आपण सर्वजण यहोवाचा आणि त्याच्या पुत्राचा सन्मान करू या
एप्रिल ८ तारखेला स्मारक विधीसाठी उपस्थित राहणाऱ्या सर्वांना या कार्यक्रमाचा पुरेपूर लाभ कसा मिळवता येईल?
१ जगात सहसा कोणाला खास मान-सन्मान दिला जातो? ज्यांनी एखादे महान कार्य किंवा मोठा पराक्रम केला आहे त्यांना. पण, सहसा काही काळानंतर जगाला त्यांच्या कार्यांचा विसर पडतो. परंतु, मानवजातीला खऱ्या अर्थाने लाभ मिळवून देणाऱ्या कार्यांविषयी काय म्हणता येईल? एप्रिल ८, २००१ रोजी सूर्यास्तानंतर प्रभूच्या सांज भोजनाचा विधी पार पाडताना आपण मानवजातीच्या सर्वाधिक लाभाच्या कार्यांवर आपले लक्ष केंद्रित करू.
२ सर्वाधिक मान-सन्मान मिळण्यास कोण योग्य आहे? याचे उत्तर बायबल आपल्याला देते: “हे प्रभो, . . . गौरव, सन्मान व सामर्थ्य ह्यांचा स्वीकार करावयास तू योग्य आहेस; कारण तू सर्व काही निर्माण केले.” (प्रकटी. ४:११) सृष्टीकर्ता असल्यामुळे यहोवा या विश्वाचा सार्वभौम सम्राट आहे. तेव्हा, खऱ्या अर्थाने मान-सन्मान मिळण्यास केवळ तोच युगानुयुग योग्य राहील.—१ तीम. १:१७.
३ देवाचा पुत्र, येशू ख्रिस्त याने अशी कार्ये केली ज्यांमुळे मानवजातीला अनंत आशीर्वाद मिळतील. त्याने आपल्या पित्याचे हुबेहूब अनुकरण केले. (योहा. ५:१९) त्याची पूर्ण अधीनता आणि विश्वासू सेवा यांमुळे तो “सामर्थ्य, धन, ज्ञान, बल, सन्मान, गौरव व धन्यवाद ही घेण्यास योग्य” ठरला. (प्रकटी. ५:१२) त्याच्या पित्याने त्याला राज्यपद बहाल करून त्याला सन्मानित केले. (स्तोत्र २:६-८) आणि एप्रिल ८, २००१ रोजी होणाऱ्या प्रभूच्या सांज भोजनाच्या समारोह प्रसंगी आपल्या सर्वांनाच पिता आणि त्याचा पुत्र या दोघांचा सन्मान करण्याची सुसंधी मिळेल.
४ परंतु, मानवी इतिहासात फार कमी जणांनी यहोवाचा आणि त्याच्या पुत्राचा योग्य सन्मान केला. ही खरोखरच दुःखाची गोष्ट आहे. प्राचीन काळातही काही वेळा देवाच्या स्वतःच्या लोकांनी म्हणजे इस्राएल लोकांनीसुद्धा फक्त नावासाठी यहोवाची सेवा केली. असे करून त्यांनी यहोवाचा धडधडीत अपमान केला. (मला. १:६) योग्य सन्मान दाखवणे म्हणजे यहोवाने व त्याच्या पुत्राने आपल्याकरता जे काही केले आहे त्याबद्दल कदर व प्रेम बाळगून विश्वासूपणे त्यांना आज्ञाधारक राहणे. अशा प्रकारचा सन्मान आणि आदर दाखवण्याकरता आपण यहोवाचे श्रद्धापूर्ण भय बाळगले पाहिजे आणि जीवनाच्या प्रत्येक पैलूत यहोवा आणि येशू यांना मान दिला पाहिजे. हीच गोष्ट शिकवण्याचा ख्रिस्ती मंडळी प्रयत्न करते आणि असे करण्यास मदतही करते.
५ सन्मान दाखवण्यासाठी खास प्रसंग: स्मारक विधी यहोवाच्या लोकांची सगळ्यात खास सभा असून दर वर्षी हा विधी साजरा केला जातो. यहोवाची सेवा आणि त्याचा सन्मान करू इच्छिणाऱ्या सर्वांनी या सोहळ्यास उपस्थित असले पाहिजे. (लूक २२:१९) यहोवाच्या साठ लाख क्रियाशील साक्षीदारांसोबत आस्थेवाईक लोकांच्या उपस्थितीमुळे स्मारक विधीची उपस्थिती १ कोटी ४० लाखांची संख्या ओलांडेल अशी आशा आम्ही करतो. आपल्या स्वर्गीय पित्याचा सन्मान करण्याची खरोखरच ही एक उत्तम संधी असेल! समारोहाचा खास रोख येशूवर असला तरी त्याने साध्य केलेल्या गोष्टींबद्दल दाखवण्यात आलेला आदर व सन्मान त्याला पाठवलेल्या पित्याचे गौरव करतो.—योहा. ५:२३.
