“आम्ही पुष्कळदा आमच्या क्षेत्रात प्रचारकार्य केले आहे!”
१ आपल्या क्षेत्रात इतक्या वेळा प्रचार कार्य झाले आहे, की येथे कोणी मेंढरासमान व्यक्ती आपल्याला भेटणारच नाही, असे कधी तुम्हाला वाटले आहे का? तुम्ही कदाचित असा विचार केला असावा: ‘इथले लोक काय प्रतिक्रिया दाखवतील हे मला आधीच माहीत आहे. मग ज्यांना आवड नाही अशा लोकांकडे नेहमीच का जायचे?’ हे खरे आहे, की अशी अनेक क्षेत्रे आहेत जेथे पुष्कळदा प्रचार कार्य झाले आहे. तरीपण आपण या गोष्टीकडे नकारात्मक नव्हे तर सकारात्मक दृष्टीने पाहावे. का बरे? खाली चार कारणे दिली आहेत, त्यांवर विचार करा.
२ आपल्या प्रार्थनेचे आपल्याला उत्तर मिळाले आहे: येशूने म्हटले होते: “पीक फार आहे परंतु कामकरी थोडे आहेत; म्हणून पिकाच्या धन्याने आपल्या पिकासाठी कामकरी पाठवावे म्हणून त्याची प्रार्थना करा.” (लूक १०:२) अनेक दशकांपासून आपण मदतीसाठी यहोवाला विनंती करत आलो आहोत. आणि पुष्कळ ठिकाणी आता ज्यादा कामकरी आहेत. म्हणूनच आपण एकाच क्षेत्रात अनेकदा प्रचार कार्य करतो. यावरून हे सिद्ध होते की यहोवाने आपल्या प्रार्थनेचे उत्तर दिले. मग, त्याबद्दल आपण आनंद मानू नये का?
३ धीराचे चांगले फळ मिळते: वारंवार प्रचार कार्य होत असलेल्या क्षेत्रांतले लोकही राज्य संदेशाला प्रतिसाद देऊन सत्याचे ज्ञान प्राप्त करत आहेत. त्यामुळे अधिकाधिक प्रामाणिक अंतःकरणाच्या लोकांना शोधण्याच्या उद्देशाने आपण वारंवार क्षेत्रात गेले पाहिजे. (यश. ६:८-११) येशूच्या आरंभीच्या शिष्यांनी केले त्याप्रमाणे आपणही आपल्याला नेमण्यात आलेल्या क्षेत्रातील लोकांकडे ‘जात राहिले पाहिजे.’ आणि देवाच्या राज्याबद्दल त्यांच्या मनात आवड निर्माण केली पाहिजे.—मत्त. १०:६, ७.
४ पोर्तुगालमधील अनेक मंडळ्यांना दर आठवडी एकाच क्षेत्रात जावे लागते आणि तरीदेखील त्यांना मेंढरासमान लोक भेटत आहेत. एका बहिणीची खासकरून अगदी सकारात्मक मनोवृत्ती आहे. ती म्हणते: “दररोज सकाळी सेवेला निघण्याआधी मी यहोवाला प्रार्थना करते की त्याने बायबलमध्ये आवड असलेल्या निदान एका तरी व्यक्तीशी माझी भेट घालून द्यावी.” एके दिवशी तिने ब्युटीपार्लरमधील काही कामगारांबरोबर बायबल अभ्यासाची योजना केली. परंतु एकच व्यक्ती अभ्यासाला आली. ती व्यक्ती तिला म्हणाली: “दुसऱ्यांना आवड नाही, मला आहे.” एका महिन्यात ही नवीन व्यक्ती दुसऱ्या दोघींचा बायबल अभ्यास घेऊ लागली. तिचा बाप्तिस्मा झाल्याबरोबर तिने पायनियरींग सुरू केली!
५ कार्य पूर्ण केले जात आहे: येशूने भाकीत केल्याप्रमाणे सुवार्तेचा प्रचार होत आहे. (मत्त. २४:१४) ज्या देशात लोक आपला संदेश ‘ऐकू इच्छित नाहीत’ तेथे देखील त्यांना सूचना दिली जात आहे. आपण ही अपेक्षा बाळगू शकतो, की काही लोक सत्याचा संदेश स्वीकारणार नाहीत, कदाचित आपला विरोधही करतील. तरीपण या लोकांना यहोवाकडून येणाऱ्या न्यायदंडाची ताकीद आपण दिलीच पाहिजे.—यहे. २:४, ५; ३:७, ८, १९.
