तातडीने ‘वचनाची घोषणा करण्यास तयार राहा!’
१ तुम्हाला कोणी एखादे महत्त्वाचे काम ताबडतोब करायला सांगितल्यास तुम्ही ते कसे कराल? अगदी रमतगमत कराल की ते काम करण्यास लगेच तयार व्हाल? राज्य प्रचाराचे आपले कामही अत्यंत महत्त्वाचे असून ते तातडीने करण्याची गरज आहे. त्यामुळे ख्रिश्चनांनी तातडीने ‘वचनाची घोषणा करण्यास तयार असले पाहिजे,’ असे प्रेषित पौलाने जे म्हटले ते काही उगाच म्हटले नाही. (२ तीम. ४:२) मग, आपण हे कार्य तातडीने करण्यास तयार असतो का?
२ पौलाच्या कदाचित ऐकण्यात आले असेल, की त्याच्या दिवसांतील काही ख्रिस्ती बंधुभगिनी आपल्या सेवाकार्यात सुस्त किंवा “मंद” झाले होते. (रोम. १२:११) त्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना हवे तितके यश मिळत नव्हते. तसेच, इतरांना सत्य शिकवल्यामुळे मिळणारा आनंदही त्यांना मिळत नव्हता.
३ सेवेबद्दल येशूची मनोवृत्ती: “ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे व त्याचे कार्य सिद्धीस न्यावे हेच माझे अन्न आहे,” असे येशूने म्हटले. यावरून सेवाकार्यातील त्याचा उत्साह किती दांडगा होता हे दिसून येते. त्याचा हा उत्साह पाहूनच त्याच्या शिष्यांना मोठ्या आनंदाने सेवाकार्य करण्याची प्रेरणा मिळाली. त्यांना आणखीन उत्तेजन देण्यासाठी येशूने म्हटले: ‘कापणीसाठी शेते पांढरी झाली आहेत.’ (योहा. ४:३४, ३५) येशूने नंतर आपल्या शिष्यांना जे करायला सांगितले त्यावरून येशूच्या मनात सेवाकार्याविषयी सुरवातीपासून शेवटपर्यंत निकडीची भावना असल्याचे दिसून येते. त्याने त्यांना म्हटले: “पिकाच्या धन्याने आपल्या कापणीस कामकरी पाठवून द्यावेत म्हणून त्याची प्रार्थना करा.” (मत्त. ९:३८) आपल्याला नेमून दिलेले प्रचाराचे काम अत्यंत महत्त्वाचे असून ते पूर्ण करणे आपली जबाबदारी आहे याची येशूला पूर्ण जाणीव होती आणि म्हणूनच त्याने कोणत्याही गोष्टीला या कार्याच्या आड येऊ दिले नाही.
४ सेवेबद्दल आपली मनोवृत्ती: आज प्रचाराचे कार्य पूर्वीपेक्षा अधिक तातडीने करण्याची गरज आहे. जगाच्या बऱ्याचशा भागांत कापणीसाठी शेते तयार झाली आहेत. वारंवार प्रचार कार्य झालेल्या देशांतसुद्धा दर वर्षी हजारोंच्या संख्येने लोक बाप्तिस्मा घेत आहेत. या दुष्ट व्यवस्थीकरणाचा अंत अगदी झपाट्याने जवळ येत आहे. त्यामुळे “प्रभूच्या कामात सर्वदा अधिकाधिक” करण्यास आपण तयार असले पाहिजे. (१ करिंथ. १५:५८) राज्याचा संदेश इतरांना सांगण्याच्या कामात नेटाने यत्न करण्याची यासारखी दुसरी वेळ नाही.
५ तेव्हा, घरोघर जाऊन किंवा जेथे कोठे लोक भेटतील तेथे जाऊन लोकांना सुवार्ता सांगण्याच्या कामात आपण स्वतःला झोकून देण्यास हवे. प्रचार कार्याकरता प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याद्वारे आपण दाखवून देतो, की आपल्या जीवनात आपण देवाच्या राज्याला प्राधान्य देत आहोत. (मत्त. ६:३३) अशाप्रकारे, वचनाची घोषणा निष्ठेने आणि तातडीच्या भावनेने केल्यास आपल्याला जरूर आनंदाची अनुभूती लाभेल.