आपण विश्वासात स्थिर कसे राहू शकतो?
१ यहोवाच्या संघटनेशी आपला पहिल्यांदा संपर्क आला तेव्हापासून आजपर्यंत आपण केलेल्या आध्यात्मिक प्रगतीमुळे आपल्याला किती आनंद होतो! परंतु, ‘विश्वासात मुळावण्यासाठी, रचले जाण्यासाठी आणि दृढ होण्यासाठी’ अखंडपणे आध्यात्मिक प्रगती करत राहणे जरूरीचे आहे. (कलस्सै. २:६, ७) आज बऱ्याच जणांनी आध्यात्मिकतेत पुढे वाटचाल केली आहे. पण, त्याच वेळी काहीजण ‘विश्वासात स्थिर न राहिल्यामुळे’ मागे पडले आहेत किंवा सत्यापासून भरकटले आहेत. (१ करिंथ. १६:१३) आपल्या बाबतीत कधी असे घडू नये म्हणून काय करता येण्यासारखे आहे? पुढील मुद्दे लक्षात ठेवल्यास आपल्याला ही स्थिती टाळता येण्यासारखी आहे.
२ आध्यात्मिक कार्यहालचालींत व्यस्त राहा: यहोवाच्या संघटनेतील आध्यात्मिक कार्यहालचालींत स्वतःला सतत व्यस्त ठेवा. याच संघटनेत आपल्या सर्व आध्यात्मिक गरजा मुबलकपणे भागवल्या जातात. मंडळीच्या सभा, संमेलने आणि अधिवेशने यांमुळे अधिकाधिक आध्यात्मिक प्रगती करण्यास आणि विश्वासात स्थिर राहण्यास आपल्याला प्रोत्साहन मिळते. (इब्री १०:२४, २५) पण, या सुविधांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला अशा ख्रिस्ती मेळाव्यांमध्ये उपस्थित राहायला नको का? बायबलचे तसेच टेहळणी बुरूज व सावध राहा! नियतकालिकांचे आणि देवाच्या वचनातील जड अन्नाची चर्चा करणाऱ्या पुस्तकांचे नियमितपणे वाचन करण्याची चांगली सवय लावल्याने आपली आध्यात्मिक मुळे अधिकाधिक खोलवर जाऊन मजबूत होतील. (इब्री. ५:१४) याशिवाय, जीवनात आध्यात्मिक ध्येये ठेवल्याने आणि ती प्राप्त करण्यासाठी मेहनत केल्याने आपल्याला अनेक लाभ मिळत राहतील.—फिलिप्पै. ३:१६.
३ प्रौढांची मदत घ्या: आध्यात्मिक प्रगती करायची असल्यास मंडळीत आध्यात्मिकदृष्ट्या प्रौढ असलेल्या लोकांशी सहवास राखा. खासकरून मंडळीतील वडिलांद्वारे आपल्याला आध्यात्मिक तजेला प्राप्त होऊ शकतो; तेव्हा, आपल्या मंडळीतील वडिलांशी चांगल्याप्रकारे ओळख करून घ्या. (१ थेस्सलनी. २:११, १२) ते जो काही सल्ला, मार्गदर्शन देतील त्याचा स्वीकार करा. (इफिस. ४:११-१६) वडिलांशिवाय, मंडळीतील सेवा सेवक देखील विश्वासात स्थिर राहण्यासाठी मदत करतात. तेव्हा, उत्तेजनासाठी त्यांचीही मदत घेतली जाऊ शकते.
४ आपल्या सेवाकार्यात सुधारणा करण्यासाठी तुम्हाला काही मदत हवी आहे का? असल्यास तुमच्या मंडळीतील वडिलांशी बोला, त्यांच्याकडे मदतीकरता विनंती करा. ते कदाचित, पायनियर साह्य कार्यक्रमात तुमचे नाव नोंदवतील. तुमचा अलीकडेच बाप्तिस्मा झाला आहे का? तसे असेल तर प्रगती करण्याची प्रेरणा मिळवण्यासाठी आणि आध्यात्मिक प्रौढतेप्रत प्रगती करण्यासाठी आपली सेवा या पुस्तकाचा अभ्यास करा आणि त्यातील सल्ला अंमलात आणा. तुम्हाला मुले आहेत का? असल्यास, आध्यात्मिकरित्या मजबूत राहण्यासाठी त्यांची मदत करत राहा.—इफिस. ६:४.
५ विश्वासात मुळावल्याने आणि स्थिर झाल्याने आपण यहोवाच्या आणि आपल्या बांधवांच्या अगदी समीप येतो. या अतूट नातेसंबंधामुळे आपल्याला सैतानाच्या हल्ल्यांचा प्रतिकार करता येतो आणि सार्वकालिक भवितव्याबद्दलची आपली आशा अधिकाधिक प्रज्वलित होते.—१ पेत्र ५:९, १०.