तुमच्या क्षेत्रातील कर्णबधिर लोकांकडे दुर्लक्ष करू नका
१ “ये. . . . ज्याला पाहिजे तो जीवनाचे पाणी फुकट घेवो,” असे यहोवा सर्वांना आमंत्रण देतो. (प्रकटी. २२:१७) या आमंत्रणाला बरेच कर्णबधिर लोकही प्रतिसाद देत आहेत. म्हणूनच, गेल्या १३ वर्षांमध्ये संयुक्त संस्थानांतील शाखेत, सांकेतिक भाषेच्या २७ मंडळ्या आणि सांकेतिक भाषेचे ४३ गट तयार करण्यात आले आहेत.
२ संपूर्ण जगभरातील अनेक राष्ट्रांमध्ये कर्णबधिरांच्या मंडळ्या आणि गट, त्यांच्या क्षेत्रातील कर्णबधिर आणि कमी ऐकू येणाऱ्या लोकांशी संपर्क साधून त्यांना प्रचार करण्याचा विशेष प्रयत्न करतात आणि त्यांना प्रचंड यशही प्राप्त झाले आहे. भारतात, अशा अनेकांना भेटून सुवार्ता देणे बाकी आहे. संपूर्ण देशात कमी ऐकू येणारे लाखो लोक असल्यामुळे या आगळ्यावेगळ्या क्षेत्रात कार्य करण्यासाठी व प्रगती करण्यासाठी भरपूर वाव आहे!
३ तुम्ही हातभार कसा लावू शकाल? तुम्ही कधी कर्णबधिर लोकांना सांकेतिक भाषेत एकमेकांशी संभाषण करताना पाहिले आहे का? तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा तुमच्या शाळेतील कोणा ओळखीच्या लोकांचे कोणी नातेवाईक कर्णबधिर आहेत का? तुमच्या दररोजच्या कार्यांदरम्यान अशा लोकांना शोधून काढण्याचा प्रयत्न करा. परंतु तुम्ही त्यांना राज्याची साक्ष कशी देऊ शकाल?
४ साक्ष देणे: एका पायनियर भगिनीला तिच्या क्षेत्रात पुष्कळ कर्णबधिर लोक भेटायचे. एकदा, एका सुपरमार्केटमधील एका दुकानात खरेदी करताना तिच्या जवळ एक तरुण स्त्री आली जी कर्णबधिर होती. तिने तिला एका कागदावर एका वस्तुविषयी लिहून विचारले. या पायनियर भगिनीने तिला हवी असलेली वस्तू शोधण्यास मदत केल्यानंतर, आपण कर्णबधिर लोकांना मदत करण्याकरता सांकेतिक भाषा शिकू इच्छितोय असे एका कागदावर तिने लिहून दाखवले. मग या कर्णबधिर स्त्रीने पुन्हा लिहून असे विचारले: “तुम्हाला लोकांना मदत का करायची आहे?” भगिनीने पुन्हा लिहिले: “मी यहोवाची साक्षीदार आहे, व मी कर्णबधिर लोकांना बायबल समजवू इच्छिते. तुम्ही जर मला सांकेतिक भाषा शिकवली तर मी तुम्हाला बायबल समजायला मदत करेन.” त्या तरुण स्त्रीने जेव्हा “ठीक आहे” असे उत्तर दिले तेव्हा “मला किती आनंद झाला असेल याची कल्पना करा.” आपली भगिनी त्या स्त्रीच्या घरी सहा आठवडे दररोज संध्याकाळी गेली. तिने सांकेतिक भाषा शिकून घेतली आणि त्या तरुण स्त्रीने सत्य शिकून बाप्तिस्माही घेतला!
५ तुमच्या क्षेत्रातील कर्णबधिर लोकांना आध्यात्मिक साहाय्य करू शकणारे तुमच्या मंडळीत कोणी नसल्यास काय? अशा लोकांना तुम्ही मदत कशी करू शकाल? अशा लोकांकडे पुन्हा जा आणि ज्यांना बोलता येते अशा इतर सदस्यांशी चर्चा करा. कर्णबधिर स्थानिकरीत्या कोणत्या सांकेतिक भाषेचा उपयोग करतात ते माहीत करून घ्या. काही प्रचारकांनी तर, कर्णबधिर लोकांनाही सुवार्ता सांगता यावी म्हणून स्थानीय सांकेतिक भाषा शिकून घेतली आहे. (प्रे. कृत्ये १६:९, १०) यहोवाच्या आशीर्वादाने व मनापासून तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांनी तुम्हाला नक्कीच चांगले फळ हाती लागेल.
६ तुमच्या क्षेत्रातील कर्णबधिर लोकांना शोधून तुम्ही या लोकांनाही जीवनाचे पाणी फुकट घेण्याची संधी देऊ शकाल.—मत्त. १०:११.