डॅनियल्स प्रॉफेसी पुस्तकाचा अभ्यास करणे
१ एप्रिल १७ तारखेने सुरू होणाऱ्या सप्ताहापासून मंडळीच्या पुस्तक अभ्यासात आपण पे अटेन्शन टू डॅनियल्स प्रॉफेसी! या पुस्तकाचा अभ्यास करणार आहोत. आतापर्यंत बऱ्याच जणांनी हे आकर्षक पुस्तक वैयक्तिकरित्या वाचूनही काढले असेल यात शंका नाही. परंतु आता, गट या नात्याने या प्रकाशनाची चर्चा करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. तेव्हा, सर्व प्रचारकांना, आस्थेवाईकांना आणि मुलांना देखील डॅनियल पुस्तकाचा सखोल अभ्यास करण्याचे आमंत्रण आणि उत्तेजन आम्ही देत आहोत.—अनु. ३१:१२, १३.
२ अभ्यासाचा आराखडा आणि मार्गदर्शक सूचना: डॅनियल्स प्रॉफेसी पुस्तकाच्या अभ्यासाचा एक संपूर्ण आराखडा आमची राज्य सेवा याच्या याच अंकात दिलेला आहे. आराखड्याची एक प्रत आपल्या अभ्यासाच्या पुस्तकात ठेवण्याचे विसरू नका. पुस्तकाचा अध्याय, परिच्छेद क्रमांक आणि दर आठवडी बायबलच्या दानीएल पुस्तकातून वाचली जाणारी वचने, हे सर्व आराखड्यात दिलेले आहे. पुस्तकातील विशिष्ट भागांची चर्चा कशा प्रकारे आणि केव्हा केली जावी हे तळटीपांमध्ये सांगितले आहे. दर आठवडी अभ्यासाच्या शेवटी पुस्तक अभ्यास संचालक बायबलच्या दानीएल पुस्तकातील विशिष्ट वचनांची उजळणी करील. ही वचने त्या त्या आठवड्याच्या आराखड्यात दिलेली असतील. वेळ असल्यास, वचने वाचून त्यावर चर्चा केली जाऊ शकते. काही वचनांची अनेक आठवड्यांपर्यंत चर्चा होत असल्यामुळे आराखड्यात तीच ती वचने पुन्हा पुन्हा येत असल्याचे तुमच्या लक्षात येईल.
३ अभ्यासाची उत्तम तयारी करा: दर आठवडी अभ्यासण्यासाठी जो भाग नेमून दिलेला आहे त्याची वरवर किंवा घाईगडबडित चर्चा होऊ नये म्हणून बराच वेळ देण्यात आला आहे. पुस्तकातले चार अध्याय लहान असल्यामुळे जून ५ ने सुरू होणाऱ्या सप्ताहाच्या अभ्यासाच्या शेवटी संचालक दानीएल २:१-४० या वचनांची उजळणी करू शकतो. मग, जून २६ ने सुरू होणाऱ्या सप्ताहात त्याला दानीएल ३:१-३० वचनांची उजळणी करता येईल. सप्टेंबर ४ ने सुरू होणाऱ्या सप्ताहात पृष्ठ १३९ वर दिलेल्या चित्रांची आणि शास्त्रवचनांची संचालकाने चांगली चर्चा करावी. आणि पृष्ठे १८८ आणि १८९ वर दिलेल्या चार्टची चर्चा ऑक्टोबर २ ने सुरू होणाऱ्या सप्ताहात करावी.
४ तर मग, प्रत्येक आठवड्याच्या अभ्यासाची उत्तम तयारी करा आणि पुस्तक अभ्यासात उत्साहाने सहभाग घ्या. यहोवाच्या दृश्य संघटनेसोबत सहवास करण्याचा आणि त्याच्या विश्वासू अभिषिक्त जणांनी दिलेल्या अंतर्दृष्टीचा व समजबुद्धीचा लाभ घेण्याचा जो विशेषाधिकार आपल्याला मिळाला आहे त्याची कदर करा. (दानीएल १२:३, ४) इतरांनाही नियमितपणे पुस्तक अभ्यासाला येण्याचे प्रेमळ उत्तेजन द्या. अशाप्रकारे, बायबलमधील दानीएलाच्या विस्मयकारक पुस्तकात प्रकट केलेल्या देवाच्या भविष्यसूचक वचनाकडे आपण सर्व लक्ष देऊ या.—इब्री. १०:२३-२५; २ पेत्र १:१९.