‘प्रभूमध्ये श्रम करणाऱ्या स्त्रिया’
१ असे रोम मंडळीत परिश्रम करणाऱ्या त्रुफैना आणि त्रुफासा या स्त्रियांविषयी पौलाने म्हटले. पर्सिस नावाच्या आणखी एका बहिणीबद्दल पौल म्हणाला: “तिने प्रभूमध्ये फार श्रम केले.” त्याचप्रमाणे, ‘पुष्कळ जणांस साहाय्य करणारी’ अशा शब्दांत त्याने फीबीची प्रशंसा केली. (रोम. १६:२, १२) याशिवाय, बायबलमध्ये दुर्कस नावाच्या एका स्त्रीचा “सत्कृत्ये व दानधर्म करण्यात तत्पर” असा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. (प्रे.कृत्ये ९:३६) प्रभूमध्ये श्रम करणाऱ्या अशा स्त्रिया आजही आपल्या मंडळ्यांत आहेत. या आध्यात्मिक मनोवृत्तीच्या स्त्रियांमुळे संपूर्ण मंडळीला किती लाभ होतो!
२ मग, मंडळीमध्ये परिश्रम करणाऱ्या या स्त्रियांची आपण मनस्वी कदर करतो का? प्रचार कार्यात त्या सिंहाचा वाटा उचलतात, बहुतेक बायबल अभ्यास चालवतात; अनेक नवनवीन लोकांना मदत करतात. तसेच, आपल्या मुलांच्या आध्यात्मिक प्रगतीसाठी त्या आपला बराचसा वेळ खर्च करतात. याशिवाय मंडळीत प्रेम, आनंद, शांती आणि उत्साहाचे वातावरण राखण्यासाठी त्या आपल्या परीने प्रयत्न करतात. आपल्या पतीला आणि कुटुंबातल्या इतर सदस्यांना यहोवाची जास्तीत जास्त सेवा करता यावी म्हणून अनेक मार्गांनी मदत करायला, सहकार्य करायला त्या सदैव तयार असतात.
३ पूर्ण-वेळेच्या सेवेतील बहिणी: प्रभूमध्ये विशेष परिश्रम करणाऱ्या स्त्रियांपैकी प्रवासी पर्यवेक्षकांच्या पत्नींचा आवर्जून उल्लेख केला जातो. यांच्यापैकी बऱ्याच जणींनी आपल्या कार्यक्षेत्रात विकास घडवून आणण्यासाठी आपल्या पतींना पाठबळ दिले आहे. प्रवासी पर्यवेक्षक मंडळीचे काम पाहतात तेव्हा त्यांच्या पत्नी मंडळीतील बहिणींना उत्तेजन देण्यात आणि क्षेत्र सेवा करण्यात गुंतलेल्या असतात. तसेच, बेथेलमध्ये पूर्ण-वेळेची सेवा करणाऱ्या आपल्या अनेक बहिणी आपल्या आवेशी पवित्र सेवेद्वारे यहोवाच्या संघटनेला मोलाचा हातभार लावत असतात. मग अशा बहिणींकडे दुर्लक्ष करून कसे चालेल? यांशिवाय, सामान्य पायनियर म्हणून सेवा करणाऱ्या आपल्या असंख्य बहिणी आपल्या प्रामाणिक प्रयत्नांद्वारे देवाची स्तुती करतात आणि हजारो लोकांना सत्य शिकण्यास मदत करतात.
४ असे निःस्वार्थ जीवन जगल्यामुळे या विश्वासू बहिणींना किती समाधान मिळते! (१ तीम. ६:६, ८) साहजिकच, त्यांच्या परिश्रमाबद्दल त्यांची वाखाणणी करावी तितकी कमीच आहे. तर मग, त्यांना उत्तेजन देण्यास, त्यांना आधार देण्यास आपण मागे राहावे का?
५ विश्वासूपणे सेवाकार्य करणाऱ्या अशा ख्रिस्ती स्त्रियांची सर्वांनाच मोलाची मदत होत असल्यामुळे यहोवाच्या संघटनेत त्यांना महत्त्वाचे स्थान आहे. तेव्हा, “प्रभूमध्ये श्रम करणाऱ्या” अशा स्त्रियांची आपण सतत कदर करू या, त्यांचा मान राखू या आणि त्यांच्या कामावर यहोवाचा आशीर्वाद राहो अशी प्रार्थना करू या.