साहाय्य करण्यास सदा सिद्ध असा
१. कोणकोणत्या कारणांमुळे एखाद्याची आध्यात्मिकता कमजोर होऊ शकते?
१ ॲनाचा पती सत्यात नाही. आणि तिच्या नोकरीमुळे तिला नियमितरीत्या ख्रिस्ती सभांना उपस्थित राहता येत नव्हते, सेवेत भाग घेता येत नव्हता व देवाच्या वचनाचा अभ्यास करता येत नव्हता. तिचे यहोवावर प्रेम होते तरीपण ती अक्रियाशील झाली. पण, काळजीवाहू वडिलांकडून ॲनाला वेळीच आध्यात्मिक साहाय्य मिळाले.
२. कोणकोणत्या मार्गांनी सर्व ख्रिस्ती, साहाय्य देण्यास सदा सिद्ध असू शकतात?
२ ख्रिस्ती मंडळीकडून मिळणारी आध्यात्मिक मदत स्वीकारून आपण, यहोवावरील आपला भरवसा व्यक्त करतो. प्रेमळ काळजी दाखवण्याच्या बाबतीत येशू ख्रिस्ताचे अनुकरण करून मंडळीतील वडील जन, आध्यात्मिक गोष्टींच्या बाबतीत अडचण अनुभवणाऱ्यांना प्रोत्साहन व व्यावहारिक मदत देण्याकरता संधी शोधत असतात. (१ थेस्सलनी. ५:१४) कधीकधी, त्यांना फक्त शास्त्रवचनांतील सांत्वनदायक उताऱ्यांवर आधारीत असलेला एखादा प्रोत्साहनदायक विचारच काय तो हवा असतो. तात्पुरत्या काळासाठी अशक्त झालेल्यांना मदत करणे ही केवळ वडिलांचीच नव्हे तर सर्वांची जबाबदारी आहे. ‘समयोचित विचारपूर्वक भाषणात’ किती शक्ती असते हे आपल्या सर्वांनी कधी न कधी निश्चितच अनुभवलेले असेल.—नीति. २५:११; यश. ३५:३, ४.
३, ४. इतरांना मदत करण्यात काय काय गोवलेले आहे आणि आपण हे कसे करू शकतो?
३ पुढाकार घ्या: साहाय्य हवे असलेल्यांमध्ये प्रेमळ आस्था घेण्याकरता आपण पुढाकार घेतला पाहिजे, सहानुभूती दाखवली पाहिजे आणि प्रामाणिक असले पाहिजे. दावीद दुःखी आहे असे जेव्हा योनाथानला समजले तेव्हा तो ‘दाविदाकडे त्या उंचवट्यावरील झाडीत गेला . . . व त्याने त्याला बळकटी दिली.’ (१ शमु. २३:१५, १६) अतिशय कोमलतेने इतरांना मदत करा. खरी काळजी व्यक्त करणारे शब्द वापरल्यास तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकतील. तसेच, एखाद्या आध्यात्मिक बंधू अथवा भगिनीला पुन्हा मिळवण्याकरता प्रामाणिक, हेतूपूर्वक प्रयत्न केले पाहिजे, हे येशूने एका दृष्टान्तावरून दाखवले. (लूक १५:४) आपण ज्यांना मदत करत आहोत अशा बंधू अथवा भगिनीमध्ये लगेच प्रगती दिसून येत नसली तरीसुद्धा, इतरांना मदत करण्याची प्रामाणिक इच्छा आपल्याला मदत करीत राहण्यास प्रवृत्त करेल.
४ आपल्या पुस्तक अभ्यास गटातील एखाद्या बांधवाला अथवा बहिणीला आपल्याबरोबर सेवेमध्ये येण्याचे आमंत्रण देण्याकरता आपण पुढाकार घेतो तेव्हा त्यांना किती प्रोत्साहन मिळू शकते! यहोवाच्या सहसेवकाला आपण सेवेत मदत करत असतो तेव्हा देवाच्या सेवेत आणखी पुढे येण्याचे उत्तेजन देण्याकरता आपण त्या संधीचा फायदा घेऊ शकतो. यहोवाच्या सेवेत एकत्र घालवलेले हे आनंदी क्षण, ज्यांनी आपला आध्यात्मिक तोल गमावला होता अशांना खासकरून पुन्हा सावरण्यास मदत करू शकतो.
५. काही परिस्थितीत, वडील जन कोणती मदत देऊ शकतात?
५ एक प्रेमळ तरतूद: काही अवधीपासून ज्यांनी प्रचार कार्यात भाग घेतलेला नाही किंवा मंडळीसोबत सहवास राखलेला नाही अशांना आपला विश्वास मजबूत करण्यासाठी जादा मदत द्यावी लागेल. एकमात्र खऱ्या देवाची उपासना करणे, यहोवाच्या जवळ या किंवा बायबल नेमके काय शिकवते? यासारख्या पुस्तकांतून कदाचित त्यांचा बायबल अभ्यास घ्यावा लागेल. हा अभ्यास दीर्घ कालावधीसाठी असण्याची गरज नाही कारण त्यांचा बाप्तिस्मा झालेला आहे. या तरतुदीचा कोणाकोणाला फायदा होऊ शकतो याबाबतीत मंडळीच्या सेवा समितीने जागृत असावे.—आमची राज्य सेवा याच्या नोव्हेंबर १९९८ आणि नोव्हेंबर २००० अंकातल्या प्रश्न पेट्या पाहा.
६. एका भगिनीने आध्यात्मिक शक्ती पुन्हा कशी मिळवली?
६ सुरुवातीला उल्लेख केलेल्या ॲनाने, वडिलांनी तिच्याबरोबर एका प्रौढ भगिनीला बायबल अभ्यास करण्याची व्यवस्था केली तेव्हा त्यांची मदत कृतज्ञतेने स्वीकारली. ॲनाला यहोवाच्या पुन्हा जवळ येण्यास केवळ चार अभ्यास सत्रच पुरेसे होते. तिने मंडळीच्या सभांना पुन्हा यायला सुरुवात केली आणि सार्वजनिकरीत्या यहोवा देवाची स्तुती करण्याची आपली इच्छा पुन्हा जागृत केली. प्रौढ भगिनीने तिला सेवेतही मदत केली. ॲनाला घरोघरच्या प्रचार कार्यात जोपर्यंत आत्मविश्वास आला नाही तोपर्यंत ती तिला आपल्याबरोबर बायबल अभ्यासांना घेऊन जात असे. ॲनाला आपली आध्यात्मिक कार्ये पुन्हा सुरू करण्याकरता केवळ एक मदतीचा हात हवा होता!
७. इतरांना आध्यात्मिकरीत्या मजबूत केल्याने कोणते फायदे मिळतात?
७ साहाय्य हवे असलेल्यांना मदत केल्यामुळे सर्वांनाच आशीर्वाद मिळतो. ज्याला मदत दिली जाते त्याला यहोवाच्या जवळ येण्याचा आणि आपल्या संघटनेच्या कार्यांत पुन्हा एकदा भाग घेण्याचा आनंद मिळतो. आणि वडिलांना अशांची प्रगती पाहून आनंद होतो. (लूक १५:५, ६) मंडळीतील सर्व एकमेकांबद्दल प्रेमळ काळजी दाखवतात तेव्हा ते जवळ येतात आणि त्यांच्यामध्ये एकी येते. (कलस्सै. ३:१२-१४) साहाय्य करण्यास सदैव सिद्ध असलेल्या यहोवाचे अनुकरण करण्याकरता आपल्याजवळ किती चांगली कारणे आहेत!—इफिस. ५:१.