वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w97 १/१ पृ. ३-५
  • आपण सर्वांनी देवाची स्तुती का करावी?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपण सर्वांनी देवाची स्तुती का करावी?
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • ‘फक्‍त यहोवाच मला आशा देऊ शकला’
  • ‘मी अंध असले तरी पाहू शकते’
  • सर्व जण “याहची स्तुती” करोत
  • जीवन नकोसं वाटतं तेव्हा . . .
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (सार्वजनिक आवृत्ती)—२०१९
  • गाऊ चला, याहची स्तुती!
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
w97 १/१ पृ. ३-५

आपण सर्वांनी देवाची स्तुती का करावी?

हालेलूया! हा शब्द ख्रिस्ती धर्मातील चर्चला जाणाऱ्‍या बहुतेकांच्या चांगल्या परिचयाचा आहे. काही जण रविवारच्या सभेत तो मोठमोठ्याने म्हणतात. परंतु त्यातील कित्येकांना त्या शब्दाचा खरा अर्थ काय होतो हे माहीत आहे? खरे पाहता, तो “याहची स्तुती करा!” याकरता असणारा इब्री शब्द आहे. यहोवा हे नाव असलेल्या सृष्टीकर्त्याबद्दलचा तो आनंदी, निर्णायक प्रशंसोद्‌गार आहे.a

“हालेलूया” हा शब्द बायबलमध्ये अनेकवेळा आला आहे. का बरे? कारण देवाची स्तुती करण्याची किती तरी कारणे आहेत. याह (यहोवा) या प्रचंड विश्‍वाचा सृष्टीकर्ता आणि पोषक आहे. (स्तोत्र १४७:४, ५; १४८:३-६) पृथ्वीवर जीवन शक्य करणाऱ्‍या परिस्थितीकीचा तो उगम आहे. (स्तोत्र १४७:८, ९; १४८:७-१०) शिवाय तो मानवजातीमध्ये खास स्वारस्य बाळगून आहे. आपण त्याच्या इच्छेची पूर्ती केल्यास तो आपल्याला या सध्य जीवनात आशीर्वाद व पाठबळ देतो तसेच येणाऱ्‍या उत्तम जीवनाची निश्‍चित आशाही देतो. (स्तोत्र १४८:११-१४) याह (यहोवा)नेच या शब्दांना प्रेरणा दिली: “नीतिमान्‌ पृथ्वीचे वतन पावतील, तिच्यात ते सर्वदा वास करितील.”—स्तोत्र ३७:२९.

यास्तव, “हालेलूया!” “याहचे स्तवन करा,” असा आर्जव सर्वांना करण्यात आला आहे. (स्तोत्र १०४:३५; NW, तळटीप) परंतु दुःखाची गोष्ट म्हणजे, सर्वांनाच अशाप्रकारे प्रतिसाद देण्याची इच्छा होत नाही. आज, लोक दुःखित आहेत. अनेक जण उपाशी, आजारी किंवा अत्याचाराला बळी पडले आहेत. पुष्कळ जणांना, मादक औषधांचा अथवा मद्यार्काचा दुरुपयोग किंवा स्वतःच्या अनैतिकतेच्या वा बंडाळीच्या परिणामांमुळे दुःख सहन करावे लागते. अशा लोकांना देवाची स्तुती करण्यासाठी काही कारण आहे का?

‘फक्‍त यहोवाच मला आशा देऊ शकला’

होय आहे. यहोवा कोणत्याही अपेक्षेविना त्याची ओळख करून घेण्यासाठी, त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी व लोकांना, त्याची स्तुती करावयाची इच्छा निर्माण करणाऱ्‍या आशीर्वादांचा आनंद लुटण्यासाठी सर्वांना आमंत्रण देतो. आणि पुष्कळ जण याला प्रतिसाद देतात. ग्वाटेमालाच्या ॲड्रिअनाचे उदाहरण घ्या. ॲड्रिअना सात वर्षांची होती तेव्हा तिची आई वारली. त्यानंतर काही काळातच तिचे वडील घर सोडून गेले. ती दहा वर्षांची होती तेव्हा उदरनिर्वाहासाठी ती काम करू लागली. ॲड्रिअनाच्या आईने तिला देवाची आणि चर्चची सेवा करण्यास सांगितले होते त्यामुळे ती वेगवेगळ्या कॅथलिक गटांशी संगती करू लागली, पण १२ वर्षांची झाल्यावर ती या गटांमुळे निराश झाली आणि रस्त्यावरील एका टोळीत सामील झाली. ती धूम्रपान करू लागली, मादक औषधे सेवन करू लागली व चोरी करू लागली. अशा प्रकारच्या एका तरुण मुलीला देवाची स्तुती करण्याची इच्छा का वाटावी बरे?

