अधिक गरज असलेल्या ठिकाणी जाऊन तुम्ही सेवा करू शकाल का?
१ अधिक राज्य घोषकांची आवश्यकता असलेल्या ठिकाणी जाण्याचा तुम्ही कधी विचार केलात का? “आम्हाला साहाय्य कर” असे जर कोणी तुम्हाला आमंत्रण दिले तर प्रेषित पौलाप्रमाणे तुम्ही ते आमंत्रण स्वीकाराल का? (प्रे. कृत्ये १६:९, १०) अनेक मंडळ्यांना, क्षेत्र पूर्ण करण्यासाठी आध्यात्मिक प्रौढ कुटुंबांची, पायनियरांची आवश्यकता आहे. किंवा, मंडळीत पुढाकार घेण्यासाठी योग्य वडिलांची आणि सेवा सेवकांची आवश्यकता आहे. हे क्षेत्र म्हणजे दूरदूर विखुरलेली लहानलहान गावे. सर्वात जवळचे राज्य सभागृह कदाचित अनेक किलोमीटर दूर असेल. नोकरी मिळणे कठीण असेल. तिथले हवामान देखील नेहमीच चांगले नसेल. मग अशा ठिकाणी जाण्याचे आव्हान तुम्ही स्वीकाराल का? स्वीकारल्यावर तुम्ही यशस्वी कसे होऊ शकाल?
२ विश्वास आणि भरवसा आवश्यक: देवाच्या मार्गदर्शनानुसार, अब्राम आपली पत्नी, आपला पुतण्या व आपले वृद्ध वडील, तेरह यांच्यासह आपला मायदेश ऊर सोडून १,००० किलोमीटरचा प्रवास करून हारान येथे राहायला गेला. (उत्प. ११:३१, ३२; नहे. ९:७) तेरहच्या मृत्यूनंतर, यहोवाने ७५ वर्षांच्या अब्रामास हारान आणि आपले गणगोत सोडून आपण दाखवू त्या देशात जाण्यास सांगितले. अब्राम, साराय आणि लोट ‘जावयास निघाले.’ (उत्प. १२:१, ४, ५) अर्थात, सेवकांची अधिक गरज असलेल्या ठिकाणी जाण्यासाठी अब्राम चालला नव्हता. पण इतका लांबचा प्रवास करून जाण्यासाठी अब्रामाजवळ काय असण्याची आवश्यकता असावी?
३ त्याच्याठायी विश्वास बाळगण्याची आणि देवावर भरवसा बाळगण्याची तयारी असण्याची गरज होती. त्याला त्याच्या विचारसरणीत आणि जीवनशैलीत बदल करावा लागला. नातेवाईकांमध्ये राहात असताना त्याला एक प्रकारची सुरक्षितता होती, यासाठी त्याला मुकावे लागले. परंतु त्याने स्वतःला आणि आपल्या संपूर्ण घराण्याला यहोवाच्या हाती सोपवून दिले. आज अनेकांनी अब्रामासारखाच यहोवावरील आपला भरवसा प्रदर्शित केला आहे.
४ अल्पावधीच्या नेमणुकी: न नेमलेल्या क्षेत्रात कार्य केल्याने मिळणाऱ्या आशीर्वादांचा आनंद तुम्ही कधी अनुभवला आहे का? ज्यांनी तो आनंद अनुभवला आहे त्यांना खूप लांबचा प्रवास करावा लागला. पण त्यांच्या प्रयत्नांचे चीज झाले का?
५ उटा येथे गेलेल्या कॅलिफोर्नियातील एका बांधवाने असे लिहिले: “क्वचित उरकल्या जाणाऱ्या क्षेत्रात एक गट घेऊन जाण्याची जेव्हा मला विनंती करण्यात आली तेव्हा मला इतका आनंद झाला नाही. तरीपण मी ती नेमणूक स्वीकारली. मी घेतलेल्या निर्णयाचा मला मुळीच पस्तावा नाही; उलट यामुळे माझे जीवन पार बदलले. यहोवाने मला ही सुसंधी दिल्याबद्दल मी दररोज त्याचे फार आभार मानतो.” टेनिसी येथे गेलेल्या फ्लोरिडातील एका बांधवाने म्हटले, की तो त्यांच्या सत्यातील २० वर्षांच्या जीवनातील सर्वात संस्मरणीय अनुभव होता! कनेक्टिकट येथून वेस्ट व्हर्जिनिया येथे गेलेल्या एका किशोरवयीन बांधवाने म्हटले: “हा माझ्या जीवनातला सर्वात उत्तम अनुभव होता!” अधिक आवश्यकता असलेल्या ठिकाणी थोड्या दिवसांसाठी का होईना पण सेवा केल्याने सेवेबद्दलची त्यांची कृतज्ञता वाढली आहे असे अनेक प्रचारक कबूल करतील. ज्यांनी अशी सेवा केली आहे त्यांच्याशी बोला. त्यांच्या बोलण्यावरून तुम्हाला समजून येईल की या सेवेमुळे आध्यात्मिकरीत्या त्यांची उभारणी झाली व पुन्हा संधी दिल्यास ते अशाप्रकारची सेवा करायला तयार असतील.
६ अधिक गरज असलेल्या ठिकाणी सेवा करण्याची नेमणूक स्वीकारल्याने आणखी एक हेतू साध्य होतो. असे करणाऱ्यांना, देशातील इतर ठिकाणी जाऊन राहण्यासाठी “खर्चाचा अंदाज” करण्याकरता उपयुक्त माहिती मिळू शकते.—लूक १४:२८.
७ अंत येण्याआधी “सर्व जगात” सुवार्तेची घोषणा व्हावी असा यहोवाने निश्चय केला आहे. (मत्त. २४:१४) तेव्हा, तुम्हाला शक्य असल्यास अधिक गरज असलेल्या ठिकाणी जाण्यास तुम्ही इच्छुक आहात का? अशी अनेक ठिकाणे आहेत जेथे अधिक गरज आहे.
८ अधिक गरज असलेल्या ठिकाणी जाणे: तुम्ही सेवानिवृत्त आहात का? तुम्हाला नियमितपणे मिळकत मिळते का? नसेल तर तुम्ही स्वतःसाठी एखादे काम शोधू शकाल का? कोणत्याही ठिकाणी राहून तुम्ही टेलिफोन अथवा संगणकाद्वारे उपजीविका करू शकता का? दुसऱ्या ठिकाणी संपूर्ण कुटुंबाला जाता येत नसल्यास कुटुंबातील एखाद्या सदस्याला जायला तुम्ही मदत करू शकता का?
९ प्रार्थनापूर्वक विचार केल्यानंतर तुम्हाला, अधिक गरज असलेल्या ठिकाणी जाऊन राहण्याचे आव्हान स्वीकारता येईल असे वाटत असल्यास तुमच्या कुटुंबाबरोबर आणि तुमच्या मंडळीतील वडिलांबरोबर याबाबत चर्चा करा. आणि मग एक पत्र लिहून ते वडिलांना द्या, जेणेकरून ते शाखेला ते पत्र पाठवण्याआधी त्यात त्यांचे मत आणि त्यांची शिफारस लिहू शकतील.
१० या पत्रात तुम्ही काय लिहू शकता? तुमचे वय, बाप्तिस्म्याची तारीख, मंडळीत तुम्ही सांभाळत असलेल्या जबाबदाऱ्या, तुम्ही विवाहित आहात की अविवाहित किंवा कसे आणि तुमची मुले लहान आहेत का या गोष्टी नमूद करू शकता. देशातील कोणत्या राज्यांत सेवा करायला तुम्हाला आवडेल तेही तुम्ही लिहू शकता. उदाहरणार्थ, तुम्ही उष्ण व दमट ठिकाणी राहू शकता का? कडाक्याची थंडी तुम्ही सहन करू शकता का? समुद्रसपाटीपासून उंच असलेल्या ठिकाणी तुम्ही राहू शकाल का? तुम्हाला कोणत्या प्रादेशिक भाषा बोलता येतात का?
११ तुमच्यात आवेश आहे का, तुम्ही पुढाकार घ्यायला तयार आहात का? तुमची परिस्थिती तुम्हाला अधिक गरज असलेल्या ठिकाणी जाऊन सेवा करण्यास अनुमती देते का? असल्यास, स्वार्थ-त्यागाचा आत्मा दाखवणारे लोक यहोवावर भरवसा ठेवतात तेव्हा तो त्यांच्यावर आशीर्वादांचा वर्षाव कसा करीत राहतो याचा तुम्हालाही अनुभव घेता येईल!—स्तोत्र. ३४:८; मला. ३:१०.