६ आपले काम अद्याप समाप्त झालेले नाही: प्रचार कार्य केव्हा थांबवायचे हे आपण ठरवणार नाही. ते केव्हा थांबवायचे हे यहोवाला निश्चितपणे माहीत आहे. सुवार्तेला प्रतिसाद देऊ शकणारे लोक आपल्या क्षेत्रात आहेत की नाही, हे आपल्यापेक्षा त्याला जास्त माहीत आहे. आज, काही लोक म्हणतात, की त्यांना आवड नाही. पण त्यांच्या जीवनात जेव्हा मोठे बदल होतात, जसे की ते नोकरी गमावतात, त्यांना गंभीर आजार होतो किंवा त्यांच्या एखाद्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा कदाचित ते आपला संदेश ऐकतील. मनात पूर्वग्रह बाळगल्यामुळे किंवा नेहमीच कामात व्यस्त असल्यामुळे अनेक लोकांनी खरे तर आपण काय प्रचार करत आहोत हे चांगल्याप्रकारे ऐकलेले नसते. त्यामुळे अशा लोकांना मित्रत्वाच्या भावनेने वारंवार भेटी दिल्यास ते कदाचित आपली दखल घेतील, आपला संदेश ऐकतील.
७ शिवाय आपण अशाही मुलांना भेटू शकतो, जी आता मोठी झाली आहेत व ज्यांनी आपापले संसार थाटले आहेत. ही मुले कदाचित आता जीवनाकडे गांभिर्याने पाहतात व फक्त देवाच्या वचनातच ज्यांची उत्तरे आहेत असे प्रश्न विचारतात. एका तरुण स्त्रीने जी आता आई झाली आहे, दोन साक्षीदार बहिणींना आपल्या घरी बोलावून त्यांना म्हटले: “मी लहान असताना, माझी आई कधीच साक्षीदारांचे म्हणणे का ऐकून घेत नाही हे मला समजायचे नाही. हे साक्षीदार तिला बायबलमधल्या गोष्टी सांगायला यायचे पण ती नेहमी त्यांना सांगायची, की मला या गोष्टींत आवड नाही. म्हणून मी तेव्हाच विचार केला, की मी मोठी झाल्यावर, लग्न होऊन माझ्या घरी राहायला जाईन तेव्हा यहोवाच्या साक्षीदारांना माझ्या घरी बोलावून बायबलमधून ते जे काही सांगतात ते सविस्तर ऐकून घेईन.” आणि खरोखर असेच झाले. तिच्याकडे साक्षीदार आले तेव्हा तिने त्यांचे ऐकून घेतले. यामुळे साक्षीदारांना खूप आनंद झाला.
८ तुम्ही आणखी प्रभावी होऊ शकता का? नेहमीच, आपण ज्या लोकांना भेटतो केवळ त्यांच्यामुळेच क्षेत्र सेवेत आपल्याला अडथळा येत नाही. तर कधीकधी आपण स्वतःच स्वतःसाठी अडथळा निर्माण करत असतो. आपण नकारात्मक भावनेने आपली क्षेत्र सेवा सुरू करतो का? यामुळे आपली मनोवृत्ती, आपला आवाज, आपल्या चेहऱ्यावरील हावभाव बदलू शकतात. तेव्हा, सकारात्मक व आनंदी चेहऱ्याने क्षेत्र सेवेची सुरवात करा. नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न करा. सादरता देखील वेगवेगळ्या करा, वेळोवेळी त्यात सुधारणा करीत राहा. तुम्ही सुरवातीला जो प्रश्न विचारता त्यात कदाचित तुम्हाला काही फेरबदल करावा लागेल, संभाषणादरम्यान वेगळ्या वचनाचा उपयोग करावा लागेल. क्षेत्रात कार्य करताना कोणत्या गोष्टींमुळे त्यांना यश मिळाले हे इतर बंधूंना व भगिनींना विचारा. वेगवेगळ्या प्रचारकांबरोबर व पायनियरांबरोबर सेवा कार्य करा. त्यांची सेवा कोणत्या गोष्टीमुळे प्रभावी होते तेही पाहा.
९ राज्य प्रचार कार्याला यहोवाची संमती आहे, त्यावर त्याचा आशीर्वाद असतो. त्यात भाग घेऊन आपण यहोवाबद्दल आणि शेजाऱ्यांबद्दल आपल्याला असलेले प्रेम प्रदर्शित करतो. (मत्त. २२:३७-३९) तेव्हा, आपण हे कार्य आपल्या सर्व शक्तिनिशी पूर्ण करू या व नेहमी नेहमी एकाच क्षेत्रात जावे लागले तरी आपण कंटाळा करू नये.