्म्याचे फळ प्रदर्शित करून देवाच्या लोकांमध्ये असलेल्या सुसंगततेला प्रत्येक जण हातभार लावू शकतो.—गलती. ५:२२, २३.
७ ख्रिस्ताच्या मस्तकपदाच्या अधीन राहून ऐक्याने कार्य केल्याने “आपली रचना प्रीतीमध्ये होण्यासाठी शरीर आपली वृद्धि करून घेते.” (इफिस. ४:१६ब) शिवाय, “शांतीचा देव” यहोवा याचे गौरव होते.—रोम. १६:२०.