ॲड्रिअनाची बहीण यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करू लागली, पण ॲड्रिअनाला तिच्याकडे पाहून हसू येई. मग त्यांची मावशी वारली. तिच्या मावशीच्या प्रेतसंस्कारच्या वेळी, ॲड्रिअनाला पुष्कळ प्रश्‍ने भेडसावू लागले. मावशी कोठे गेली असावी? ती स्वर्गात गेली असावी की जळत्या नरकात? हे इतके गोंधळून टाकणारे होते, ॲड्रिअना दफनभूमीच्या देवळात मदतीकरता प्रार्थना करावयास गेली आणि तिच्या बहिणीने तिला शिकवल्याप्रमाणे यहोवा या देवाच्या नावाचा प्रार्थनेत तिने उपयोग केला.

अल्पावधीतच, ती यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास करू लागली व त्यांच्या ख्रिस्ती सभांना उपस्थित राहू लागली. यामुळे तिला जीवनाकडे पाहण्याचा संपूर्ण नवा दृष्टिकोन प्राप्त झाला व तिने अगदी धैर्याने त्या टोळीशी संगत सोडून दिली. आता ऐन विशीत असलेली ॲड्रिअना म्हणते: “फक्‍त यहोवाच्या प्रीतीनेच मला इतकी वाईट जीवनशैली सोडण्यास भाग पाडले. फक्‍त यहोवाच मला मोठ्या दयाळूपणे सार्वकालिक जीवनाची आशा देऊ शकला.” ॲड्रिअनाच्या जीवनाची सुरवात अतिशय कठीण असली तरी, देवाची स्तुती करण्यासाठी तिच्याकडे उत्तम कारणे आहेत.

युक्रेनमधील अगदीच असंभवनीय प्रसंगाचा अहवाल देण्यात आला आहे. एक मनुष्य तुरुंगात आपल्या फाशीच्या शिक्षेची वाट पाहत बसला आहे. त्याला स्वतःची कीव वाटत आहे का? की तो खिन्‍न झाला आहे? नाही, त्याला याच्या अगदी उलट वाटत आहे. यहोवाच्या साक्षीदारांच्या अलीकडेच संपर्कात आल्यानंतर व यहोवाविषयीचे काही ज्ञान प्राप्त केल्यानंतर त्याने त्यांना आपल्या आईशी संपर्क साधण्यास सांगितले. आता तो त्यांना लिहित आहे कारण त्यांनी त्याची ही विनंती पूर्ण केल्याचे त्याला ऐकावयास मिळाले. तो म्हणतो: “माझ्या आईला भेट दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे. गत वर्षांमध्ये मला मिळालेल्या बातम्यांपैकी ही बातमी मला सर्वात आनंदविणारी आहे.”

स्वतःबद्दल आणि त्याने ज्यांना साक्ष दिली त्या कोठडीतील त्याच्या सोबत्यांबद्दल बोलताना तो लिहितो: “आता आमचा देवावर विश्‍वास आहे व आम्ही आमच्या विश्‍वासानुरुप कार्य करण्याचा प्रयत्न करीत आहोत.” तो त्याच्या पत्राची समाप्ती अशा प्रकारे करतो: “प्रीती काय आहे हे शिकण्यास व विश्‍वास प्राप्त करण्यास आम्हाला मदत केल्याबद्दल आम्ही आभारी आहोत. मी जिवंत राहिलो तर तुमच्या कामात मदत करीन. बरं झालं तुम्ही अस्तित्वात आहात व देवावर प्रीती करण्यास आणि त्याच्यावर विश्‍वास ठेवण्यास इतरांना मदत करता.” या मनुष्याने आपल्या मृत्यूदंडाविषयी अपील केले आहे. त्याला फाशी देण्यात आली किंवा त्याने तुरुंगात अनेक वर्षे घालवले तरी, स्पष्टपणे देवाची स्तुती करण्यासाठी त्याच्याकडे कारण आहे.

‘मी अंध असले तरी पाहू शकते’

आता एका उत्साही, किशोरवयीन मुलीचा विचार करा जिने अचानक आपली दृष्टी गमावली. अर्जेंटिनात राहणाऱ्‍या ग्लोरियाने तिची दृष्टी गमावली. ग्लोरिया १९ वर्षांची होती तेव्हा अचानक तिची दृष्टी गेली व त्यानंतर ती पुन्हा कधीच पाहू शकली नाही. वयाच्या २९ वर्षी, ती एका मनुष्याची रखेल म्हणून राहू लागली व काही काळातच गरोदर राहिली. आता तिला वाटू लागले की आपल्या जीवनाला काही अर्थ आहे. पण जेव्हा तिचे मूल मेले, ती विचारू लागली की, ‘हे सर्व माझ्याबरोबरच का घडतयं? मी काय चूक केलीयं? देव खरोखरच अस्तित्वात आहे का?’

