तुम्ही ख्रिस्तावर प्रेम करता का?
१ आपल्या गुरूच्या अर्थात येशूच्या जीवनाविषयी बोलताना प्रेषित योहानाने म्हटले: “ह्या जगातील स्वकीयांवर त्याचे [येशूचे] जे प्रेम होते ते त्याने शेवटपर्यंत केले.” (योहा. १३:१) येशूने आपल्याकरता दिलेल्या महान बलिदानाची आठवण स्मारक विधीच्या दिवसांत झाल्याशिवाय राहत नाही. येशूच्या खंडणी बलिदानावर विश्वास ठेवून, प्रचाराच्या कार्यात आवेशाने भाग घेऊन आणि त्याच्याप्रमाणे “शेवटपर्यंत” विश्वासू राहून आपण त्याच्या या उदात्त प्रेमाबद्दल कृतज्ञता दाखवू शकतो.—मत्त. २४:१३; २८:१९, २०; योहा. ३:१६.
२ ख्रिस्ताने दाखवलेल्या प्रेमाबद्दल कृतज्ञता दाखवणे: पृथ्वीवरील आपल्या जीवनाच्या शेवटल्या आठवड्यात येशू लोकांना शिकवण्यात अत्यंत व्यस्त होता. (मत्त. २१:२३; २३:१; २४:३) आज आपण ख्रिस्ताच्या पावलावर पाऊल ठेवून चालत आहोत, त्यामुळे त्याचे प्रेम आपल्याला यहोवाच्या सेवेत ‘नेटाने यत्न करण्याची,’ मेहनत करण्याची प्रेरणा देते. (लूक १३:२४) एप्रिल महिन्यात प्रचार कार्याकरता काही खास योजना करण्यात आल्या आहेत. मग, त्यांचा फायदा घेऊन तुम्हाला जास्त वेळ प्रचार करायला आवडणार नाही का?
३ या वर्षी प्रभूच्या सांज भोजनाचा कार्यक्रम एप्रिल १९, बुधवारी संध्याकाळी पार पाडला जाईल. या महत्त्वाच्या प्रसंगी किती लोक उपस्थित राहतील? अर्थात, हे बरेचसे आपल्यावरच अवलंबून आहे. स्मारक विधीसाठी तुम्हाला ज्यांना आमंत्रण द्यायचे आहे अशा सर्वांची एक यादी तुम्ही तयार केली आहे का? या यादीत तुमचे बायबल विद्यार्थी, आस्थेवाईक लोक, नातेवाईक, शाळा-कॉलेजातले मित्रमैत्रिणी आणि व्यवसाय वर्तुळातील परिचितांची नावे लिहिता येण्यासारखी आहेत. अशा सर्वांना भेटून तुम्ही त्यांना या कार्यक्रमाचे आमंत्रण दिले आहे का? शिवाय, स्मारक विधीच्या काही दिवसांपूर्वी तुम्ही पुन्हा एकदा त्यांना या कार्यक्रमाला येण्याची आठवण करून द्याल का? स्मारक विधीला उपस्थित राहण्यासाठी यांपैकी काहींना तुमची मदत हवी आहे का? यंदा मंडळीतले वडील, सेवेत थंड पडलेल्या सर्वांना या प्रसंगी उपस्थित राहण्याचे आमंत्रण देणार आहेत. या वर्षी स्मारक विधी आठवड्याच्या शेवटी नसून तो आठवड्याच्या दरम्यान म्हणजे बुधवारी असल्यामुळे या प्रसंगाचे महत्त्व कमी होत नाही.
४ पूर्ण तयारीनिशी या: स्मारक विधीला पूर्ण तयारीनिशी उपस्थित राहिल्यामुळे या कार्यक्रमाच्या गांभीर्याची आपल्याला जाणीव राहील. पौलाने आपल्या सहख्रिश्चनांना या प्रसंगाचे महत्त्व, त्याचे गांभीर्य लक्षात ठेवण्यास सांगितले. (१ करिंथ. ११:२०-२६) तुम्ही देखील आपल्या कौटुंबिक बायबल अभ्यासात योहानाच्या शुभवर्तमानातील १३ ते १७ अध्यायांचे वाचन करू शकता आणि मग कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला येशूचे बलिदान किती महत्त्वपूर्ण वाटते ते व्यक्त करण्यास तुम्ही सांगू शकता. याशिवाय, स्मारक विधीच्या सप्ताहासाठी नेमून दिलेले बायबल वाचन करण्याचे विसरू नका.
५ येशूवर आपण मनापासून प्रेम करतो. आणि आपले हे प्रेम उथळ, काही काळापुरते, फक्त एप्रिल १९ तारखेपुरतेच नाही; तर येशू ख्रिस्तावर सदासर्वदा प्रेम करण्याचा आपण संकल्प केला आहे. दर वर्षाप्रमाणे या वर्षाचा स्मारक विधी देखील आपला हा संकल्प अधिक मजबूत करण्यास आपली मदत करील.