प्रेम आपल्या प्रचार कार्यामागची प्रेरणा
१ यहोवाचे साक्षीदार राज्याच्या सुवार्तेचे आवेशी प्रचारक म्हणून जगभर प्रसिद्ध आहेत. (मत्त. २४:१४) जगभरात साठ लाखांहून अधिक यहोवाचे साक्षीदार प्रचाराचे हे कार्य करत आहेत. नवीन लोकही आपल्यासह या कार्यात सहभाग घेऊ लागतात तसतशी प्रचारकांची संख्या वाढत जाते. या कार्यात जितक्या लोकांनी सहभाग घेतला आहे त्या आधारे संख्या संकलित केली जाते.
२ या साहसी कार्यात स्वेच्छेने सहभाग घेण्यास कोणत्या गोष्टीमुळे आपल्याला प्रेरणा मिळते? हे कार्य करण्याचा आपल्यावर दबाव आणला जात नाही. किंवा मग धनसंपत्तीचे अथवा कोणत्या खास पुरस्कारांचे आमिषही आपल्याला दाखवले जात नाही. सुरवातीला आपल्यापैकी बरेचजण प्रचार कार्य करण्यास कचरत होते. कारण हे कार्य करण्यास आपण योग्य नाही असे आपल्याला वाटत होते. शिवाय, बहुतेक लोकांचा या कार्याप्रती नकारात्मक प्रतिसाद होता. (मत्त. २४:९) त्यामुळे लोक बुचकळ्यात पडतात, की आपल्याला हे कार्य करत राहण्यास काय प्रेरित करते. कोणत्याही परिस्थितीत या कार्यात टिकून राहण्यामागे निश्चितच काहीतरी सबळ कारण असले पाहिजे.
३ प्रेमाची शक्ती: सगळ्यात मोठी आज्ञा कोणती हे सांगताना येशूने म्हटले, की आपण ‘यहोवावर संपूर्ण मनाने, जिवाने, बुद्धीने आणि शक्तीने प्रेम केले पाहिजे.’ (मार्क १२:३०) यहोवा या विश्वाचा एकमेव राजा आणि सर्व गोष्टींचा निर्माणकर्ता आहे; आणि त्यामुळे ‘गौरव, सन्मान व सामर्थ्य यांचा स्वीकार करण्यास तोच योग्य’ आहे, या गोष्टीची आपल्याला मनापासून जाणीव असल्यामुळे आपण त्याच्यावर प्रेम करतो. (प्रकटी. ४:११) त्याचे अद्भुत गुण अतुलनीय आहेत.—निर्ग. ३४:६, ७.
४ यहोवाबद्दलचे ज्ञान आणि त्याच्यावर असलेले प्रेम आपल्याला आपला प्रकाश लोकांसमोर पडू देण्याची प्रेरणा देते. (मत्त. ५:१६) आपण जाहीरपणे त्याची स्तुती करतो, त्याच्या अद्भुत कृत्यांविषयी बोलतो आणि त्याच्या राज्याचा संदेश सर्वत्र गाजवतो तेव्हा आपण आपला प्रकाश पडू देत असतो. अंतराळाच्या मध्यभागी उडणाऱ्या देवदूताप्रमाणे आपल्याजवळ “प्रत्येक राष्ट्र, वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे आणि लोक ह्यांस सांगावयास सार्वकालिक सुवार्ता” आहे. (प्रकटी. १४:६) प्रेमच आपल्या जागतिक प्रचार कार्याची चेतना आहे.
५ जगातील लोकांच्या नजरेत आपले प्रचार कार्य निव्वळ ‘मूर्खपणा’ आहे. त्यामुळे ते त्याकडे लक्ष देत नाहीत. (१ करिंथ. १:१८) इतकेच नाही तर आपल्या कार्याला पायबंद घालण्यासाठी सर्वत्र प्रयत्न चालू होते आणि अद्यापही आहेत. परंतु, आपल्या एकनिष्ठ प्रेमाने आपल्याला मोठ्या धैर्याने ही घोषणा करण्यास प्रबळ केले आहे: “जे आम्ही पाहिले व ऐकले ते न बोलणे हे आम्हाला शक्य नाही. . . . आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे.” (प्रे. कृत्ये ४:२०; ५:२९) त्यामुळे कडा विरोध होत असताना देखील जगातील निरनिराळ्या भागांत राज्य प्रचाराच्या कार्याची अखंड वृद्धी होत आहे.
६ यहोवावरील आपले प्रेम धगधगत्या अग्नीप्रमाणे आहे व ते आपल्याला यहोवाचे अद्भुत गुण सर्वत्र प्रकट केल्याशिवाय स्वस्थ बसू देत नाही. (यिर्म. २०:९; १ पेत्र २:९) तेव्हा, ‘राष्ट्रांमध्ये त्याची कृत्ये आपण विदित करत राहू कारण त्याची करणी प्रतापमय आहे’!—यश. १२:४, ५.