अशाच वेळी दोन यहोवाचे साक्षीदार तिच्या घरी आल्या. ती त्यांच्यासोबत बायबलचा अभ्यास करू लागली व नवीन जगात आंधळे पुन्हा पाहू लागतील या आशेविषयी शिकली. (यशया ३५:५) ग्लोरियासाठी ही किती आश्‍चर्यकारक आशा! तिला अतिशय आनंद झाला विशेषकरून तेव्हा जास्त आनंद झाला जेव्हा तिचा पती त्यांचा विवाह कायदेशीर करण्यास राजी झाला. त्यानंतर तिच्या पतीचा अपघात झाला आणि त्यामुळे तो दुर्बळ आणि व्हिलचेअरला जखडला. आज या अंध स्त्रीला उपजीविकेसाठी काबाडकष्ट करावे लागतात. याशिवाय, ती घरातली सर्व कामे करते आणि आपल्या पतीकडेही व्यक्‍तिगत लक्ष देते. तरीसुद्धा ग्लोरिया यहोवाची स्तुती करते! ती आपल्या ख्रिस्ती बंधू आणि भगिनींच्या साहाय्याने ब्रेल लिपीतील बायबलचा अभ्यास करते आणि राज्य सभागृहात होणाऱ्‍या ख्रिस्ती सभांद्वारे तिला पुष्कळ प्रोत्साहन मिळाले आहे. ती म्हणते: “याचे वर्णन करणे अवघड आहे, पण मी अंध असले तरीही पाहू शकते.”

लोक देवाची स्तुती करतात तेव्हा काही वेळा त्यांचा छळ केला जातो. क्रोएशियातील एका स्त्रीला देवाबद्दल शिकल्यावर आनंद झाला, पण तिच्या या नवीन प्राप्त विश्‍वासामुळे तिचा पती तिचा विरोध करू लागला आणि त्याने त्यांच्या एक वर्षीय मुलीला आपल्या जवळ ठेवून आपल्या पत्नीला सोडून दिले. बेघर, पतीने व कुटुंबाने त्यागलेल्या, घर, नोकरी किंवा स्वतःचे पोटचे लेकरूसुद्धा गमावलेल्या अवस्थेत, तिला पहिल्यांदा आपले सर्व काही लुटून गेल्यासारखे वाटले. परंतु, देवावरील तिच्या प्रीतीने तिला टिकवून ठेवले. तिची मुलगी मोठी होईपर्यंत तिचा तिच्याशी खूप कमी संपर्क होता. या स्त्रीला “अति मोलवान्‌ मोती” सापडला होता व ती तो गमावू इच्छित नव्हती. (मत्तय १३:४५, ४६) या कठीण काळात तिने आपला आनंद कसा टिकवून ठेवला? ती म्हणते: “आनंद, देवाच्या आत्म्याच्या फळांपैकी एक आहे. बाहेरचे वातावरण कसेही असले तरी हरितगृहात ज्याप्रमाणे रोपटी वाढू शकतात त्याचप्रमाणे बाहेरील परिस्थितीत स्वतंत्रपणे हा गुण विकसित केला जाऊ शकतो.”

फिनलंडमध्ये, मार्कसला स्नायुंचा असाध्य आजार असल्याचे सांगण्यात आले. काही काळातच तो व्हिलचेअरला जखडला. काही वर्षांनंतर, त्याच्या आईने त्याला एका पेन्टेकॉस्टल मनुष्याकडे नेले जो रोग्यांना बरे करण्यामध्ये नामांकित होता. पण मार्कस काही चमत्कारिकरीत्या बरा झाला नाही. म्हणून मार्कसचा देवावरचा विश्‍वास उडाला आणि त्याने विज्ञान आणि इतर लौकिक क्षेत्रांचा अभ्यास चालू केला. मग पाच वर्षांनंतर, मार्कस जेथे राहत होता तेथे व्हिलचेअरवर एक स्त्री आणि तिच्या सोबत एक तरुण मनुष्य असे दोघेजण आले. ते यहोवाचे साक्षीदार होते. आतापर्यंत मार्कस नास्तिकवादी झाला होता, पण धर्माची चर्चा करण्याला त्याला काही हरकत वाटली नाही म्हणून त्याने त्यांना आत येण्यास सांगितले.

