देवावर विश्वास नसलेल्या व्यक्तीशी संभाषण कसे कराल?
१ “देवाधर्मावर माझा मुळी विश्वासच नाही,” असे पोलंडच्या एका प्राध्यापिकेने आफ्रिकेत मिशनरी कार्य करणाऱ्या आपल्या एका बहिणीला म्हटले. तरी बहिणीने त्या स्त्रीशी संभाषण केले आणि तिला लाईफ—हाउ डिड इट गेट हिअर? बाय एव्होल्युशन ऑर बाय क्रिएशन? पुस्तक वाचायला दिले. पुढच्याच आठवडी ही बहीण पुन्हा त्या स्त्रीला भेटायला गेली तेव्हा तिने म्हटले: “देवावर आता माझा पूर्ण विश्वास आहे!” या स्त्रीने संपूर्ण क्रिएशन पुस्तक वाचून काढले होते आणि आता तिला बायबल अभ्यास करायचा होता. अर्थात, असे बरेच लोक आपल्यालाही भेटतात. मग, अशांना परिणामकारकपणे साक्ष कशी देता येईल? हे जाणून घेण्याआधी, लोक देवावर विश्वास का ठेवत नाहीत याची काही कारणे विचारात घ्या.
२ देवावर विश्वास न ठेवण्याची कारणे: स्वतःला नास्तिक म्हणणारे सर्वच लोक जन्मतः नास्तिक असतात असे नाही. त्यांपैकी बऱ्याच जणांवर कोणत्या ना कोणत्या धर्माचे संस्कार झालेले असतील आणि एकेकाळी ते देवावर विश्वासही ठेवत असतील. पण, मग एखादा असाध्य रोग, कौटुंबिक समस्या अथवा त्यांच्यावर झालेला अन्याय यांमुळे देवाधर्मावरील त्यांचा विश्वास पूर्णपणे उडाला असेल. किंवा मग, शाळाकॉलेजांमध्ये शिकवण्यात येणाऱ्या उत्क्रांतीवादासारख्या काही अभ्यासक्रमांमुळे काहींचा देवावर विश्वास राहिला नसेल. पण, यांपैकी बऱ्याच लोकांच्या मनोवृत्तीमध्ये विलक्षण बदल घडून आला. आज यहोवा देवावर त्यांचा अतूट विश्वास आहे आणि ते साक्षीदार बनले आहेत. परंतु, सुरवातीला देवावरचा त्यांचा विश्वास का उडाला याची काही कारणे विचारात घ्या:
३ पॅरिसमध्ये राहणाऱ्या एका स्त्रीला, अस्थिरोगाने ग्रासले होते आणि त्यामुळे तिची तब्येत खूपच खालावली होती. कॅथलिक असल्यामुळे तिचा बाप्तिस्मा केव्हाच झाला होता. पण, तरीही देवावर तिचा विश्वास नव्हता. देवाने जन्मतः आपल्यावर ही पीडा का आणली असा प्रश्न तिने नन्सना विचारला तेव्हा त्यांनी म्हटले: “कारण देवाला तू प्रिय आहेस.” पण, अशा या खुळचट, अर्थहीन उत्तराने तिचे समाधान झाले नाही. आता फिनलंडच्या एका तरुणाचे उदाहरण पाहा. या युवकाला स्नायूरोग झाला होता. उपचाराकरता तो डॉक्टरांकडे गेला तेव्हा त्याचा हा रोग आटोक्याबाहेर गेल्याचे त्यांनी सांगितले आणि काही काळातच हा युवक व्हिलचेअरला जखडला गेला. त्याच्या आईने त्याला रोगमुक्त करण्याचा दावा करणाऱ्या एका पेन्टिकॉस्टल मनुष्याकडे नेले. पण, त्याच्यानेही कोणता चमत्कार झाला नाही. या घटनेमुळे त्या तरुणाचा देवावरील विश्वास पूर्णतः उडाला.
४ हाँडुरासमधील एका मनुष्यावर बालपणापासून कॅथलिक धर्माचे संस्कार करण्यात आले होते; पुढे विद्यापीठात गेल्यानंतर त्याने समाजवादी तत्त्वज्ञान आणि नास्तिकवाद या विषयांचा अभ्यास केला. मनुष्य उत्क्रांतीने आला आहे या शिकवणुकीची खात्री पटल्याने देववगैरे काही नसते असे तो मानू लागला. अमेरिकेत राहणाऱ्या एका स्त्रीची देखील हीच कथा. तिच्यावर मेथोडिस्ट धर्माचे संस्कार झाले होते. कॉलेजमध्ये गेल्यानंतर तिने मानसशास्त्राचा अभ्यासक्रम घेतला. यामुळे देवावरील तिच्या विश्वासाचे काय झाले? ती म्हणते: “त्यामुळे देवाधर्मावर माझा जो थोडाफार विश्वास होता तो इतक्या पटकन नाहीसा झाला, की मला कळलंसुद्धा नाही.
