मदत मागा
१ आज आपण ‘कठीण दिवसांत’ जगत आहोत याविषयी कोणतेही दुमत नाही. (२ तीम. ३:१) त्यामुळे, यहोवाची सेवा करत असताना अनेक समस्यांना आपल्याला सामोरे जावे लागते. आणि त्यांचा सामना करणे म्हणजे अगदी सहनशक्तीचा अंत पाहण्यासारखे आहे असे अनेकांना वाटेल. तुम्हालाही असेच वाटते का? असल्यास तुम्ही काय करू शकता?
२ अनेक वर्षांपासून विश्वासूपणे यहोवाची सेवा करणाऱ्या बंधूभगिनींची मदत घ्यायला काय हरकत आहे? पण, काहींना दुसऱ्यांकडून मदत मागणे कसेतरी वाटत असेल; किंवा दुसरे कोणी आपल्याला मदत करू शकणार नाही असे वाटत असेल. तर इतर काहींना वाटेल की हा माझा भार आहे आणि तो मीच वाहिला पाहिजे. होय, हा आपलाच भार आहे आणि प्रत्येकाने आपापला भार वाहण्यासाठी प्रयत्न केलाच पाहिजे हे मान्य. (गलती. ६:२, ५) पण, लक्षात घ्या, येथे आपण आपल्या आध्यात्मिक आरोग्याबद्दल बोलत आहोत. त्यामुळे इतरांकडून मदत मागण्यास कधीही मागेपुढे पाहू नये.
३ कोणाकडून मदत घ्याल: प्रथम, आपल्या पुस्तक अभ्यास संचालकाकडून मदत घेतली जाऊ शकते. “मला तुमच्यासोबत प्रचारकार्य करायला आवडेल,” असे तुम्ही त्यांना सांगू शकता. अशाप्रकारे तुम्हाला आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी मदत हवी आहे हे त्यांच्या लक्षात येईल. पुस्तक अभ्यास संचालक जर सेवा सेवक असेल तर तुम्हाला कशी मदत करता येईल याबद्दल तो वडिलांशी बोलेल; किंवा मग, मदतीकरता तुम्ही स्वतः एखाद्या वडिलाकडे जाऊ शकता.
४ कोणत्या बाबतीत तुम्हाला मदत हवी आहे? यहोवाच्या सेवेतला तुमचा उत्साह कमी झाला आहे का? जगीक प्रभावांपासून आपल्या मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या विवाह सोबत्याविना तुम्ही एकटेच धडपडत आहात का? वय झाल्यामुळे तुम्हाला काही मदतीची गरज आहे का? किंवा काही कारणाने तुम्ही निराश झाला आहात का? हा कठीण काळ असल्यामुळे समस्या तर येणारच; पण चिंता करू नका, तुम्हाला मदत मिळू शकते.
५ अनुभवी बांधवांकडून मिळणारी मदत: मंडळीतील वडिलांचे तुमच्यावर जिवापाड प्रेम आहे, त्यांना तुमची काळजी आहे हे नेहमी लक्षात असू द्या. त्यामुळे तुम्ही आपल्या समस्यांबद्दल त्यांच्याशी मनमोकळे बोलू शकता आणि ते तुमचे नक्कीच ऐकतील. तुमच्या समस्यांप्रमाणेच मंडळीतील इतरांच्याही समस्या असल्यास संपूर्ण मंडळीला मदत व्हावी याकरता ते काही खास व्यवस्था करतील. आणि या गोष्टी लक्षात ठेवून ते मंडळीला मार्गदर्शन देतील. हेही लक्षात असू द्या, की तुमची मदत करण्यासाठी “कळपाला कित्ते” असलेले हे बांधव तुमच्या खांद्याला खांदा लावून काम करायला नेहमी तयार असतात. (१ पेत्र ५:३) हे अनुभवी बांधव आपल्याला बायबलमधून सल्ला देतात. त्यामुळे ते देत असलेला सल्ला लक्षपूर्वक ऐकून तो अंमलात आणल्यास आपले जीवन व आपले सेवा कार्य सुधारण्यास मदत होईल.—२ तीम. ३:१६, १७.
६ मंडळीतील वडील हे येशूने आपल्याला दिलेल्या “देणग्या” आहेत. (इफिस. ४:८) याचा अर्थ, ते ‘तुमचेच आहेत’ आणि तुमच्या सेवेकरता ते सदैव हजर आहेत. (१ करिंथ. ३:२१-२३) तर मग, त्यांची मदत का घेऊ नये?