तुमच्यात त्याग करण्याची वृत्ती आहे का?
१ स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून येशू ख्रिस्ताने सबंध मानवजातीसाठी जे काही केले त्याचे शब्दांत वर्णन करणे कठीण आहे. त्याने केलेल्या कामाची कदर बाळगून आपण आपल्या क्षमतांचा आणि शक्तीचा निःस्वार्थपणे उपयोग केला पाहिजे. बायबलही आपल्याला हेच सांगते: “तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी.” (रोम. १२:१) असे करण्यासाठी आपल्याला वेळोवेळी स्वतःचे परीक्षण करण्याची गरज आहे. त्यामुळे त्याग करण्यात आपण कोणती कसूर तर सोडत नाही ना हे पाहण्यास आपल्याला मदत होईल.
२ बायबलचे ज्ञान संपादन करण्यात: व्यक्तिगतपणे बायबलचे वाचन करण्यासाठी तसेच बायबलचा नियमितपणे अभ्यास करण्यासाठी तुमची एक ठरलेली वेळ आहे का? आणि या ठरलेल्या वेळेनुसार तुम्ही बायबलचे वाचन आणि अभ्यास करता का? मंडळीच्या सभांची तयारी करण्याची तुम्हाला सवय आहे का? तुम्ही कुटुंब प्रमुख असल्यास तुमच्या कुटुंबासोबत तुम्ही नित्यनियमाने अभ्यास करता का? हे सर्व करण्यासाठी तुम्हाला बऱ्याच गोष्टींचा त्याग करावा लागेल. उदाहरणार्थ, तुम्ही जो वेळ टीव्ही, कम्प्युटर आणि अशा इतर गोष्टींत घालवता तो तुम्हाला कदाचित कमी करावा लागेल. पण, हे त्याग बायबलच्या वाचनामुळे मिळणाऱ्या आशीर्वादांच्या तुलनेत किती क्षुल्लक आहेत याचा जरा विचार करा. होय, बायबलच्या वाचनामुळे आपल्याला सार्वकालिक जीवन मिळू शकते!—योहा. १७:३.
३ मुलांना प्रशिक्षण देण्यात: निःस्वार्थ, आत्मत्यागी मनोवृत्ती आत्मसात करण्याचा एक उत्तम समय म्हणजे बालपण. तेव्हा, बालपणापासूनच आपल्या मुलांना याची जाणीव करून द्या, की जशी खेळण्या-बागडण्याची वेळ असते तशी काम करण्याची आणि आध्यात्मिक गोष्टींची देखील वेळ असते. (इफिस. ६:४) मुलांना घरात अशी कामे करायला सांगा ज्यांतून त्यांना काही शिकता येईल. त्यांच्यासोबत नियमितपणे क्षेत्र सेवेत जाण्यासाठी एक वेळापत्रक तयार करा. शिक्षणाच्या जोडीला उत्तम आदर्श असल्यास शिक्षण अधिक प्रभावशाली ठरते. तेव्हा, आपल्या मुलांसमोर एक उत्तम आदर्श ठेवा.
४ मंडळीच्या कामांत: मंडळीतले सगळेच जण एकमेकांकरता आनंदाने त्याग करतात तेव्हा मंडळीमध्ये प्रेमाचा ओलावा टिकून राहतो. (इब्री. १३:१६) राज्य प्रचाराच्या आणि शिष्य बनविण्याच्या कामात तुम्हाला जास्त वेळ खर्च करता येण्यासारखा आहे का? मंडळीतल्या आजारी, वयस्कर लोकांना तुम्ही काही मदत करू शकता का? अशा गरजू बांधवांना सभांना उपस्थित राहता यावे म्हणून तुम्ही त्यांना मदत करू शकता का?
५ येशूने स्वतःचा जीव देऊन त्यागाचे एक मूर्तिमंत उदाहरण आपल्यासमोर मांडले आहे. हा त्याग करण्यापूर्वी त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, की त्यांनी पहिल्यांदा देवाच्या राज्याचा शोध करावा आणि जीवनातल्या इतर गोष्टींना दुय्यम स्थानी ठेवावे. (मत्त. ६:३३) अशाप्रकारे, जीवनात त्याग केल्याने आपल्याला मनस्वी आनंद मिळेल आणि आपण यहोवाची सेवा निरंतर करत राहू.