आपणही यहोवाला काहीतरी देऊ शकतो
१ मानव देखील देवाला काहीतरी देऊ शकतात, हे तुम्हाला माहीत होते का? हाबेलाने आपल्या कळपातील पुष्ट जनावरे यहोवाला अर्पण केली. नोहा आणि ईयोबाने देखील अशाच प्रकारची अर्पणे केली. (उत्प. ४:४; ८:२०; ईयो. १:५) अर्थातच, या अर्पणांमुळे यहोवा समृद्ध झाला नाही कारण जगातील सर्व काही त्याचेच आहे. पण, अशा अर्पणांमुळे या विश्वासू लोकांचे देवावर खूप प्रेम असल्याचे सिद्ध झाले. त्याच प्रमाणे, आपला वेळ, आपली शक्ती आणि साधनसंपत्ती देऊन, आज आपण देखील यहोवाला “स्तुतीचा यज्ञ” अर्पण करू शकतो.—इब्री १३:१५.
२ वेळ: कमी महत्त्वाच्या गोष्टींत अधिक वेळ घालवण्याऐवजी आपली सेवा वाढवण्यासाठी वेळेचा ‘सदुपयोग’ करणे खरोखरच प्रशंसनीय आहे. (इफिस. ५:१५, १६) शक्य झाल्यास आपण आपल्या आराखड्यात थोडेफार फेरबदल करून वर्षभरात एक किंवा दोन महिन्यांसाठी साहाय्यक पायनियरींग करू शकू. किंवा आता आपण सेवेत घालवत असलेल्या वेळेपेक्षा थोडा जास्त वेळ सेवेसाठी देऊ शकू. दर आठवडी आपण नेहमीपेक्षा ३० मिनिटे जरी जास्त घालवली तरी महिना अखेरीस आपली सेवा कमीत कमी दोन तासांनी वाढेल.
३ शक्ती: सेवेत जास्त वेळ घालवण्यासाठी आपल्याला शक्तीची गरज आहे. म्हणूनच, ज्यामुळे आपण खूप थकून जातो अशा प्रकारचे मनोरंजन किंवा नोकरी आपण टाळली पाहिजे. कारण तसे न केल्यास आपण यहोवाची सेवा चांगल्या प्रकारे करू शकणार नाही. आपले मन चिंतेने ‘दबून’ जाईल अशी फाजील चिंता करण्याचे देखील आपण टाळले पाहिजे, कारण त्यामुळे देवाची सेवा करण्यासाठी आपल्याजवळ शक्ती उरत नाही. (नीति. १२:२५) कधीकधी काही गोष्टींविषयी चिंता करणे योग्य असू शकेल, पण अशा परिस्थितीतही “आपला भार” यहोवावर टाकणे किती उत्तम ठरेल!—स्तो. ५५:२२; फिलिप्पै. ४:६, ७.
४ साधनसंपत्ती: प्रचार कार्याला हातभार लावण्यासाठी आपण आपली साधनसंपत्ती देखील देऊ शकतो. गरज असलेल्यांना देण्यासाठी काही असावे म्हणून नेमाने “द्रव्य जमा करून ठेवावे” असे पौलाने सहख्रिश्चनांना उत्तेजन दिले. (१ करिंथ. १६:१, २) त्याच प्रकारे, आपल्या मंडळीकरता तसेच जगभरातील कार्याकरता दान देण्यासाठी आपणसुद्धा काही रक्कम वेगळी ठेवू शकतो. आपण मनःपूर्वक देत असलेले दान छोटेसे असले, तरी यहोवाच्या नजरेत त्याचे मूल्य जास्त आहे.—लूक २१:१-४.
५ यहोवाने आपल्याला भरपूर दिले आहे. (याको. १:१७) म्हणून, आपण उदारतेने आपला वेळ, आपली शक्ती आणि आपली साधनसंपत्ती त्याच्या सेवेसाठी देण्याद्वारे कृतज्ञता व्यक्त करतो. असे केल्याने यहोवाला आनंद होतो, “कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो.”—२ करिंथ. ९:७.