तुम्हाला इतरांना मदत करायची “इच्छा” आहे का?
१ येशूला लोकांची खरोखरच काळजी होती. एका कुष्ठरोग्याने येशूला मदतीची विनंती केली तेव्हा त्याने आपला हात लांबवून त्याला स्पर्श करीत म्हटले: “माझी इच्छा आहे, शुद्ध हो.” (तिरपे वळण आमचे.) (मार्क १:४०-४२) इतरांना मदत करण्याची येशूची जशी मनोवृत्ती होती तशी मनोवृत्ती आपणही कोणकोणत्या मार्गांनी बाळगू शकतो?
२ आवड दाखवणारे लोक: आवड दाखवणाऱ्या लोकांना यहोवाचे उपासक होण्यासाठी केलेल्या मदतीत मंडळीतील प्रत्येक सदस्याचा भाग असतो. नवीन लोक सभांना येतात तेव्हा त्यांना भेटा, त्यांच्याशी ओळख करून घ्या. त्यांना उत्तेजन देण्याचे मार्ग शोधा. ते सभांमध्ये उत्तरे देतात तेव्हा त्यांची प्रशंसा करा. बायबल तत्त्वांना आपल्या जीवनात लागू करण्याचा ते प्रयत्न करतात तेव्हाही त्यांची प्रशंसा करा. मंडळीमध्ये त्यांना खरे मित्र मिळवता येतील हे पाहण्यास त्यांना मदत करा.
३ सहउपासक: ‘विश्वासाने एका घरचे झालेल्यांना’ खासकरून वेगवेगळ्या मार्गांनी मदतीची गरज असते. (गलती. ६:१०) पुष्कळांना आरोग्याच्या समस्या असतात. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही भेट देता तेव्हा त्यांना तुमचा सहवास लाभतो आणि तुम्ही कदाचित त्यांना व्यावहारिक मार्गांनीसुद्धा मदत करू शकता. काही बंधूभगिनींना आपल्या जीवनात दुसऱ्या काही समस्या असतील. त्यांचे ऐकून घेण्यासाठी व त्यांची उभारणी करण्यासाठी वेळ काढून तुम्हाला त्यांच्याबद्दल काळजी आहे हे दाखवा. (१ थेस्सलनी. ५:१४) मंडळीतले वडील आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना त्यांनाही आपल्या सहकार्याची आवश्यकता असते. (इब्री १३:१७) स्वेच्छेचा व मदतीचा आत्मा दाखवून आपण आपल्या सहउपासकांचे “सांत्वन” करू शकतो.—कलस्सै. ४:११.
४ कौटुंबिक सदस्य: येशूला लोकांबद्दल जशी काळजी होती त्याचप्रकारची काळजी आपण आपल्या घरातील सदस्यांबद्दलही बाळगली पाहिजे. पालकांना आपल्या मुलांची खूप काळजी असल्यामुळेच ते त्यांना ‘प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात वाढवतात.’ (इफिस. ६:४) कौटुंबिक अभ्यासासाठी, मंडळीच्या सभांसाठी किंवा क्षेत्र सेवेसाठी मुले तत्परतेने तयार होऊन आपल्या पालकांना सहकार्य देऊ शकतात. प्रौढ मुले, आपल्या पालकांवर उतारवयामुळे आलेल्या समस्यांना तोंड द्यायला त्यांना मदत करून त्यांच्याबद्दल येशूप्रमाणे कळवळा व्यक्त करू शकतात. या आणि इतर मार्गांद्वारे आपण सर्व ‘आपल्या घरच्यांबरोबर सुभक्तीनुसार वागू’ शकतो.—१ तीम. ५:४.
५ इतरांना मदत करून आपण येशूचे अनुकरण करतो तेव्हा आपण कदाचित त्यांच्या दुःखाचे ओझे कमी करू शकू आणि आपल्या कुटुंबाला व मंडळीला आणखी जवळ आणू शकू. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण “करुणाकर पिता,” यहोवा याचे गौरव करत असतो.—२ करिंथ. १:३.