आपली सेवा —खऱ्या प्रीतीची अभिव्यक्ती
१ आपण आपल्या सेवेमार्फत, सर्वश्रेष्ठ अशा दोन आज्ञांप्रती आपली आज्ञाधारकता प्रदर्शित करतो. (मत्त. २२:३७-३९) यहोवावरील आपली प्रीती, त्याच्याविषयी सकारात्मकपणे बोलण्यास आपल्याला उत्तेजित करते. शेजाऱ्यावरील आपली प्रीती त्यांना देवाच्या इच्छेचे आणि उद्देशांचे ज्ञान प्राप्त करण्याचे उत्तेजन देण्यास आपल्याला प्रवृत्त करते, जेणेकरून आपल्याप्रमाणेच ते देखील यहोवावर प्रीती करतील व सार्वकालिक जीवनाचे बक्षीस मिळविण्याच्या मार्गावर येतील. अशाप्रकारे, आपल्या सेवेमार्फत आपण यहोवाच्या नावाचा सन्मान करत असतो आणि आपल्या शेजाऱ्यांना राज्याची अमूल्य आशा देत असतो. होय, आपली सेवा ही देव आणि मानव यांच्या प्रती असलेल्या आपल्या खऱ्या प्रीतीची अभिव्यक्ती आहे.
२ आपली प्रीती, सर्व परिस्थितींत सर्व लोकांशी बोलण्यास आपल्याला उद्दीपित करते. (१ करिंथ. ९:२१-२३) उदाहरणार्थ, विमानातून प्रवास करताना एक ख्रिस्ती वडील एका रोमन कॅथलिक पाळकाच्या शेजारी बसले होते. वडिलांनी काही व्यवहारकुशल प्रश्न विचारून पाळकाला बोलते केले आणि मग राज्याच्या विषयावर चर्चा सुरू केली. विमानातून उतरेपर्यंत पाळकाने आपली दोन पुस्तके स्वीकारली होती. वडिलांच्या, आपल्या शेजाऱ्यावरील खऱ्या प्रीतीच्या अभिव्यक्तीचा किती हा उत्तम परिणाम!
३ खरी प्रीती आपल्याला प्रचार करण्यास उत्तेजित करते: सहायक आणि पूर्ण-वेळेच्या पायनियर कार्यात सहभाग घेणारे लोक निश्चितच देवावरील आणि शेजाऱ्यावरील आपली खरी प्रीती व्यक्त करतात. इतरांना आध्यात्मिकरित्या मदत करण्यासाठी पायनियर, आपला वेळ आणि शक्ती देत असतात. कोणती गोष्ट त्यांना असे करण्यास उत्तेजित करते? एका पायनियर बहिणीने म्हटले: “मला माहीत आहे, की प्रीती, देवाच्या आत्म्याचे फळ आहे. शिवाय, प्रीती नसती तर मी कधीच सत्यात आले नसते आणि पायनियर बनण्याची गोष्ट तर दूरच राहिली. प्रीती मला लोकांसंबंधी, त्यांच्या गरजांसंबंधी जागरूक राखण्यास मदत करते आणि प्रीती दाखविल्यास लोक प्रतिसाद देतात याचा प्रत्यय मला आला आहे.” येशूने लोकांसाठी अशाच प्रकारची प्रीती प्रदर्शित केली. एकदा तो आणि त्याचे थकलेले शिष्य “थोडा विसावा” घेण्यासाठी जात असताना लोकांचा समूह त्यांच्या अगोदर तिकडे पोहंचला. येशूने काय केले? “त्याला त्यांचा कळवळा आला” आणि “त्यांस बऱ्याच गोष्टींविषयी शिक्षण” देण्यासाठी त्याने आपल्या वैयक्तिक गरजा बाजूला सारल्या.—मार्क ६:३०-३४.
४ आपण सांगत असलेली सुवार्ता लोक नाकारत असले तरीही आपल्याला एक प्रकारचा आंतरिक आनंद मिळतो, कारण लोकांचे तारण व्हावे म्हणून प्रीतीने प्रवृत्त होऊन आपण सर्वंकष प्रयत्न केले आहेत हे आपल्याला ठाऊक असते. सरतेशेवटी, ख्रिस्त आपल्या सर्वांचा न्याय करील तेव्हा, ‘आपल्याला सोपविलेली सेवा पूर्ण करून’ खरी प्रीती प्रदर्शित केल्याबद्दल आपण अत्यानंदित होऊ.—२ तीम. ४:५.