५ प्रांजळ लोकांच्या मनापर्यंत पोहंचणे: आज अनेक लोक देवाधर्माच्या विषयावर बोलण्यास इतके उत्सुक नसले तरी सध्याच्या रोगराईवर, कौटुंबिक समस्यांवर, अन्यायावर आणि अशा इतर समस्यांवर काही उपाय आहे की नाही हे जाणण्यास ते उत्सुक असतात. ‘जगात इतकी दुष्टाई का आहे?’ ‘नेहमी चांगल्या लोकांवरच अन्याय का होतो?’ आणि ‘जीवनाचा नेमका अर्थ काय?’ या प्रश्नांची उत्तरे जाणण्याची त्यांना मनस्वी इच्छा असते.
६ स्वित्झर्लंडमध्ये राहणाऱ्या एका दांपत्याचेच उदाहरण घ्या; लहानपणापासूनच त्यांचा देवावर विश्वास नव्हता. त्यामुळे सत्याविषयी त्यांनी पहिल्यांदाच ऐकले तेव्हा सत्याबद्दल त्यांना काही खास आकर्षण वाटले नाही. पण, या पतीपत्नीचे संबंध इतके तणावग्रस्त होते, की ते घटस्फोटाचा विचार करत होते. साक्षीदार बहीण दुसऱ्यांदा त्यांच्याकडे गेली तेव्हा या समस्यांवर यशस्वीपणे मात कशी करता येईल हे बायबलमधून तिने त्यांना दाखवले. सदर बाबींवर बायबलमध्ये किती उपयुक्त सल्ला दिला आहे हे पाहून ते अवाकच राहिले आणि बायबल अभ्यास करण्यास राजी झाले. या सगळ्याचा परिणाम असा झाला, की त्यांचे वैवाहिक बंधन मजबूत झाले, त्यांनी आध्यात्मिक प्रगती केली आणि शेवटी दोघांनीही बाप्तिस्मा घेतला.
७ नास्तिक व्यक्तीशी संभाषण कसे कराल: माझा देवावर विश्वास नाही असे एखादा म्हणतो तेव्हा तो कशामुळे असे म्हणतो हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. त्याने घेतलेल्या शिक्षणामुळे, त्याच्यावर आलेल्या दुःख-संकटांमुळे की धर्मातल्या दांभिकपणामुळे आणि खोट्या शिकवणुकीमुळे? तुम्ही असे विचारू शकता: “सुरवातीपासूनच तुमचे असे मत आहे का?” किंवा “पण याला काही तरी कारण असावं, हो ना?” त्याने दिलेल्या उत्तरावरून पुढे काय म्हणायचे हे तुम्हाला ठरवता येईल. पण, जिथे घरमालकाला चांगल्याप्रकारे पटवून देण्याची गरज असेल तिथे इज देअर ए क्रिएटर हू केअर्स? हे पुस्तक देणे सगळ्यात चांगले राहील.
८ देवावर विश्वास नसलेल्या एखाद्या व्यक्तीशी तुम्ही अशा प्रकारे संभाषण करू शकता:
◼ “तुम्ही कधी विचार केलात का: ‘परमेश्वर आहे तर जगात आज इतकं दुःख आणि अन्याय का आहे?’ [उत्तरासाठी थांबा.] पण, यावर बायबल काय म्हणते तुम्हाला माहीत आहे का?” मग, यिर्मया १०:२३ वाचा आणि याविषयी त्या व्यक्तीला काय वाटते ते विचारा. त्यानंतर, विल देअर बि अ वर्ल्ड विदाऊट वॉर या माहितीपत्रकातील पृष्ठे १६ आणि १७ दाखवा. किंवा मग, क्रिएटर पुस्तकातला १० वा अध्याय तुम्ही दाखवू शकता. धरमालकाला प्रकाशन घेऊन त्याचे वाचन करण्याचे उत्तेजन द्या.—अधिक मार्गदर्शनासाठी रिझनिंग पुस्तकातील पृष्ठे १५०-१ वाचा.
९ अर्थात, स्वतःला नास्तिक म्हणणारे सगळेच लोक सत्य स्वीकारतीलच असे नाही. पण, असे बरेच लोक आहेत जे दुसऱ्यांचे विचार जाणून घेण्यास उत्सुक असतात. तेव्हा लोकांना तर्क करता येईल, त्यांच्या मनाला पटेल अशा पद्धतीने त्यांच्याशी बोला आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सत्य काय आहे हे त्यांना स्वतःला पाहता यावे म्हणून देवाच्या वचनाचा उपयोग करा.—प्रे. कृत्ये २८:२३, २४; इब्री. ४:१२.