“प्रभूमध्ये तुमचे श्रम व्यर्थ नाहीत”
१ यहोवाच्या सेवेत आपले श्रम व्यर्थ ठरणार नाहीत, हा विचार किती दिलासा देणारा आहे, नाही का? (१ करिंथ. १५:५८) जगातले लोकही रात्रंदिवस कठोर परिश्रम करतात. समाजात प्रतिष्ठा मिळावी व अमाप संपत्ती मिळवावी म्हणून बरेचजण वर्षानुवर्षे शिक्षण घेतात, रक्ताचे पाणी करतात. पण ‘काळ आणि संयोगामुळे’ यांपैकी बऱ्याच जणांच्या स्वप्नांवरच पाणी पडते. इतकी मेहनत करूनही समाजात हवी असलेली प्रतिष्ठा कित्येकांना कधीच मिळत नाही. आहे त्या परिस्थितीतच त्यांना समाधान मानावे लागते. त्यांचे सर्व परिश्रम व्यर्थ, वायफळ ठरतात. (उप. १:१४, पं.र.भा.; ९:११) या सर्व गोष्टींचा विचार केल्यावर, प्रभूच्या कामात सर्वदा व्यस्त राहणेच सगळ्यात चांगले असे तुम्हालाही वाटत नाही का? कारण हे एकच असे काम आहे ज्यात आपले श्रम कधीही व्यर्थ ठरणार नाहीत. आणि आपल्या श्रमांचे कायमस्वरूपी प्रतिफळ नक्कीच आपल्या पदरी पडेल!
२ सर्वात महत्त्वाचे कार्य: देवाच्या राज्याच्या सुवार्तेची घोषणा करणे हे आजच्या काळातील सर्वात महत्त्वाचे कार्य आहे. लोक आपला संदेश ऐकोत वा न ऐकोत, पण तो घोषित केलाच पाहिजे. तरच आपल्याला पौलाप्रमाणे असे म्हणता येईल, की “मी सर्वांच्या रक्ताविषयी निर्दोषी आहे. कारण देवाचा संपूर्ण मनोदय तुम्हास सांगण्यास मी कसूर केली नाही.”—प्रे. कृत्ये २०:२६, २७.
३ लोक आपला संदेश ऐकून बायबल अभ्यास स्वीकारतात तेव्हा नक्कीच आपल्याला आनंद होतो! एका तरुणीचा अनुभव पाहा. तिची मावशी वारली तेव्हा तिच्या मनात विचार आला की, मृत्यूनंतर मावशीचे काय झाले असेल, ती स्वर्गात गेली असेल की नरकात? या प्रश्नांची उत्तरे तिला हवी होती. तिच्या बहिणीने तिला यहोवा देवाला प्रार्थना करण्यास शिकवले होते; म्हणून तिने मदतीकरता यहोवाला प्रार्थना केली. लवकरच तिने बायबलचा अभ्यास सुरू केला आणि ती ख्रिस्ती सभांना येऊ लागली. त्यानंतर जीवनाबद्दल तिचा दृष्टिकोनच बदलला. तिने आपल्या वाईट मित्रमंडळींची संगत सोडली, सिगारेट, ड्रग्स व चोरी यांसारख्या वाईट सवयी देखील सोडून दिल्या. ती म्हणते: “माझे यहोवावर प्रेम असल्यामुळेच मी असं करू शकले. यहोवा देव अत्यंत दयाळू आणि क्षमाशील आहे. त्याने मला सार्वकालिक जीवनाची आशा दिली.” व्यर्थ गोष्टींमध्ये वेळ घालवण्याचे तिने सोडून दिले आहे.
४ लोकांनी तुमचे ऐकले नाही तरीसुद्धा तुम्ही केलेले कार्य व्यर्थ ठरत नाही. निदान, यहोवाचे साक्षीदार आपल्याकडे आले होते हे तर त्या लोकांच्या आठवणीत राहील. शिवाय, हे कार्य करत राहिल्यामुळे तुम्ही यहोवाला विश्वासू आहात, त्याच्यावर तुमचे प्रेम आहे हे तुम्ही दाखवून देता. तेव्हा प्रभूच्या कार्यात तुमचे श्रम व्यर्थ गेले असे कधीही समजू नका!