तुमच्या विद्यार्थ्याच्या हृदयावर सत्य बिंबवा
१ स्वर्गारोहण होण्याआधी येशूने आपल्या शिष्यांना, त्याने आज्ञापिलेल्या सर्व गोष्टी लोकांना “पाळावयास” शिकवा असे सांगितले. (मत्त. २८:१९, २०) एखाद्या व्यक्तीला ख्रिस्ताच्या आज्ञा ‘पाळायच्या’ असतील तर पहिल्याने त्या तिच्या अंतःकरणापर्यंत पोचल्या पाहिजेत. (स्तोत्र ११९:११२) तुम्ही ज्यांच्याबरोबर बायबलचा अभ्यास करता त्यांच्या हृदयावर बायबलच्या शिकवणुकी कशा बिंबवू शकाल?
२ यहोवाकडे मार्गदर्शनासाठी प्रार्थना करा: शिष्य बनवण्याचे कार्य देवाचे कार्य आहे. त्यामुळे या कार्यात आपल्याला यश हवे असेल तर आपल्याला आपल्या कौशल्याची नव्हे तर देवाच्या आशीर्वादाची गरज आहे. (प्रे. कृत्ये १६:१४; १ करिंथ. ३:७) तेव्हा, इतरांना सत्य शिकवण्यासाठी यहोवाला प्रार्थना करून मदत मागणे अत्यंत महत्त्वाचे आहे.—यश. ५०:४.
३ विद्यार्थ्याचे काय विश्वास आहेत ते आधी समजून घ्या: लोकांचा काय विश्वास आहे व ते असा विश्वास का करतात हे आधी आपण समजून घेतले तर त्यांच्या हृदयाप्रत पोहोचेल अशारितीने बोलणे आपल्याला शक्य होईल. एखाद्या विद्यार्थ्याला अमुक शिकवण जास्त का आवडते? ही शिकवण विश्वासयोग्य आहे, अशी कोणत्या गोष्टीमुळे त्याची पक्की खात्री झाली आहे? हे जर आपण माहीत करून घेतले तर आपण समजूतदारपणे बोलू शकू.—प्रे. कृत्ये १७:२२, २३.
४ बुद्धीला पटणारा शास्त्रवचनीय तर्क करा: आपण शिकवत असलेल्या सत्यात तथ्य आहे हे विद्यार्थ्याला समजून आले पाहिजे. (प्रे. कृत्ये १७:२४-३१) आपल्या आशेविषयी बुद्धीला पटणारे कारण आपल्याला देता आले पाहिजे. (१ पेत्र ३:१५) परंतु, हे सर्व अगदी प्रेमळपणे व धीराने करण्याची गरज आहे.
५ शिकवताना उदाहरणांचा उपयोग करा: सत्य शिकवताना उदाहरणांचा उपयोग केल्यास विद्यार्थ्याला मुद्दा सहजपणे समजतो शिवाय त्यामुळे त्याच्या भावनाही जागृत होतात. उदाहरणांचा मन आणि हृदय या दोन्हींवर प्रभाव पडतो. येशूने सर्रासपणे दाखल्यांचा अर्थात उदाहरणांचा उपयोग केला. (मार्क ४:३३, ३४) अर्थातच, तुम्ही देत असलेले उदाहरण, तुम्ही चर्चा करीत असलेल्या मुद्द्याला धरून असेल आणि तुमच्या विद्यार्थ्याच्या जीवनाशी संबंधित असेल तरच प्रभावी ठरू शकते.
६ सत्य आपलेसे केल्याने मिळणारे फायदे दाखवा: आपण शिकत असलेल्या गोष्टींचा अवलंब केल्याने आपल्याला कोणते फायदे मिळतील हे सहसा लोक जाणू इच्छितात. तुमच्या विद्यार्थ्याला २ तीमथ्य ३:१४-१७ येथील पौलाच्या शब्दांतील सुज्ञता पाहायला मदत करा.
७ तुमच्या शिकवणीला काही लोक प्रतिसाद देत नसले तरी निराश होऊ नका. सर्वच लोक सत्य स्वीकारणार नाहीत. (मत्त. १३:१५) परंतु, काही जण सत्य स्वीकारून विश्वास ठेवणारे होतात. (प्रे. कृत्ये १७:३२-३४) अधिकाधिक लोकांच्या हृदयावर सुवार्ता बिंबवण्यासाठी तुम्ही करत असलेला प्रयत्न, त्यांना सत्य स्वीकारण्यास व येशूने आज्ञापिलेल्या आज्ञा “पाळावयास” साहाय्य करो.