आपण लोकांना आनंदाची बातमी सांगतो
१ “चांगल्या गोष्टींची सुवार्ता” सांगणे हा आपल्याकरता किती मोठा विशेषाधिकार आहे! (रोम. १०:१५) आज दहशतीने आणि निराशेने ग्रासलेल्या लोकांना आपण सांगत असलेला संदेश खरोखरच एक सांत्वनदायी, आनंददायी संदेश आहे. पण, आपण “सुखाचे शुभवृत्त विदित करतो” (तिरपे वळण आमचे.) हे लोकांना कसे समजेल? त्यासाठी पुढील मुद्दे विचारात घ्या. —यश. ५२:७; मराठी कॉमन लँग्वेज भाषांतर.
२ सकारात्मक गोष्टींवर जोर द्या: क्षेत्रात जाण्याआधी आपल्या प्रस्तुतीची तयारी करताना तसेच आपण लोकांच्या हातात कोणते साहित्य देणार आहोत याचा पूर्वविचार करताना आपल्या संदेशाच्या सकारात्मक गोष्टींचा विचार करा. क्षेत्रात लोकांशी बोलताना अशा सकारात्मक गोष्टींवर अधिक भर द्या. तसेच, बायबलवर आधारित असलेल्या आपल्या आशेविषयी लोकांना सांगताना आत्मविश्वासाने आणि उत्साहाने बोला. यांमुळे उत्तम परिणाम निष्पन्न होतील यात शंका नाही.—नीति. २५:११.
३ दिवसेंदिवस ढासळणाऱ्या जगिक परिस्थितींचा आपल्यावर कसा परिणाम होतो याबद्दल लोक बोलतात तेव्हा त्यांना फक्त सहानुभूतीच दाखवू नका; तर या बिकट परिस्थितींवर केवळ देवाचे राज्य तरणोपाय आहे हे त्यांना दाखवा. लोकांना यहोवाच्या ‘सुडाच्या दिवसाविषयी’ सांगताना हा सुडाचा दिवसही दीन लोकांसाठी कशाप्रकारे एक “शुभवृत्त” ठरेल हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करा. (यश. ६१:१, २) यहोवा जे काही करील ते आपल्या आनंदाकरता आणि भल्याकरता असेल याचे आश्वासन आपण त्यांना देऊ शकतो.
४ आनंदाने सत्य सांगा: आपला प्रसन्न चेहरा आणि आपल्या बोलण्यातला आत्मविश्वास पाहून लोक आपले ऐकण्यास लगेच तयार होतील. एक सकारात्मक मनोवृत्ती दाखवल्यास आपल्या ‘आशेविषयी आपण हर्षित’ आहोत हे त्यांच्या लक्षात येईल. (रोम. १२:१२) यामुळे देखील ते सुवार्तेला प्रतिसाद देतील. होय, सेवेच्या हरएक पैलूत नेहमीच आपण एक सकारात्मक आणि आनंदी मनोवृत्ती दाखवली पाहिजे.
५ लोकांना आपण सुवार्ता सांगतो तेव्हा केवळ एक चांगली बातमीच आपण त्यांच्या कानावर घालत नसतो; तर आतासाठी आणि भवितव्यासाठी एका उत्तम जीवनाची अढळ आशा देखील आपण त्यांना देत असतो. (१ तीम. ४:८) लोक आपल्या सुवार्तेचा स्वीकार करतील की नाही हे बरेचसे आपल्या मनोवृत्तीवर देखील अवलंबून असते. त्यामुळे क्षेत्रात आपण काय बोलतो, कसे बोलतो याकडे अधिक लक्ष देणे जरूरीचे आहे. असे केल्यास, सत्याचा प्रांजळपणे शोध घेणारे लोक आपण सांगत असलेल्या आनंदाच्या बातमीचा नम्रतेने स्वीकार करतील.