नंतर, एका विवाहित जोडप्याने त्याला भेट दिली व त्याच्यासोबत बायबलचा अभ्यास चालू करण्यात आला. कालांतराने, बायबलच्या सत्याच्या शक्‍तीमुळे मार्कसचा दृष्टिकोन बदलला व त्याने हे जाणले, की तो विकलांग असला तरी देवाची स्तुती करण्यासाठी त्याच्याकडे कारणे होती. तो म्हणाला: “मला सत्य व यहोवा जिचा उपयोग करतो ती संघटना सापडली म्हणून खूप आनंद झाला आहे. माझ्या जीवनाला आता मार्गदर्शन व अर्थ लाभला आहे. आणखी एक हरवलेले मेंढरू सापडले आहे व आता ते यहोवाचा कळप सोडू इच्छित नाही!”—पडताळा मत्तय १०:६.

सर्व जण “याहची स्तुती” करोत

आज मानवांकडे, त्यांची कोणतीही परिस्थिती असो, देवाची स्तुती करण्यासाठी कारण आहे हे दाखवण्यासाठी अगणित अनुभवांपैकी काही अनुभवांचे कथन केले जाऊ शकते. प्रेषित पौलाने याचे वर्णन अशाप्रकारे दिले: “सुभक्‍ति तर सर्व बाबतीत उपयोगी आहे; तिला आताच्या व पुढच्याहि जीवनाचे अभिवचन मिळाले आहे.” (१ तीमथ्य ४:८) आपण देवाच्या इच्छेची पूर्ती केल्यास तो, ‘आताच्या जीवनाचे अभिवचन’ पूर्ण करील. अर्थात, तो या युगात गरीबांना श्रीमंत व आजाऱ्‍यांना निरोगी करणार नाही. पण जे त्याची सेवा करतात अशांना तो आपला आत्मा देतो जेणेकरून त्यांना त्यांची परिस्थिती कशीही असली तरी आनंद व समाधान मिळू शकते. होय, ‘आताच्या जीवनात’ आजाऱ्‍यांकडे, अत्याचाराला बळी पडलेल्यांकडे व गरीबांकडे देवाची स्तुती करण्याचे कारण असू शकते.

परंतु, ‘पुढे येणाऱ्‍या जीवनाविषयी’ काय? त्याच्या केवळ विचारानेच आपण देवाची स्तुती पूर्ण उत्साहाने केली पाहिजे! त्या काळाचा विचार करणे रोमहर्षक आहे जेव्हा दारिद्र्‌य अज्ञात होईल, जेव्हा कोणताही रहिवाशी, “मी रोगी आहे” असे म्हणणार नाही व जेव्हा यहोवा देव “त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्‍यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट ही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.” (यशया ३३:२४; प्रकटीकरण २१:३, ४; स्तोत्र ७२:१६) देवाकडून येणाऱ्‍या या अभिवचनांकडे तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून पाहता?

एल साल्वादोरमधील एका तरुण मनुष्याने बायबल आधारित पत्रिका स्वीकारली ज्यामध्ये वरील काही गोष्टींचे वर्णन दिले होते. ज्या साक्षीदाराने त्याला ती पत्रिका दिली तिला तो म्हणाला: “बाई, ही पत्रिका जे काही म्हणते ते काही खरे वाटत नाही.” पुष्कळांचा असा प्रतिसाद आहे. तरीसुद्धा ही अभिवचने, विश्‍वाला निर्माण करणाऱ्‍याने, आपल्या पृथ्वीच्या नैसर्गिक चक्रांना गती देणाऱ्‍याने व आनंद मिळवण्यासाठी गरीब व श्रीमंतांना मदत करणाऱ्‍याने दिली आहेत. तो जे म्हणतो त्यावर आपण विश्‍वास ठेवू शकतो. वर उल्लेखित तरुण मनुष्याने यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा अभ्यास केला आणि ही गोष्ट खरी असल्याचे त्याला आढळून आले. तुम्ही बायबलचा अभ्यास करीत नसल्यास तसे करण्याचे उत्तेजन आम्ही आपल्याला देत आहोत. मग, या सद्य व्यवस्थीकरणाचा नाश झाल्यावर व सर्व सृष्टी आनंदाने “हालेलूया!” “याहचे स्तवन करा,” असा गजर करील तेव्हा तुम्हीही त्या नवीन जगात असावे.—स्तोत्र ११२:१; १३५:१.

[तळटीपा]

a बायबलमध्ये, काही वेळा “यहोवा”चे “याह” असे संक्षिप्त रूप आले आहे.

[५ पानांवरील चित्र]

सर्व सृष्टी, “हालेलूया!” असा गजर करील तेव्हा तुम्हीही तेथे असावे ही सदिच्छा

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा