“माझे मत ठाम आहे! मी बदलणार नाही! कधीच बदलणार नाही!”
१ मोठ्या प्रमाणावर झालेल्या कत्तलीतून बचावलेल्या एका विश्वासू ख्रिश्चनाने उद्गारलेले हे शब्द, नात्सींची अमानुष क्रूरता सहन करूनही आपल्या विश्वासाशी जडून राहिलेल्या—जिवंत किंवा मृत—अशा हजारो साक्षीदारांच्या पक्क्या विश्वासाचे हे पडसाद आहेत. (इफिस. ६:११, १३) त्यांच्या साहसाची व विजयाची चित्तथरारक व प्रेरणादायक कथा, जेहोवाज विटनेसेस स्टॅण्ड फर्म अगेन्स्ट नात्सी असॉल्ट या व्हिडिओत आहे. मंडळीतील सर्वांना हा व्हिडिओ पाहण्याचे व पाहिल्यावर त्यांच्या मनांवर व भावनांवर जी छाप पडली त्याविषयी इतरांनाही सांगण्याचे उत्तेजन दिले जात आहे.
२ पुढील प्रश्न कदाचित तुमच्या विचारशक्तीला चालना देऊ शकतील: (१) कोणत्या कारणास्तव यहोवाच्या साक्षीदारांनी नात्सींविरुद्ध ही धाडसी भूमिका घेतली होती? (२अ) “हेल हिटलर” या नाऱ्याच्या संबंधात कोणता वाद निर्माण झाला व का? (२ब) याचा एका साक्षीदार कुटुंबांवर कसा प्रभाव पडला? (३) छळछावण्यांमध्ये किती साक्षीदारांना पाठवण्यात आले, तेथे त्यांचे ओळखचिन्ह काय होते व गेस्टापोंनी त्यांना कशाप्रकारे वागवले? (४) आपले बांधव स्वातंत्र्यासाठी कोणती किंमत द्यायला तयार नव्हते? (५अ) हिटलरच्या राजवटीतील अत्याचाराविरुद्ध यहोवाच्या साक्षीदारांनी केव्हा आणि कशाप्रकारे आवाज उठवला? (५ब) यावर हिटलरने काय प्रतिक्रिया दाखवली? (६) यहोवाच्या साक्षीदारांच्या दृढ भूमिकेमुळे, त्यांच्या स्वतःच्या व इतरांच्या शारीरिक आणि आध्यात्मिक जीवनाचे रक्षण कसे झाले? (७) एका छळछावणीत कोणते राज्य गीत लिहिण्यात आले होते? (८) आपल्याला कोणत्याही परिस्थितीला तोंड द्यावे लागले तरी, कोणत्या विश्वासू स्त्रीपुरुषांचे आणि युवकांचे उदाहरण यहोवाशी एकनिष्ठ राहायची प्रेरणा देते? (१९९९ वार्षिकपुस्तक, [इंग्रजी] पृष्ठे १४४-७ पाहा.) (९) हा व्हिडिओ पाहिल्यावर, यहोवाचे साक्षीदार या नात्याने तुम्ही या जगाचा भाग नाहीत याबद्दल तुम्हाला कसे वाटते?
३ स्टॅण्ड फर्म व्हिडिओत दाखवलेल्या यहोवाच्या साक्षीदारांची उत्तम उदाहरणे, साक्षीदार नसलेल्या युवकांनाही, असहिष्णुता, साथीदारांचा दबाव, विवेकानुसार कार्य करण्याचा मुद्दा यांसारख्या महत्त्वपूर्ण निर्णयांना तोंड देण्यास मदत करू शकतात. तुम्ही, माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शाळेत शिकत असलेले विद्यार्थी असाल तर, या व्हिडिओतील माहिती वर्गातील इतर विद्यार्थ्यांनाही सांगण्यास तुम्ही आपल्या शिक्षकांना विनंती करू शकाल का? हा व्हिडिओ इतिहासाची थोडीशी माहिती देणारा आहे किंवा नैतिकतेविषयी धडा असलेला एक माहितीपट आहे असे सांगून तुम्ही त्यांना हा व्हिडिओ पाहायला देऊ शकता.
४ स्टॅण्ड फर्म व्हिडिओ, उचित ते करण्यास दृढ राहून देवाला आनंदी करण्याची आध्यात्मिक शक्ती प्रदान करणारे ईश्वरी शिक्षणाचे प्रभावशाली साधन आहे. (१ करिंथ. १६:१३) सत्याची आवड बाळगणाऱ्या सर्वांना हा व्हिडिओ जरूर दाखवा.