“अगोदर पारख व्हावी”—कशाप्रकारे?
१ यहोवाच्या संस्थेत वाढ होत चालली आहे. या वाढीमुळे, सेवा सेवक म्हणून कार्य करण्यास पात्र असलेल्या बांधवांची गरजही वाढत आहे. अद्याप सेवा सेवक म्हणून नेमण्यात न आलेल्या बांधवांची संख्या मोठी आहे; यात काही किशोरवयीन मुले देखील आहेत. या सर्वांना मंडळीत सेवा करण्याची खूप इच्छा आहे. या बांधवांवर काही जादा काम सोपवले जाते, तेव्हा मंडळीत आपलीही काही मदत झाली याचा त्यांना आनंद वाटतो, समाधान वाटते. आणि त्यांची “पारख” केल्यास ते पुढेही बरीच प्रगती करू शकतील. (१ तीम. ३:१०) ही पारख कशी करण्यात यावी?
२ वडिलांची भूमिका: १ तीमथ्य ३:८-१३ या वचनांत सेवा सेवक म्हणून कार्य करण्यास इच्छुक असणाऱ्यांची पात्रता तपासून पाहण्याकरता काही अटी दिल्या आहेत. यांच्या आधारावर एखाद्या बांधवाची पारख करताना एका गोष्टीकडे वडिलांनी लक्ष द्यावे व ती म्हणजे, या बांधवाला जबाबदारीची कितपत जाणीव आहे. हे पाहण्यासाठी त्याला मंडळीतली लहानमोठी कामे देता येतील, उदाहरणार्थ, मासिक व लिटरेचर वाटून देण्याचे काम, मायक्रोफोन्सची व्यवस्था बघण्याचे काम, किंग्डम हॉलची स्वच्छता इत्यादी. ही कामे दिल्यावर त्याची प्रतिक्रिया काय आहे आणि तो ती कशाप्रकारे पार पाडतो याचे वडिलांनी निरीक्षण करावे. तो विश्वासार्ह आहे का, वक्तशीर आहे का, मेहनत करतो का, नम्र आहे का, आणि काम करायला उत्सुक आहे का, तसेच, तो सर्वांसोबत मिळूनमिसळून राहतो का हे वडिलांनी पारखून पाहावे. (फिलिप्पै. २:२०) त्याचे कपडे व त्याची राहणी सभ्य आहे का, व याबाबतीत इतरांसमोर तो चांगले उदाहरण ठेवतो का? सोपवलेली जबाबदारी तो गांभीर्याने घेतो का? “त्याने ज्ञानजन्य लीनतेने सदाचरणाच्या योगे आपली कृत्ये दाखवावी;” ही कृत्ये पाहूनच वडील त्याची पारख करतील. (याकोब ३:१३) तो सेवा सेवक का होऊ इच्छितो, मंडळीत आपली मदत व्हावी ही मुळात त्याची इच्छा आहे का? येशूने “लोकांस शिष्य करा” अशी जी आज्ञा दिली तिचे तो पालन करत आहे का, म्हणजेच, तो क्षेत्र सेवेत उत्साहाने सहभाग घेतो का?—मत्तय २८:१९; टेहळणी बुरूज, मे १, १९९१ अंकातील पृष्ठ १०-१५ पाहा.
३ सेवा सेवक म्हणून नेमले जाण्याकरता ठराविक वय बायबलमध्ये सांगितलेले नाही. पण बायबल सेवा सेवकांविषयी बोलताना ‘सेवकपण चालवणारे पुरुष’ असे म्हणते. शिवाय, त्यांच्या बायकामुलांचाही उल्लेख आहे. त्याअर्थी, पंधरा सोळा वर्षांच्या मुलांना साहजिकच सेवा सेवक बनवण्याची आपण अपेक्षा करू शकत नाही. (१ तीम. ३:१२, १३, NW) हे पुरुष ‘तरुणपणाच्या वासनांच्या’ आहारी गेलेले नव्हे तर विचारशील प्रवृत्तीचे असावेत; देवाच्या आणि लोकांच्याही नजरेत चांगले नाव कमवलेले आणि निर्दोष असावेत.—२ तीम. २:२२.
४ काही बांधव स्वभावतःच हुशार असतात व त्यांच्या चांगल्या गुणांचा निश्चितच फायदा होऊ शकतो. पण हुशार असणे महत्त्वाचे नाही. सर्वात महत्त्वाची आहे त्या व्यक्तीची वृत्ती आणि तिचा हेतू. आपल्या सेवेमुळे देवाला गौरव मिळावे आणि आपल्या बांधवांची सेवा करण्याची आपल्याला संधी मिळावी, ही त्या सेवक होऊ इच्छिणाऱ्या बांधवाची विनम्र इच्छा आहे का? जर असेल, तर मंडळीत प्रगती करण्याच्या त्याच्या प्रयत्नांना यहोवा जरूर यश देईल.