प्रचार का करत राहावा?
१ राज्याच्या प्रचाराचे कार्य तुमच्या क्षेत्रात बऱ्याच काळापासून केले जात आहे का? (मत्त. २४:१४) असल्यास, आपल्या मंडळीचे क्षेत्र पूर्ण झाले आहे असे तुम्हाला वाटण्याची शक्यता आहे. आता तुम्ही जेव्हा प्रचाराला जाता तेव्हा बहुतेक लोक राज्य संदेशाबद्दल अनास्था दाखवतात असे तुम्हाला कदाचित आढळेल. पण यशयाची भविष्यवाणी २ (इंग्रजी) यातील पृष्ठ १४१ वर येशूच्या खऱ्या शिष्यांविषयी काय म्हटले आहे त्याकडे लक्ष द्या: “काही भागांत, खूप कार्य करून आणि खूप मेहनत घेऊनही त्यांच्या सेवेमुळे मिळणारे परिणाम अगदी नगण्य आहेत असे कदाचित भासेल. पण तरीसुद्धा ते कार्य करत राहतात.” पण ते सातत्याने प्रचार का करतात?
२ यिर्मयाला आठवा: आपले प्रचार कार्यात विश्वासूपणे टिकून राहणे हे, लोक आपले ऐकतात किंवा नाही यावर अवलंबून नसावे. यिर्मयाने ४० वर्षे एकाच क्षेत्रात कार्य केले; फार कमी लोकांनी त्याचे ऐकले आणि बरेच जण त्याच्या संदेशाचा विरोध करत होते. पण यिर्मया का टिकून राहिला? कारण तो देवाने आज्ञा दिल्याप्रमाणे कार्य करत होता आणि भविष्यात काय घडणार आहे हे माहीत असल्यामुळे त्याला लोकांना सांगितल्याशिवाय राहावले नाही.—यिर्म. १:१७; २०:९.
३ आपणही आज तशाच परिस्थितीत आहोत. येशूने आपल्याला अशी आज्ञा दिली आहे, की “लोकांस उपदेश करा व अशी साक्ष द्या की, देवाने नेमलेला असा जिवंतांचा व मेलेल्यांचा न्यायाधीश तो हाच आहे.” (प्रे. कृत्ये १०:४२) आपल्याजवळ असलेला संदेश अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण तो ऐकणाऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. सुवार्तेला लोक कसा प्रतिसाद देतात यानुसारच त्यांचा न्याय केला जाईल. तेव्हा आपल्याला जे सांगितले आहे त्यानुसार करण्याची आपली जबाबदारी आहे. लोकांनी ऐकण्यास नकार दिला तरीसुद्धा आपले कर्तव्य करत राहण्याद्वारे आपल्याला लोकांविषयी असलेले प्रेम व्यक्त करण्याची आणि यहोवाप्रती आपली निष्ठा दाखवण्याची संधी मिळते. पण इतकेच नाही.
४ आपल्याला फायदा होत आहे: क्षेत्रातील प्रतिसाद कसाही असो, पण देवाची इच्छा पूर्ण करण्याद्वारे आपल्याला आंतरिक शांती, समाधान आणि आनंद मिळतो जो इतर कोणत्याही मार्गाने मिळवता येत नाही. (स्तो. ४०:८) आपल्या जीवनाला खरा अर्थ आणि उद्देश लाभतो. आपण सेवाकार्यात जितका सहभाग घेतो तितकेच आपले हृदय आणि मन देवाच्या नव्या जगात जगण्याच्या आनंददायक आशेवर आणि आनंदावर केंद्रित राहते. बायबलच्या या प्रतिज्ञांवर सतत मनन करीत राहिल्यामुळे आपली आध्यात्मिक उन्नती होते आणि यहोवासोबतचा आपला नातेसंबंध अधिक दृढ होत जातो.
५ आपल्या प्रचार कार्याचे परिणाम लगेच दिसून येत नसले तरीसुद्धा एखाद्या व्यक्तीच्या मनात रुजलेले सत्याचे बीज यहोवाच्या नियुक्त वेळी अंकुरित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (योहा. ६:४४; १ करिंथ. ३:६) यहोवाच्या लोकांच्या प्रयत्नांमुळे आपल्या क्षेत्रात आणि सबंध जगात आणखी किती लोक राज्याविषयी शिकून घेतील हे कोणालाही माहीत नाही.
६ येशूच्या पुढील आज्ञेचे पालन करण्याची पूर्वी कधी नव्हती इतकी आज गरज आहे: “सावध असा, जागृत राहा; कारण तो समय केव्हा येईल हे तुम्हाला ठाऊक नाही. जे मी तुम्हाला सांगतो तेच सर्वांना सांगतो, जागृत राहा.” (मार्क १३:३३, ३७) तेव्हा, आपण सर्वजण राज्याची सुवार्ता गाजवत राहू या आणि त्याद्वारे यहोवाच्या महान व पवित्र नामाच्या पवित्रीकरणात सहभागी होऊन त्याचे अंतःकरण आनंदित करत राहू या.