तुमच्या मंडळीच्या सेवेचे क्षेत्र मोठे आहे का?
१ यहुदियातील शहरांपासून गालीलच्या ग्रामीण भागांपर्यंत येशूने प्राचीन इस्राएलच्या मोठ्या क्षेत्रात चांगल्याप्रकारे साक्ष दिली. (मार्क १:३८, ३९; लूक २३:५) आपणही होता होईल तितक्या लोकांना सुवार्ता सांगितली पाहिजे. (मार्क १३:१०) पण, भारतातील फार कमी क्षेत्र मंडळ्यांना सेवेसाठी नेमण्यात आलेले आहे आणि अहवालांवरून असे दिसून येते, की या क्षेत्रांतसुद्धा चांगल्याप्रकारे व शिस्तबद्धपणे प्रचार करण्याची आवश्यकता आहे. अधिकाधिक लोकांना सुवार्ता सांगण्यासाठी आपण काय करू शकतो?
२ चांगल्याप्रकारे योजना करा: सेवा पर्यवेक्षकांनी व क्षेत्र सेवकाने, मंडळीच्या क्षेत्राचे नकाशानुसार विभाजन करावे आणि प्रत्येक विभागात २०० ते ३०० घरांपेक्षा जास्त घरे असू नयेत. शिवाय, वर्षातून एकदा चांगल्याप्रकारे पूर्ण करता येईल इतकेच क्षेत्र घ्यावे, त्यापेक्षा जास्त क्षेत्र घेऊ नये याची ते खात्री करू शकतात. काही विशिष्ट क्षेत्रांत, आपल्या साक्ष कार्याला सतत विरोध करणारे कट्टर लोक असतील तर त्या क्षेत्रात जाण्याऐवजी ज्या क्षेत्रांतील लोक आपला संदेश ऐकू इच्छितात अशा न नेमलेल्या क्षेत्रात जावे. (पडताळा लूक ९:५, ६) परंतु, याबाबतीत त्यांनी समजदारी दाखवावी; कधीकधी असे होते, की एखाद्या क्षेत्रात फक्त एकच विशिष्ट व्यक्ती गोंधळ माजवणारी असते; अशा वेळी, नकाशावर त्या व्यक्तीचे घर किंवा मार्ग नोंदून तेथे “जाऊ नये” असे चिन्हांकित करून बाकीच्या क्षेत्रात दक्षतेने कार्य करावे.
३ संपूर्ण मंडळीला, घरोघरच्या क्षेत्र कार्यांत जास्तीतजास्त वेळ खर्च करण्याचे उत्तेजन द्यावे. क्षेत्र सेवेच्या सभेची तयारी करून तेथे जाण्यासाठी सहसा पुष्कळ वेळ लागतो. पण इतक्या लांब जाण्याचा प्रयत्न करून, लोकांना सुवार्ता सांगण्यात फक्त एक तास किंवा त्याहीपेक्षा कमी वेळ देणे किती दुःखाची गोष्ट आहे. आपल्याकडे बायबल अभ्यास किंवा पुनर्भेटी असतील, परंतु त्या दोन किंवा तीन तास सेवा केल्यानंतरही केले जाऊ शकतात. काही चाळींमध्ये किंवा झोपडपट्ट्यांमध्ये हजारो लोक घरात, बाहेर असतात. अशा क्षेत्रात सेवा करणे सुरक्षित असेल तर एकएकट्याने सेवा करायला काय हरकत आहे? आपण सहसाक्षीदारांच्या फक्त नजरेत राहून एकएकट्याने सेवा केल्यास, इतर वेळा करतो त्यापेक्षा दुप्पट क्षेत्र पूर्ण करू शकू आणि प्रत्येक घरातही आपल्याला वैयक्तिकरीत्या चांगल्याप्रकारे साक्ष देता येईल.
४ चांगल्याप्रकारे तयारी करणे म्हणजे उचित भाषेतील प्रकाशने बाळगणे. ज्या शहरांत अनेक भाषा बोलल्या जातात अशा शहरांच्या प्रत्येक नकाशात त्या भाषा लिहून ठेवल्या जाऊ शकतात जेणेकरून पुस्तक अभ्यास पर्यवेक्षक त्यांच्या गटाकडे त्या भाषांची प्रकाशने आहेत की नाही याची खात्री करतील.
५ पूर्णपणे सहकार्य द्या: मोठ्या क्षेत्रात कार्य करायचे म्हटले तर त्यासाठी मंडळीतील सर्वांचे सहकार्य हवे. चर्चा करू इच्छिणारे लोक भेटतात तेव्हा समजदारी दाखवण्याची गरज आहे. क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीला साक्ष देण्याविषयी दक्ष असा आणि तुमच्या क्षेत्र सेवेच्या गटातील थांबून राहिलेल्या इतरांचाही विचार करा. एखाद्या आस्थेवाईक व्यक्तीबरोबर तुम्ही संभाषण चालू ठेवू इच्छित असाल तर, गटातील इतर जण तुमच्यासाठी खोळंबून राहणार नाहीत म्हणून काही व्यवस्था करता येईल का?
६ आवड दाखवणाऱ्या सर्व लोकांना भेटण्याची निश्चित योजना करा. त्या लोकांचा फक्त पत्ताच नव्हे तर त्यांचा फोननंबरही मिळवा जेणेकरून तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून टेलिफोनवरही त्यांना आणखी साक्ष देऊ शकाल. रस्त्यांना नावे नसतील किंवा घरांना क्रमांक नसतील तर तुम्ही स्वतः एक नकाशा तयार करा किंवा त्या क्षेत्राचे सविस्तर वर्णन करा जेणेकरून त्या व्यक्तीचे घर लगेच सापडेल.
७ “ज्या ज्या नगरात किंवा गावात तुम्ही जाल त्यात कोण योग्य आहे हे शोधून काढा,” ही येशूने दिलेली आज्ञा पूर्ण करणे हा आपल्याला मिळालेला खरोखर किती मोठा बहुमान आहे! (मत्त. १०:११) या प्रतिफलदायी कार्यांत तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांवर यहोवाचा निश्चितच आशीर्वाद असेल!