६ हा खास प्रसंग यशस्वीपणे पार पडावा म्हणून आपण काय करू शकतो? आपण आस्था दाखवणाऱ्यांना या कार्यक्रमाचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी मदत करू शकतो. या खास सभेला त्यांनी यावे असे त्यांना आवर्जून सांगा. आवश्यक असल्यास तिथे उपस्थित राहण्यासाठी त्यांना प्रेमळपणे मदत करा. तिथे दिल्या जाणाऱ्या भाषणाचा उद्देश काय तो सांगा. इतरांसोबत त्यांची ओळख करून द्या. त्या ठिकाणी ते जे काही पाहतील आणि ऐकतील त्यामुळे त्यांनाही आपल्यासोबत यहोवाचा सन्मान करण्याची प्रेरणा मिळू शकते.
७ कार्यक्रमाचा फारसा काही प्रभाव पडणार नाही असा विचार करू नका. या कार्यक्रमाविषयी विद्यापीठात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचे मनोगत काय ते पाहा: “मी किती तरी वेळा चर्चमध्ये कम्युनियनला गेलो. पण, कम्युनियनपेक्षा हा कार्यक्रम किती वेगळा आहे. तो अगदी बायबलमध्ये सांगितल्यानुसार केला जातो आणि मला वाटतं की तुमच्याकडेच सत्य आहे.” तो सभांना नियमितरीत्या उपस्थित राहू लागला आणि काही काळात त्याचा बाप्तिस्माही झाला.
८ नवोदितांना उन्नती करण्यास मदत करा: स्मारक विधीला उपस्थित राहणाऱ्या नवोदितांची नोंद घ्या. आणि त्यानंतर लवकरात लवकर त्यांची भेट घेऊन या सभेत त्यांनी ऐकलेल्या व शिकलेल्या उत्तम गोष्टींची उजळणी करा. त्यांच्या बायबल-ज्ञानात अधिक भर पडावी म्हणून इतर सभांची देखील त्यांना माहिती द्या. ज्ञान पुस्तकातील “देवाच्या लोकांमध्ये सुरक्षितता मिळवा,” या १७ व्या अध्यायाची उजळणी केल्यामुळे मंडळीमार्फत मुबलकपणे पुरवल्या जाणाऱ्या असंख्य आध्यात्मिक तरतुदींची त्यांना कल्पना येईल. शिवाय या सर्व तरतुदींचा तेही फायदा करून घेऊ शकतात हेही त्यांना समजून येईल. तसेच, यहोवाच्या लोकांमधील एकता, आनंद आणि आवेश त्यांना प्रत्यक्ष पाहता यावा म्हणून आवर होल असोसिएशन ऑफ ब्रदर्स हा व्हिडिओ तुम्ही त्यांना दाखवू शकता.
९ आपण वैयक्तिकपणे यहोवाचा सन्मान आणि आदर कसा करू शकतो हे या नवोदितांनी जाणून घेणे फार महत्त्वाचे आहे. मनापासून केलेल्या प्रार्थना ऐकून यहोवा आनंदित होतो आणि अशा प्रार्थना आध्यात्मिक विसावा देतात हे त्यांना समजावून सांगा. (१ योहा. ५:१४) अपेक्षा माहितीपत्रकातील ८ ते १२ धड्यांतून हे दाखवा की कशा प्रकारच्या आचरणामुळे यहोवाचा सन्मान होतो. यहोवाचे साक्षीदार या माहितीपत्रकातील पृष्ठे ३०-१ वर सांगितलेल्या गोष्टींची चर्चा करा आणि वैयक्तिकपणे प्रचार कार्यात सहभाग घेऊन यहोवाचा सन्मान कसा करता येईल यावर विचार करण्यास नवोदितांना उत्तेजन द्या.
१० येशूच्या बलिदानाबद्दल आणि त्याचे शिष्य या नात्याने आपल्याला मिळालेल्या विशेषाधिकाराबद्दल कदर दाखवल्यामुळे पित्याचा सन्मान होतो आणि इतरांनाही आशीर्वाद मिळतात. येशूने अभिवचन दिले: “जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्याचा मान करील.”—योहा. १२:२६.