साल २००० साठी ईश्वरशासित सेवा प्रशाला
१ यहोवाच्या लोकांसाठी ईश्वरशासित सेवा प्रशाला अमूल्य वरदान ठरली आहे. गेल्या पन्नासएक वर्षांच्या काळात या प्रशालेने लाखो लोकांना आध्यात्मिक वक्ते आणि शिक्षक बनण्याची कौशल्ये आत्मसात करण्यास साह्य केले आहे. (स्तोत्र १४५:१०-१२; मत्त. २८:१९, २०) या प्रशालेमुळे तुम्हाला स्वतःलाच किती फायदा झाला त्याचा विचार करा. तेव्हा, येत्या २००० सालादरम्यान देखील तुम्ही पूर्णार्थाने या प्रशालेत सहभाग घेतला आणि तिथे देण्यात येणारा सल्ला लागू केला तर तुम्हाला सतत असाच फायदा मिळू शकतो.
२ साल २००० च्या प्रशाला आराखड्याच्या पहिल्याच पानावर नेमणुकांसबंधी आणि प्रशालेत अभ्यासल्या जाणाऱ्या प्रकाशनांसंबंधी सूचना दिलेल्या आहेत. प्रत्येक भागासाठी किती वेळ नेमून दिला आहे, भाषणाचे साहित्य कोणते, सदर माहिती कशाप्रकारे सादर केली जावी आणि असा इतर काही तपशील दिला आहे. तेव्हा, वेळ काढून या सूचना काळजीपूर्वक वाचा आणि त्यांचा व्यवहारिकपणे उपयोग करा.
३ साप्ताहिक बायबल वाचन: प्रशालेच्या आराखड्यात, साप्ताहिक बायबल वाचनासाठी दोन वेगवेगळे भाग दिलेले आहेत. त्यातला एक, बायबल वाचनाचा नेहमीचा भाग असून त्यात बायबलची पाचएक पाने वाचली जातात. आणि यावरच बायबलची ठळक वैशिष्ट्ये आधारित असतात. तर साप्ताहिक बायबल वाचनाचा दुसरा भाग, अतिरिक्त असून त्यात नेहमीच्या बायबल वाचनापेक्षा दुप्पट पाने वाचली जातात. त्यानुसार बायबलचे वाचन केल्यास तुमचे सबंध बायबल तीन वर्षांत वाचून होईल. अर्थात, बायबल वाचनाच्या अतिरिक्त भागात जितकी पाने वाचायला सांगितली जातात त्यापेक्षा जास्त वाचण्याची काहींची इच्छा असेल तर काहींना नेमलेल्या भागाचे पूर्णपणे वाचन करता येणार नाही, हे समजण्याजोगे आहे. पण, तुम्ही किती पाने वाचता हे महत्त्वाचे नाही. तर देवाच्या वचनाचे तुम्ही दररोज वाचन करता की नाही हे सगळ्यात महत्त्वाचे आहे. (स्तोत्र १:१-३) तेव्हा, या बाबतीत स्वतःची इतरांसोबत तुलना करण्याऐवजी तुम्हाला बायबलचे जितके वाचन करणे शक्य आहे त्यात समाधान माना.—गलती. ६:४.
४ तुम्हाला ईश्वरशासित सेवा प्रशालेत आपले नाव नोंदवायचे असल्यास त्याबाबतीत प्रशाला पर्यवेक्षकांशी बोला. प्रशालेत तुम्हाला भाग नेमून दिले जातात तेव्हा त्यासंबंधित हलगर्जीपणा करू नका आणि विनाकारण नेमणूक पूर्ण करण्याचे चुकवू नका. प्रशाला ही यहोवाने आपल्या लाभासाठी केलेली एक तरतूद आहे असे समजा. त्यासाठी उत्तम तयारी करा, तुम्हाला नेमून दिलेले भाग चांगल्याप्रकारे अभ्यासा, भाषण देताना मनापासून बोला आणि या अनन्यसाधारण प्रशालेचा पुरेपूर लाभ उठवा.