यहोवा सामर्थ्य देतो
१ प्रेषित पौलाविषयी तुमचे काय मत आहे? प्रेषितांची कृत्ये पुस्तक वाचताना तो यहोवाच्या सेवेत किती कष्टाळू होता हे आपल्याला समजते. पण पौल इतके कष्ट कसे करू शकला? तो म्हणाला: “मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे.” (फिलिप्पै. ४:१३) आपल्यालाही यहोवाच्या सामर्थ्याचा फायदा होऊ शकतो. तो कसा? आध्यात्मिकरीत्या नव्याने जोम मिळवून मजबूत होण्याकरता यहोवाने केलेल्या सहा तरतुदींचा फायदा घेण्याद्वारे.
२ देवाचे वचन: आपल्याला शक्ती मिळण्याकरता आपल्याला अन्नाची आवश्यकता आहे तसेच आध्यात्मिकरीत्या जिवंत राहण्याकरता देखील आपण देवाच्या वचनातील आध्यात्मिक अन्न घेत राहिले पाहिजे. (मत्त ४:४) बायबल आपल्याला टिकून राहण्याकरता शक्ती देते. सत्याबद्दलचा आवेश आणि जोम टिकवून ठेवण्याकरता आपण शक्य असल्यास दररोज अर्थपूर्ण व्यक्तिगत अभ्यास आणि मनन केले पाहिजे.—स्तोत्र १:२, ३.
३ प्रार्थना: आपण यहोवाच्या जवळ येणे महत्त्वाचे आहे; विशेषकरून संकटसमयी आपण त्याच्या अधिक जवळ येणे महत्त्वाचे आहे. प्रार्थनेद्वारे बलवंत करणारी शक्ती मागणाऱ्यांना तो त्याच्या आत्म्याकरवी ती देतो. (लूक ११:१३; इफिस. ३:१६) “प्रार्थनेत तत्पर राहा” असे शास्त्रवचनांत आपल्याला उत्तेजन दिले आहे. (रोम. १२:१२) तुम्ही या सल्ल्याचे पालन करत आहात का?
४ मंडळी: मंडळीतील सभांतून व आपल्या प्रेमळ बंधूभगिनींच्या सहवासातून आपल्याला शक्ती व उत्तेजन मिळते. (इब्री. १०:२४, २५) आपण संकटात असतो तेव्हा ते आपल्याला खचून न जाण्यास मदत करतात, प्रेमळपणे आपल्याला हवी ती मदत करतात.—नीति. १७:१७; उप. ४:१०.
५ क्षेत्र सेवा: सेवेमध्ये नियमितरीत्या भाग घेतल्याने आपण राज्य आणि त्याद्वारे मिळणाऱ्या आशीर्वादांवर आपले लक्ष केंद्रित ठेवू शकतो. इतरांना यहोवाविषयी शिकण्यास आपण मदत करतो तेव्हा आपल्याला स्वतःलाच उत्तेजन मिळते. (प्रे. कृत्ये २०:३५) जेथे जास्त गरज आहे तेथे सेवा करण्याकरता आपण सर्वच जाऊ शकत नाहीत किंवा पूर्ण वेळेच्या सेवेत भाग घेऊ शकत नाहीत; पण, इतर मार्गांनी आपण सेवेमध्ये अर्थपूर्ण भाग घेऊ शकतो.—इब्री. ६:१०-१२.
६ ख्रिस्ती पर्यवेक्षक: वडिलांकडून मिळणाऱ्या उभारणीकारक उत्तेजनाचा व साहाय्याचाही आपल्याला लाभ होतो. आपल्या कळपाची काळजी घेण्यासाठी यहोवाने या वडिलांना नियुक्त केले आहे. (१ पेत्र ५:२) पौलाने त्याच्या दिवसात केले त्याप्रमाणे आज प्रवासी पर्यवेक्षक ज्या ज्या मंडळ्यांत जातात त्यांची उभारणी करतात.—रोम. १:११, १२.
७ विश्वासू बंधूभगिनींची उदाहरणे: प्राचीन आणि आधुनिक काळच्या सर्व विश्वासू बंधूभगिनींच्या प्रोत्साहनकारक उदाहरणांवर विचार करणे खरोखरच आपल्यात जोम उत्पन्न करणारे आहे. (इब्री. १२:१) आपल्याला उत्तेजन हवे असते तेव्हा आपण आपल्या मासिकात आलेल्या बंधूभगिनींची एखादी जीवनकथा वाचू शकतो, वार्षिक पुस्तकातील एखादा अहवाल वाचू शकतो किंवा उद्घोषक (इंग्रजी) पुस्तकातील यहोवाच्या साक्षीदारांच्या आधुनिक इतिहासाचा एखादा मनोरंजक वृत्तान्त वाचू शकतो.
८ आता नव्वदीत असलेल्या एका बांधवाने, लहानपणीच सत्य स्वीकारले होते. तरुणपणी अनेक प्रकारे त्यांच्या विश्वासाची परीक्षा झाली. जसे की, मंडळीत सक्रिय असलेल्या काहींनी यहोवाची संघटना सोडून दिली. घरोघरचे कार्य करायला त्यांना भीती वाटायची. तरीसुद्धा ते यहोवावर विसंबून राहिले. हळूहळू त्यांना सेवेत जायला आवडू लागले. आणि आज? त्यांची तब्येत साथ देत नसली तरी ते ब्रुकलिन बेथेल परिवाराचे आणि नियमन मंडळाचे सदस्य म्हणून सेवा करत आहेत. यहोवाच्या संस्थेशी जडून राहिल्याचा त्यांना अजिबात पस्तावा होत नाही.
९ ब्रिटन बेथेल परिवाराची सदस्या असलेली एक बहीण १३ वर्षांची होती तेव्हा तिचा बाप्तिस्मा झाला होता. त्याच्यानंतरच्या वर्षी तिने आपल्या भावाबरोबर पायनियरींग सुरू केली. त्याच्या पुढील वर्षी, दुसऱ्या महायुद्धात तटस्थ राहिल्यामुळे तिच्या वडिलांना तुरूंगात टाकण्यात आले. आपल्याला शक्ती मिळावी म्हणून ती यहोवावर विसंबून राहिली व खऱ्या देवाची सेवा चालूच ठेवली. कालांतराने, तिचा विवाह एका विश्वासू बांधवाबरोबर झाला. हे दोघेही मिळून यहोवाची इच्छा पूर्ण करू लागले. त्यांच्या वैवाहिक जीवनाच्या ३५ वर्षांनंतर तिच्या पतीचा अचानक मृत्यू झाला. पुन्हा एकदा तिला यहोवाकडून शक्ती मिळाली. आणि आजपर्यंत ती यहोवाची सेवा करत आहे. व यहोवाच्या पृथ्वीवरील कुटुंबाची अनंतकाळसाठी सदस्य होण्याची ती वाट पाहत आहे.
१० यहोवा त्याच्या विश्वासू सेवकांना साहाय्य आणि शक्ती देतो. “तो भागलेल्यास जोर देतो, निर्बलास विपुल बल देतो.” वर सांगितलेल्या सहा तरतुदींद्वारे आपण यहोवाकडून येणाऱ्या अमर्याद शक्तीचा पुरेपूर फायदा घेऊ शकतो. लक्षात असू द्या: “परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ति संपादन करितील. . . . ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत.” (यश. ४०:२९-३१) शक्ती मिळण्यासाठी पौल पूर्णपणे यहोवावर विसंबून राहिला; आपणही राहिले पाहिजे.