“काही रक्कम बाजूला काढून ठेवावी”
सुरवातीच्या ख्रिस्ती मंडळीत, काही आर्थिक गरजा होत्या. त्यामुळे प्रत्येकाला त्याच्या मिळकतीप्रमाणे या गरजा पूर्ण करण्याकरता ‘काही रक्कम बाजूला काढून ठेवण्याचे’ प्रोत्साहन देण्यात आले. (१ करिंथ. १६:१-३, सुबोध भाषांतर) त्या बांधवांच्या उदारतेमुळे, अनेकांनी “देवाचे आभार प्रदर्शन” केले व यामुळे सर्वांना आनंद झाला.—२ करिंथ. ९:११, १२.
आज यहोवाच्या लोकांचे जगव्याप्त कार्य वाढतच चालले आहे आणि यामुळे आर्थिक साहाय्याची गरजही वाढत चालली आहे. तेव्हा आपण देखील ही गरज पूर्ण करण्याकरता ‘काही रक्कम बाजूला काढून ठेवणे’ योग्य ठरेल. (२ करिंथ. ८:३, ४) मागच्या वर्षी संस्थेवर लादण्यात आलेल्या आर्थिक निर्बंधांविषयी ऐकल्यावर बऱ्याच जणांनी नेहमीपेक्षा थोडी जास्त रक्कम ‘बाजूला काढून ठेवण्याची’ व्यवस्था केली. बांधवांचे हे प्रयत्न अतिशय प्रशंसनीय आहेत आणि यामुळे यहोवाचे समृद्ध आशीर्वाद मिळतात.—मला. ३:१०.
आपण जेव्हा जेव्हा प्रचार कार्यासाठी किंवा स्वतःच्या उपयोगासाठी मासिके किंवा साहित्य घेतो तेव्हा अनुदान देण्याकरता काही रक्कम बाजूला ठेवण्याची सवय लावणे चांगले आहे. आपल्या उदारतेने दिलेल्या दानामुळे संस्थेला केवळ पुस्तकांचे उत्पादन आणि ती पोच करण्यासाठीच नव्हे तर सबंध जगातील इतर कार्यांसाठीही मदत होते. मुलांना देखील दान देण्यात सहभाग घेण्याचे उत्तेजन दिले पाहिजे. आईवडील त्यांना खर्चासाठी जे पैसे देतात त्यातून ते स्वतः काही रक्कम ‘बाजूला काढून ठेवतात,’ मग ती अगदी थोडी असली तरीही त्यांना असे केल्यामुळे खूप समाधान मिळते.
पण या गोष्टीचा विसर पडणे साहजिक आहे. एका मंडळीतील वडिलांना असे दिसून आले की संस्थेला पाठवलेली एकूण रक्कम मागील वर्षांच्या तुलनेत बरीच कमी होती आणि दुसरीकडे मंडळीची जमा रक्कम वाढत चालली होती. संस्थेच्या कार्यासाठी लागणारा खर्च उचलण्याकरता देशातील प्रत्येक प्रचारकाला अंदाजे किती रक्कम पाठवली पाहिजे याचा त्यांनी हिशेब लावला. बांधवांनी याला प्रतिसाद दिला आणि आपल्या मंडळीकडून जागतिक कार्याकरता निदान इतकी रक्कम दर महिन्याला पाठवली पाहिजे आणि दानपेट्यांतील रक्कम कमी पडल्यास मंडळीच्या ठेवीतून ती भरून काढायची असे त्यांनी ठरवले.
दुसऱ्या एका मंडळीला असे आढळले की त्यांच्याकडे बरीच मासिके शिल्लक होती आणि हे मोलवान साहित्य व्यर्थ घालवण्यासारखे होते. त्यामुळे वडिलांनी स्थानिक बोटींच्या स्थानकावर खास नियतकालिक कार्य आयोजित केले आणि दान देण्याच्या सुसंधीविषयी लोकांना कशी जाणीव करून देता येईल याविषयी प्रचारकांना काही सूचना दिल्या. परिणामस्वरूप, ही मंडळी त्या महिन्यात १५,००० रुपयांपेक्षा अधिक रक्कम संस्थेला पाठवू शकली.
तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाने ‘काही रक्कम बाजूला काढण्याविषयी’ विचार केला आहे का? आर्थिक मदत अनेक मार्गांनी देता येते. (टेहळणी बुरूज नोव्हेंबर १, २००१ अंकातील पृष्ठे २८-९ पाहा.) खरा आनंद मिळवून देणारा हा एक बहुमान आहे असेच आपण मानतो आणि हे अगदी योग्य आहे.—प्रे. कृत्ये २०:३५.